
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवर ड्रोन हल्ले केले आहे. तसेच जम्मू सीमेवरही तोफांचा मारा करण्याचे सत्र सुरूच आहे. अशातच महाराष्ट्रातही खबरदारी घेतली जात आहे. पुणे विमानतळासह, रायगड, शिर्डी साई मंदीर, जायकवाडी धरण आणि नागपूरमध्ये उपाययोजना आखून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पुणे विमानतळावर सलग तिसऱ्या दिवशी उड्डाणे रद्द
भारत पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर सलग तिसऱ्या दिवशी उड्डाणे तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. या प्रवाशांना पूर्ण परतावा किंवा पर्यायी प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
रद्द झालेली उड्डाणे
इंडिगो एअरलाइन्स : अमृतसर- पुणे, चंडीगड- पुणे, पुणे- चंडीगड, पुणे- अमृतसर, नागपूर-पुणे, पुणे- जोधपूर, जोधपूर- पुणे.
स्पाइसजेट : जयपूर- पुणे आणि पुणे- भावनगर
रायगड जिल्ह्यात सर्तकता
भारत-पाक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस आणि महसूल यंत्रणा सतर्क आहेत. समुद्रकिनाऱ्यावर सुरक्षा वाढवली आहे, नाकाबंदी सुरू आहे. तसेच मच्छीमारांना अनोळखी हालचालींची माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जायकवाडी धरणावर पर्यटन बंदी
जायकवाडी धरणावर पुढील ४ दिवस पर्यटन बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अलर्ट जारी करण्यात आला असून, CCTV आणि सायरन यंत्रणा बसवण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी स्वतः धरणाच्या सुरक्षेचा आढावा घेत आहेत.
शिर्डीत सुरक्षा अलर्ट
शिर्डी साई मंदिरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. भाविकांची कसून तपासणी सुरू असून, बॉम्ब शोधक पथकाची नियमित पाहणी सुरू आहे.
साई संस्थानमध्ये भाविकांच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या सुरक्षा यंत्रणेसह एमएसएफ आणि महाराष्ट्र पोलिस जवान असे एक हजार सुरक्षा रक्षक तैनात आहेत. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी साईबाबा संस्थान विशेष काळजी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
नागपूर रेल्वे स्टेशनवर मॉक ड्रिल
नागपूरच्या मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल राबवण्यात आली. सायरन, धावपळ, प्रवाशांचे मार्गदर्शन, आणि सुरक्षा चाचणी करण्यात आली. नागरिकांनी अशा प्रसंगी शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले.
नागपूर एम्समध्ये सर्व सुट्ट्या रद्द
भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर 'नागपूर एम्स' मधील सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. औषधे, ऑक्सिजन, रक्तसाठा याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे, आणि वैद्यकीय मदत तत्काळ देण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.