मराठ्यांना आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे परत एकदा मैदानात उतरले आहेत. आज फुलंब्री शहरांमध्ये एका सभेत बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिलाय. मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे मराठ्यांच्या वेदना दिवसेंदिवस वाढत आहेत. हे सरकारने ते लक्षात घ्यावं, याचा उद्रेक झाला तर सरकारला महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. (Latest News)
मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत जेसीबीतून पुष्पवृष्टी करत करण्यात आलं. त्यानंतर मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकारला ४० दिवस दिले आहे. त्यानंतरचा ४१ वा दिवस हा आपला असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत आता आरक्षण घेतल्याशिवाय सरकारची सुट्टी नाही. त्यामुळे ही एकजूट मोडू देऊ नका.
मराठ्यांना आरक्षण नसल्यामुळे सरकारने मराठ्यांच्या वेदना लक्षात घ्याव्यात. सरकारने भावनाशून्य होऊ नये. अंतरवाली सराटी येथे सरकारने विविध कलमाच्या माध्यमातून आमच्यावर गुन्हे दाखल केले. ते आम्ही आमच्या पद्धतीने सरकारला मागे घेण्यासाठी भाग पाडू. समाजासाठी मी कधीही गद्दारी केली नाही. यामुळे चार भिंतीच्या आत न बोलता खुल्या व्यासपीठावर सरकारशी चर्चा केली. समाजाला एकदा मायबाप म्हटल्यानंतर समाजाशी गद्दारी करणं हे माझ्या रक्तात नाही.
त्यामुळे येणाऱ्या १४ ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे मोठ्या संख्येने आपण सर्व समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन जरांगे पाटील यांनी यावेळी केलं. तसेच त्यांनी मराठी युवकांनाही एक आवाहन केलं. सरकारकडून आरक्षण घेतल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही. त्यामुळे मराठ्यांच्या पोरांनो तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही जर आत्महत्या केल्या तर आम्ही आरक्षण घ्यायचे कोणासाठी, असा प्रश्न करत त्यांनी तरुणांना आत्महत्या न करण्याचे आवाहन केले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.