Maharashtra Latest News : मुंबईतीतील आर्यन बार आणि स्टलिंग बारमधील अनधिकृत बांधकामावर BMC चा हातोडा

Today's Breaking Live News and Updates in Marathi: आज दिनांक २8 जून २०२४ वार शुक्रवार महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन तसेच देश विदेश वेगवान घडामोडींचे लाईव्ह अपडेट् वाचा फक्त एका क्लिकवर...
Saam TV Live Marathi News 27 June 2024
Today's Marathi News Live By Saam TV [28 June 2024]Saam TV

BMC News : मुंबईतीतील आर्यन बार आणि स्टलिंग बारमधील अनधिकृत बांधकामावर BMC चा हातोडा

पुणे आणि ठाण्यात अनधिकृत बांधकामांवरील कारवाईनंतर आता मुंबईतही कारवाई करण्यात आली आहे. डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बारमधील आर्यन बार आणि स्टलिंग बारमधील अनधिकृत बांधकामावर हातोडा फिरवण्यात आला आहे. मुंबई पोलीस आणि पालिकेनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

AAP/Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात  आपकडून उद्या मुंबई भाजप कार्यालयावर मोर्चा

सीबीआयचा गैरवापर करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बेकायदेशीर अटकेविरोधात आम आदमी पक्ष भाजप कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे. शनिवार दि २९ जून रोजी सकाळी १०.४५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे.

Pune News  : पुण्याचे प्रांतधिकारी जोगेंद्र कट्यारे यांचे अखेर निलंबन

जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक काळात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसें यांच्या सह खेडचे आमदार दिलीप मोहितेपाटील यांच्यावर आरोप करत लेटर बॉम्ब फोडला होता. जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रामुळे निवडणूक आणि प्रशासकीय कामात गल्लत करत शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय.

Pune News : पुणे महानगरपालिकेकडून अनधिकृत पब आणि बारवर आजही धडक कारवाई

पुण्यात आज चौथ्या दिवशी देखील अनधिकृत पब्स आणि बारवर अतिक्रमणाची कारवाई करण्यात आली. हडपसर, उंद्री आणि मोहम्मदवाडी परिसरातील पब्स आणि बारवर महापालिकेने हातोडा फिरवला आहे. आज दिवसभरात एकूण 13 हॉटेलवर कारवाई करण्यात आली.

Uddhav Thackeray : शिंदे गटाच्या आमदाराची भेट उद्धव ठाकरेंनी नाकारली

उद्धव ठाकरे यांनी बजोरिया पिता-पुत्रांची भेट नाकारली. शिंदे गटाचे विधान परिषदेचे प्रतोद विप्लोव बाजोरिया आणि त्यांचे वडील गोपिकीशन बजोरिया हे उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आले होते. ठाकरे यांनी त्यांच्याशी बोलणं टाळल्याची माहिती समोर आली आहे.

Badlapur Rain Update : बदलापूर-अंबरनाथमध्ये जोरदार पाऊस, वातारवणात गारवा

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर भागामध्ये आज दुपारपासून चांगला पाऊस पडतोय. या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झालाय. पावसामुळे कुठे पाणी भरण्याची घटना घडलेली नाही. पाऊस काही वेळ सुरू राहिल्यास सकल भागात पाणी साठण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Pune Drug case : पुणे ड्रग्स प्रकरण : ड्रग्स पेडलरला पोलीस कोठडी

ड्रग्स प्रकरणी अटकेत असलेल्या ड्रग्स पेडलरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अटकेत असलेल्या तिन्ही आरोपीना 2 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

या प्रकरणातील 3 आरोपीना ड्रग्स तस्करी प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली होती.

पुणे हॉटेल ड्रग्स प्रकरणीत L3 हॉटेलला ड्रग्स पुरवल्याची माहिती पोलिसांकडे आहे.

अर्थसंकल्पानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून जल्लोष, कार्यकर्त्यांनी फोडले फटाके

महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली.

शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला आहे.

शिंदेगटाकडून फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला.

बाळासाहेब भवन येथे शिंदे गटाकडून जल्लोष साजरा करण्यात आला.

NIA : नौदलतळ गोपनीय माहिती लीक प्रकरणी NIA च्या महाराष्ट्र, गुजरातमध्ये धाडी

पाकिस्तानी गुप्तहेर संस्था आयएसआय हेलगिरी प्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये एनआयएने धाडी टाकल्या आहेत. २०२१ साली विशाखापट्टणमच्या नौदलाच्या तळाची गोपनीय माहितीच्या लीक केल्याप्रकरणी एनआयएची कारवाई नौदलाच्या तळाची हेरगिरी करण्यासाठी संशयितांना पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयने पैसे दिल्याचा एनआयए ला संशय

Eknath Shinde News : बुलडोझर चालवताना कोणालाही सूट देऊ नका - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे आणि मीरा-भाईंदर नंतर आता संपूर्ण महाराष्ट्रातील अनधिकृत बांधकाम, अंमली पदार्थ विरोधी कारवाई बेधडक चालणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील सर्व वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांना आदेश देण्यात आले आहेत. अनधिकृत बांधकाम आणि अंमली पदार्थ विरोधी कारवाई करताना बेधडक बुलडोझर चालवा,असा आदेश मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला आहे. तसेच बुलडोझर चालवताना कोणालाही सूट देऊ नका,असेही मु्ख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Pune News :  पुण्यात ड्रग्ज विरोधात भाजप युवा मोर्चाचं आंदोलन

पुण्यात ड्रग्ज विरोधात भाजप युवा मोर्चाच आंदोलन सुरु आहे.

पुण्यात होत असलेल्या अंमली पदार्थ पार्टीच्या विरोधात युवा मोर्चाचा आंदोलन सुरु आहे.

पुण्यातील गुडलक चौकात युवा मोर्चाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं.

ड्रग्ज रुपी प्रतिकात्मक पुतळ्याला जोडा मारत भाजप युवा मोर्चाने घोषणाबाजी केली..

Kalyan Rain Update :  कल्याण डोंबिवलीत पावसाची जोरदार हजेरी

गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर कल्याण-डोंबिवलीमध्ये आज सकाळपासून पावसाने हजेरी

सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी

गेल्या अर्ध्या तासापासून कल्याण डोंबिवली जोरदार पावसाला सुरुवात

सकाळपासून कोसळणारा पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय

Mumbai goa highway : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

मुंबई-गोवा महामार्गावर झाड कोसळले आहे. यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प आहे. माणगाव हॉटेल गणेश पॅलेस जवळची घटना आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाली आहे. दोन्ही बाजुला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Eknath Shinde : पहिल्यांदा दिंडीला निधी दिल्याने त्यांना पोटदुखी; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिदेंच्या एकट्याच्या योजना नाहीत. सरकारच्या योजना आहेत, जनतेच्या योजना आहेत. जनता विरोधकांचा फर्दाफाश करेल. पहिल्यांदा दिंडीला आम्ही निधी दिला. यामुळे पोटदुखी होत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

Nana Patole News : फेकू सरकारने घोषणांचा पाऊस पाडला; नाना पटोलेंचं टीकास्त्र

नाना पटोले काय म्हणाले?

अर्थसंकल्प मांडला तो फक्त घोषणांचा पाऊस. शेतकरी आभाळाकडे बघतोय. दुबार पेरणी करावी लागली. पण फेकू सरकारने घोषणांचा पाऊस पाडला.आम्ही महिलांना साडेआठ हजार देणार होतो.ते दीड हजार देत आहेत आणि कमिशन खात आहेत. महिलांना फसवण्याचा प्रयत्न या सरकारने केला आहे.

Uddhav Thackeray : महाराष्ट्राला ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्र - उद्धव ठाकरे

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

लोकसभा निवडणुकात गेली दहा वर्ष आश्वासन आणि थापांना कंटाळून जनतेने धडा शिकवला आहे. जनता आता यांच्या थापांवर विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्राला ओरबाडून गुजरातला नेण्याचं षडयंत्र आहे.

Maharashtra Budget: 'निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस', विरोधकांचे टीकास्त्र

राज्यसरकारने अर्थसंकल्प सादर केल्यानंतर विरोधकांकडून त्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस केलाय. घोषणा केल्या पण त्या इम्पलीमेंत कस करणार? इतर राज्यात लाडली बहेन ला मोठी रक्कम देतात मग आपल्याकडे थातूरमातूर का? असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी टीका केली.

Maharashtra Budget: राज्याचा अर्थसंकल्प सादर; वाचा ठळक वैशिष्ट्ये

दिनांक 27 फेब्रुवारी 2024 रोजी राज्याचा 2024-25 या आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता, आता सन 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करण्यात आला.  केंद्र शासनाच्या पहिल्याच मंत्रीमडंळ बैठकीत वाढवण बंदर प्रकल्पाला मंजूरी-एकूण किंमत 76 हजार 200 कोटी रुपये -10 लाखांहून अधिक रोजगार निर्मीती  अतिरिक्त अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, युवा, मागास वर्ग आणि सर्व समाजातील गरिबांना भरीव आर्थिक मदतीवर भर

Maharashtra Budget Live: सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोल, डिझेलचे दर कमी होणार

अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा. इंधनावरचा कर २४ टक्क्यांवरुन २१ टक्क्यांवर केला आहे. एम एम आर भागात हा दर कमी केला. त्यामुळं पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाण्यात डिझेलचा दर २ रुपयांनी कमी होणार आहे.

Maharashtra Budget Live: बळीराजाला दिलासा! कृषी पंपाचे वीज बिल माफ होणार

आजच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा करण्यात आली आहे. अजित पवार यांनी शेतकरी वीज माफीचा निर्णय जाहीर केला आहे. शेती कृषी पंपाचे बिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Maharashtra Budget Live: विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा, १० लाख तरुणांना रोजगार, मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना जाहीर

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विद्यार्थी वर्गासाठीही मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्रत्येक वर्षी १० लाख तरुणांना रोजगार, उद्योजक प्रशिक्षण कार्यक्रमांवर भर, AI संशोधनासाठी निधी, तसेच राज्यात विविध जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. म्हसळा येथे युनानी महाविद्यालय, सिंधुदुर्गमध्ये आंतराष्ट्रीय स्कूबा डायव्हिंग केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Budget Live: अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी योजना!

शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. प्राण्यांचा हल्ला झाल्यास २५ लाखांची आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना अखंडित विजपुरवठेसाठी निधी मागेल त्याला सौरउर्जा प्रकल्प सांगलीच्या म्हैसाळ येथे उभारला जाणार आहे. येत्या दोन वर्षात 163 सिंचन प्रकल्प पूर्ण होतील. सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्ड करून 15000 कोटींचं दीर्घकालीन कर्ज मंजूर झालेला आहे. ⁠३२०० कोटी रुपयांचा कार्यक्रम दुष्काळी भागात पाणी पोहचवण्याचा राबविण्यात येणार आहे. शेतकरी यांना दिवसा विज पुरवठा करण्यासाठी १५००० कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात येत आहे.

25 लाख महिलांसाठी लखपती दिदी योजना, मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण- अजित पवारांची घोषणा

राज्य सरकारने आजच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. महिलांसाठी माझी लाडकी बहिण योजनेअंतर्गत महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. तसेच 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याची घोषणा, मुलींना मोफत शिक्षण, १०,००० पिंक रिक्षा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही राबवण्यात येतील.

Maharashtra Budget: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, गाव तिथे गोदाम योजनेची घोषणा

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठीही मोठा घोषणा करण्यात आल्या आहेत. राज्यात गाव तिथे गोदाम या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. त्यासाठी ३३१ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसेच कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५०० रुपये देण्यात येणार आहेत. गाईच्या दुधासाठी ५ रुपयाचं अनुदान प्रति लिटर देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. १ जुलैपासून हे अनुदान दिले जाणार आहे.

Maharashtra Budget: मोठी बातमी! महिलांसाठी अन्नपुर्णा योजनेची घोषणा

अर्थसंकल्पातून मुख्यमंत्री अन्नपुर्ण योजनाही जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहेत. व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना ८ लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबियातल्या मुलींना १०० टक्के फी भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Budget: महिला वर्गाला मोठं गिफ्ट; अर्थसंकल्पातून मोठ्या घोषणा

राज्य सरकारने महिलांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. माझी लाडकी बहिण योजने तसेच राज्यात महिलांना १० हजार पिंक रिक्षा देण्यात येईल. मुख्यमंत्री अन्नपुर्ण योजनाही जाहीर करण्यात आली आहे. या योजनेनुसार पात्र कुटुंबाला वर्षाला ३ सिलेंडर मोफत मिळणार आहेत. व्यावसायिक शिक्षणासाठी महिलांना ८ लाख रुपये उत्पन्न असलेल्या कुटुंबियातल्या मुलींना १०० टक्के फी भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिलांना मोठं गिफ्ट! मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा महायुतीकडून महिलांना गिफ्ट देण्यात आलं आहे. मध्यप्रदेशमधील लाडली बहना योजनेच्या धरतीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेनुसार २१ ते ६० वर्षाच्या महिलांना दरमहा १५०० रुपये दिले जातील.त्यासाठी ४६००० कोटी रुपये लागतील.

Maharashtra Budget: अर्थसंकल्प सादर करण्याआधी सभागृहात विठुनामाचा गजर!

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधानभवनात सादर होत आहे. अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजित पवार यांनी विठुनामाचा गजर करत वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. वारीला जागतिक वारसा म्हणून घोषित करावा अशी मागणी युनेस्कोकडे केली आहे. प्रती ‌दिंडीला २० हजार रुपये देण्यात येणार आहे.

Maharashtra Budget: थोड्याच वेळात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प आज विधानभवनात सादर होत आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील. आजच्या अर्थसंकल्पात राज्य सरकार तरुण, महिला, शेतकऱ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या घोषणा आणि आकर्षक घोषणा करण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray: २ ते ३ महिन्यात जनता त्यांना आरसा दाखवेल, उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीका केली. 'हे डबल इंजिन सरकार आहे. इतर डबे जोडले जात आहेत. येत्या २ त ३ महिन्यात महाराष्ट्रातील जनता त्यांना आरसा दाखवेल. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करा. लाडकी बहीण योजनेचे आम्ही स्वागत करतो. हे महिला आणि पुरुषांमध्ये भेद न करता. लाडका भाऊ किंवा मुलगा अशीही योजना असावी.', असे त्यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Session : विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक, गोंधळामुळं विधानसभेचं कामकाज दुपारी २ पर्यंत तहकूब

मुंबई-गोवा महामार्गाचं अपूर्ण असलेलं काम आणि राज्यातील इतर महत्वाच्या मुद्द्यांवरून विरोधक प्रचंड आक्रमक झाले. सभागृहात गोंधळामुळं विधानसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

Maharashtra Assembly Session : विधानभवनाबाहेर दूध ओतून आंदोलन

दुधाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी दूध उत्पादक आक्रमक झाले आहेत. विधीमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाला असून, विधानभवनाबाहेरच दूध ओतून आंदोलन केले. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Supriya Sule : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेच्या गटनेतेपदी सुप्रिया सुळे

नवी दिल्ली -

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी खासदार सुप्रिया सुळे यांची नियुक्ती

तर, पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना संधी

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना दिलं पत्र

Maharashtra Assembly Monsoon Session : पुण्याचा उडता पंजाब होत आहे; विजय वडेट्टीवार संतापले

विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचा कामकाज सुरू होताच विरोधी पक्ष पुण्यातील हिट अँड रन प्रकरणावरून आक्रमक झाले आहेत. पुणे हिट अँड रन घटनेवरून विरोधकांनी सत्ताधारी आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. फडणवीसांनीही निवेदन दिलं. त्यानंतर विजय वडेट्टीवार आक्रमक झाले. पुण्याचा उडता पंजाब होत आहे. कायद्याचा कुठलाही धाक राहिलेला नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.

Pune car Accident : विधानसभेत विरोधक आक्रमक, गृहमंत्री फडणवीसांचं निवेदन

विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विधानसभेत हिट अँड रन प्रकरणावरून विरोधक आक्रमक झाले. त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी निवेदन केले. पुणे अपघात प्रकरणात आतापर्यंत सरकारनं काय कार्यवाही केली, याबाबतची सविस्तर माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.

Nashik News: आमदार सुहास कांदे यांच्या संस्थेच्या ॲम्बुलन्सने दिली वाहनांना धडक, चालक होता मद्यधुंद अवस्थेत; दोघे जखमी

नाशिकचे आमदार सुहास कांदे यांच्या खासगी ॲम्बुलन्सने अनेक वाहनांना धडक दिली. सुहास कांदे यांच्या संस्थेच्या ॲम्बुलन्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत होता. सुहास कांदे यांचे नाव आणि फोटो असलेल्या ॲम्बुलन्समध्ये दारूच्या बाटल्या सापडल्या. मद्यधुंद अवस्थेतील खासगी ॲम्बुलन्स चालकाची सरकारी ॲम्बुलन्स आणि एका वाहनाला जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये दोन जण जखमी झाले आहे. नाशिकच्या ओझर येथील राष्ट्रीय महामार्गावरील ही घटना आहे.

Maharashtra Rain: पावसाचा भाजीपाल्याच्या दरावर परिणाम, भाज्यांचे दर वाढले

राज्यात पावसाने जोर धरला असून याचा परिणाम भाजीपाल्याच्या दरावर झालाय. एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये भाजीपाल्याची आवक वाढली असली तरी दर मात्र कमी न होता वधारलेले पहायला मिळतायत. वाटाणा, फरसबी, शेवगा शेंग, घेवडा, भेंडी या भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढेले असून पालेभाज्या मात्र स्वस्त झाल्याचं पहायला मिळतंय.

Maharashtra News: राज्यात युरिया खताचा काळाबाजार, कृषीमंत्र्यांची कबुली

राज्यात युरिया खताचा काळाबाजार होत आहे. युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची कृषीमंत्र्यांनी कबुली दिली. लेखी उत्तरात कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी कबुली दिली. अनुदानित युरियाचा काळाबाजार झाल्याची मुंडे यांची लेखी उत्तरात माहिती दिली. सांगली जिल्ह्यातील कडेगाव पोलिसांकडून याबाबत तपास सुरु आहे.

Vidhan Sabha Adhivation : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधक आक्रमक, सरकारविरोधात घोषणाबाजी

पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी देखील विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानसभेच्या पायऱ्यांवर उभं राहून विरोधक जोरदार घोषणाबाजी करत आहेत. शेतकरी, उद्योग धंदे परराज्यात गेल्यावरुन विरोधकांची घोषणाबाजी सुरू आहे.

Vidhan Sabha Adhivation : अधिवेशनाचा दुसरा दिवसही गाजणार, सत्ताधाऱ्यांकडूनच घोषणाबाजी, विरोधकांना प्रत्युत्तर  

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजण्याची चिन्हे आहेत. पहिल्या दिवशी विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात आक्रमक होत, जोरदार घोषणाबाजी केली होती. आज सत्ताधाऱ्यांनी विरोधकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. एक अकेला मोदी, सब पर भारी, अशा घोषणेचे बॅनर घेऊन सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर टीका केली.

Ahmednagar News: दूध दरासाठी शेतकरी आक्रमक; नगरमध्ये रास्तारोको

दूध दरासाठी दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून आज अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार घोटी राजमार्गावर रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे. संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात आंदोलन करण्यात आले आहे. उद्या दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक बोलावली आहे. मात्र आज त्यांच्याच अहमदनगर जिल्ह्यात दूध दरासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत.दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा यासह अनुदानाच्या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.

Nashik Crime: नाशिकमध्ये गावगुंडांची दहशत, तलवाडीने टपरी फोडली

नाशिकमधील म्हसरूळ परिसरात गावगुंडांची दहशत माजवली आहे. दोन टवाळखोरांनी तलवारीने पान टपरी फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली अशून कथित भाईला पानटपरी चालक ओळखत नसल्याच्या रागातून पान टपरी फोडल्याचे सांगण्यात येत आहे. दहशत निर्माण करणाऱ्या संशयित टवाळखोरांना म्हसरूळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Beed News : बीडच्या शिरुर कासारमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग; ८ दुकाने जळून खाक

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील एका दुकानाला गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याने ८ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. स्थानिकांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र आगीत ८ दुकाने जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

Jalna News : मित्रानेच केली मित्राची हत्या, जालन्यातील धक्कादायक घटना

जालन्यात किरकोळ वादातून मित्रानेच मित्राचा चाकू भोसकून खून केल्याची घटना घडलीय. सैय्यद नदीम सैय्यद रहीम असे या मयत तरुणाचं नाव आहे.जालना शहरातील चंदनझिरा परिसरात सैय्यद नदीम सैय्यद रहीम या तरुणाचा रात्री ११ वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर चाकूने भोसकून निर्घृण खून करण्यात आलाय.

या खूनप्रकरणी चंदनझिरा पोलिसांनी दोन संशयीत आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केलाय.दरम्यान जालन्यातील चंदनझीरा पोलिसांनी या प्रकरणी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलय. दरम्यान आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.

Buldhana News : वादळात छपरे उडून 55 शाळांची पडझड; शाळाच दुरुस्त नाही तर विद्यार्थ्यांनी कुठे बसायचे?

एप्रिल आणि मे महिन्यादरम्यान जिल्हाभरात अवकाळी वादळी पावसाने अनेक ठिकाणी नुकसान केले. या अवकाळी वादळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील 55 शिक्षणाची मंदिरेही सापडली. शाळांची छपरे उडाल्याने जिल्ह्यातील 55 शाळांची पडझड झाली. शाळांवरीलटीनपत्रे उडाल्याने या शाळांना भकास स्वरूप आले आहे. या शाळा वादळाच्या भोवऱ्यात सापडल्याने शाळांमध्ये शिक्षणाची वाताहत झाल्याचे चित्र आहे.

विशेष म्हणजे जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या शाळा आता अवघ्या तीन दिवसांनी म्हणजेच 1 जुलैपासून सुरू होणार आहेत. मात्र, अद्याप या शाळांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांनी कुठे बसायचा, हा मोठा प्रश्न निर्माण झालाय. शाळांचे नुकसान होऊन दीड ते दोन महिने उलटले तरीही शाळांची दुरुस्ती जिल्हा परिषद शिक्षण विभागाने केली नाही.

 Nanded News : शेतमालाला हमी भाव देऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा; नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी

आज राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर होणार आहे .या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी भरीव निधीची तरतूद करावी, शेती मालाला हमी भाव आणि कर्ज मुक्ती करून शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी नांदेडच्या शेतकऱ्यांनी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर मुदखेड या तालुक्यात केळीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतलं जातं.

परंतु अवकाळी पावसामुळे येंदा केळीचे प्रचंड नुकसान झाले आहे. दुष्काळजन्य परिस्थितीमुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. जिल्ह्यात आता पर्यंत 40 टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत.

सरकाने शेतकऱ्यांसाठी कितीही पॅकेज दिलं तरी त्याचा उपयोग होत नाही. शासनाने शेतकऱ्यांसाठी ठोस पावले उचलावीत. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव आणि कर्ज मुक्तीचा निर्णय या अर्थसंकल्पात घ्यावा, अशी मागणी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

Sambhajinagar News : पावसाअभावी 2 एकर क्षेत्रावरील मिरचीचे पीक फेकले उपटून; सोयगाव तालुक्यातील तिडका येथील प्रकार

छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातल्या सोयगाव तालुक्यामधील तिडका येथील एका शेतकऱ्याने पावसाअभावी आपल्या शेतात लावलेल्या दोन एकर क्षेत्रावरील मिरची पीक उपटून फेकले आहे. या शेतकऱ्याने एप्रिल महिन्यात लागवड केलेलं मिरची पिका साठी आता पर्यत लाखाच्या जवळपास खर्च आला होता.

मात्र, जून महिन्यात पाऊसच न झाल्याने व विहिरीने तळ गाठल्याने पाण्याअभावी मिरची पीक उपटून फेकण्याची वेळ आली आहे. दरम्यान सावळद बारा मंडळ वगळता इतर बनोटी जरंडी आणि काही मंडळी कोरडेठाक असल्याने त्या भागातील शेतकऱ्यावर दुबार पेरणीची देखील वेळ आली आहे.

Nanded News :  नांदेडहून पुणे आणि नागपूरला विमानसेवा सुरू

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या नांदेड पुणे आणि नांदेड नागपूर विमानसेवा सुरू झालीय.पहिल्याच दिवशी 55 प्रावशानी नांदेड ते पुणे असा प्रवास केला आहे. मागील पाच वर्षपासून बंद पडलेली विमानसेवा स्टार एअर कंपनीने सुरू केलीय.

31 मार्च पासून नांदेड बंगळुरू,आणि नांदेड अहमदाबाद ही सेवा सुरू करण्यात आली होती.त्यानंतर नांदेड पुणे आणि नांदेड नागपूर अशी विमानसेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. या मागणीची दखल घेत स्टार एअर कंपनीने नांदेड ते पुणे आणि नांदेड ते नागपूर अशी विमानसेवा सुरू केलीय. पहिल्याच दिवशी 55 प्रवाशांनी नांदेड ते पुणे असा प्रवास केला आहे.

Ratnagiri News : रत्नागिरीत सकाळपासून पावसाची संततधार

रत्नागिरी - रत्नागिरीत सकाळपासून पावसाची संतधार सुरू आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहेत. येत्या काही तासांतच पावसाचा जोर वाढणार असून जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी शेतीकामांना वेग दिला आहे.

Beed News : मातोरी गावात तणावपूर्ण शांतता; पोलिसांचे दोन पथक गावात दाखल

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची अभिवादन दौरा बीडच्या परळीत दाखल झाल्यानंतर, मनोज जरांगे पाटील यांच्या मूळ मातोरी गावात दगडफेक झाली. लक्ष्मण हाकेंच्या स्वागतासाठी, मातोरी परिसरातील शृंगारवाडी फाट्यावर जाणाऱ्या रॅलीवर दगडफेक करण्यात आली.

या दगडफेकीत मोटार सायकल आणि मोठ्या वाहनांचे नुकसान झाले. तर काही नागरिकांना दुखापत देखील झाली. दरम्यान आता सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांची दोन पथके मातोरी गावात दाखल झाली आहे. तर पोलीस प्रशासनाकडून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.

Pune News : देहूच्या मुख्य मंदिरात फुलांची सजावट, आज होणार पालखीचे प्रस्थान

जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 39 वा पालखी सोहळा देवनगरीत संपन्न होत आहे या पालखी सोहळ्या निमित्ताने देवीच्या मुख्य मंदिरात मोठ्या प्रमाणात फुलांची सजावट करण्यात आलेली आहे. यामध्ये गुलाब जरबेरा तुळशी जाई जुई अशा अनेक फुलांनी मंदिर परिसर सजवण्यात आला आहे.

 Jalna News : जालन्यात 45 लाख रुपयांचा गुटखा जप्त; अंबड पोलिसांची मोठी कारवाई

जालन्यात 45 लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केलाय. आयशर टेम्पोवर बीडकडून जालन्याला गुटखा घेऊन जात होता. अंबड पोलिसांनी रात्री साडेदहाच्या सुमारास मठपिंपळगाव शिवारात सापळा रचत कारवाई केली. याची किंमत एकूण 45 लाख रुपये आहे, व आयशर टेम्पोची किंमत 15 लाख रुपये असून असा एकूण 60 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय.

Maharashtra state budget 2024 : अर्थमंत्री अजित पवार आज मांडणार अर्थसंकल्प

महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गुरुवारपासून सुरू झाले आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प मांडणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती आपल्या शेवटच्या अर्थसंकल्पात कोणकोणत्या मोठ्या घोषणा करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार हे मराठा आरक्षण, अल्पसंख्याक कल्याण आणि शेतकऱ्यांबाबत अर्थसंकल्पात मोठी घोषणा करणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, पेपरफुटी, ओबीसी आरक्षण अशा अनेक मुद्द्यांवर विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com