
आगामी स्थानिक स्वाराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीपर्यंत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यातील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. अशातच सांगली जिल्ह्यातील जैन समाजाचे नेते आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आज भाजपात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का देत मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे महायुती अधिक बळकट होणार असल्याचं बोललं जात आहे.
जैन समाजाचे नेते भाजप पक्षात
सांगलीतील जैन समाजाचे नेते आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील आज भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत. नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात १२ वाजेच्या दरम्यान, पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
रावसाहेब पाटील हे जैन समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य असून, सांगली जिल्ह्यातील समाजाचे नेते म्हणून देखील त्यांची ओळख आहे. त्याबरोबर महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील जैन समाजाच्या सर्वात मोठी संघटना असणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष देखील आहेत. सामाजिक कार्याबरोबर शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रामध्ये रावसाहेब पाटील यांचे मोठे कार्य आहे.
सांगलीत शिवसेना ठाकरे गटाला खिंडार
स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरजमधून शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मिरज शहरप्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे यांनी शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी हाती घड्याळ बांधलं आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार इद्रिस नायकवडी यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा मिरजमध्ये पार पडला. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक म्हणून चंद्रकांत मैंगुरे यांची ओळख आहे. त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटातील पक्ष प्रवेशामुळे मिरजेतील शिवसेनेला खिंडार पडले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.