- विनायक वंजारे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील आंबा बागायतदार चंद्रकांत हरिश्चंद्र काजरेकर (chandrakant kajrekar) यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान हे जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान ठरले आहे. या आंब्याच्या पानाची लांबी 55.6 सेंटीमीटर व रुंदी 15.6 सेंटीमीटर इतकी आहे. त्याची नाेंद गिनीज बुकमध्ये (guinness book of world record) झाली आहे अशी माहिती काजरेकर यांनी दिली. (Maharashtra News)
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी व नंतर अकाउंट व्यवस्थापक म्हणून सुमारे 32 वर्ष सेवा करून चंद्रकांत काजरेकर यांनी निवृत्ती काळात त्यांची आंबा व काजू बागायतीची आवड जोपासली.
काजरेकर यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या साहाय्याने जागतिक रेकॉर्ड पडताळून पाहिले.
त्यांना निरीक्षणानंतर हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते असा अंदाज आला. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपल्या मुली डॉ. नालंदा परब व डॉ. नुपूर अगरवाडकर आणि जावई धीरज परब व डॉ. देवेन अगरवाडकर यांची मदत घेतली.
त्यांनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स , वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी त्याबाबतचा अहवाल पाठविला. त्यानंतर फेरतपासणीचे रेकॉर्ड तयार करताना संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत घेतली.
या महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र यशवंत ठाकूर, प्राध्यापक उमेश मिलिंद कामत व प्राध्यापक दयानंद विश्वनाथ ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाइड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग व रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. या कामात डॉ. दिपाली काजरेकर, डॉ नालंदा , डॉ नुपूर व जावई धीरज, डॉ. देवेन तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओ यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले.
जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाचे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड व वर्ल्ड वाईल्ड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली. कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदविले गेले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या आंब्याच्या पानाची लांबी 55.6 सेंटीमीटर व रुंदी 15.6 सेंटीमीटर इतकी आहे. यापूर्वी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत नवनवीन प्रयोग केले. कुडाळ येथील आपल्या राहत्या बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावरील टेरेसवर शेकडो सुपार्या व काजूची रोपे तयार करून नर्सरी चा यशस्वी प्रयोग केला.
तळवडे सावंतवाडी येथील शेतात आपले बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्राच्या साहाय्याने शेती करणे. दुर्मिळ वनौषधीची लागवड व संवर्धन यांचेही यशस्वी प्रयोग केले आहेत.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.