Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाचं धुमशान; नांदेडमधील अर्धापूरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडत आहे. ठिकठिकाणी काय आहे पावसाची स्थिती जाणून घेऊयात.
Nanded Ardhapur Taluka Heavy Rain
Nanded Ardhapur Taluka Heavy Rain SAAM TV
Published On

साम टीव्ही न्यूज टीम:

गेल्या काही तासांपासून राज्यभरात पावसाचं धुमशान सुरू आहे. राज्यातील काही भागांत तुफान पाऊस पडत आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. संपूर्ण परिसर जलमय झाला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटल्याची माहिती आहे. तर शेकडो हेक्टरवरील शेती पाण्याखाली गेली आहे. दुसरीकडे, सिंधुदुर्ग, भामरागड, अकोला, बीड, नाशिक, अमरावती या परिसरांत पावसाची संततधार सुरूच आहे. (Maharashtra Rain Update)

Nanded Ardhapur Taluka Heavy Rain
हिंगोलीत ढगफुटी सदृश्य पाऊस, अख्खं गाव पाण्याखाली, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

अर्धापूर तालुक्यात मुसळधार

नांदेड जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे (Rain) अर्धापूर शहरातील दुर्गानगर भागात पावसाचं पाणी शिरलं आहे. तालुक्यातील शेलगाव, शेणी, कोंढवा, देळूबसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. रस्ते, छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. परिसरातील शेकडो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेतांना नदीचे स्वरूप आले आहे. या भागात शेतकऱ्यांनी दोनदा, तिनदा पेरण्या केल्या, आता मात्र ही पिकेही खरडली गेल्याने शेतकऱ्यांवर मोठं संकट कोसळलं आहे. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

सिंधुदुर्गात पावसाची अधूनमधून बॅटिंग

सिंधुदुर्गात कालपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने (Rain Update) आज सकाळपासून थोडी विश्रांती घेतली होती. मात्र, अधूनमधून पावसाची बॅटिंग सुरूच आहे. मुसळधार पावसामुळे काल जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. नद्या दुथडी वाहत होत्या. आज मात्र जनजीवन पूर्वपदावर येताना दिसून येत आहे. हवामान विभागाने आज दमदार पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी, पावसाने बऱ्यापैकी उसंत घेतलेली दिसते. सकाळपर्यंतच्या अपडेटनुसार, मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ११० मिमी पावसाची नोंद झाली असून, सावंतवाडीत सर्वाधिक १५७ मिमी पावसाची नोंद झाली.

Nanded Ardhapur Taluka Heavy Rain
Rain Update : पुढील ३ दिवस महत्वाचे; कोकणातील सर्व जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा

भामरागडचा संपर्क तुटला

गडचिरोली : भामरागडजवळील कुमारगुडा नाल्यावरील कच्चा पूल (रपटा) वाहून गेल्याने भामरागडचा संपर्क तुटला आहे. कुमरगुडा नाल्याला पूर आला असून, मुख्य मार्गावरील या नाल्यावर पक्का पूल अजूनही नाही. तात्पुरता पूल बांधून वाहतूक सुरू होती. मात्र पहिल्याच पावसात हा कच्चा पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली असून, आलपल्ली-भामरागड मार्ग आता बंद झाला आहे. विशेष म्हणजे, या पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असली तरी त्याचे काम उन्हाळ्यात सुरू न करता, आता हाती घेण्यात आले. त्यामुळे या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. ताडगाव-भामरागड यादरम्यान कुमरगुडा नाला आहे.

अकोला जिल्ह्यात ८६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

अकोला (Akola rain) जिल्ह्यातील विविध भागांत गुरुवारी रात्री जोरदार पाऊस बरसला. पावसाच्या तडाख्यामुळे जिल्ह्यातील अकोला व बाळापूर या दोन तालुक्यांत ४७ घरांची पडझड झाली. ८६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. जिल्ह्यातील सातही तालुक्यांत ७ जुलै रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. ८ जुलै रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १९.५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामध्ये पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील अकोला तालुक्यात ४० आणि बाळापूर तालुक्यात ७ अशा एकूण ४७ घरांचे अंशत: नुकसान झाले असून, दोन्ही तालुक्यांत ८६४ हेक्टर क्षेत्रावरील कापूस, सोयाबीन व तूर, इत्यादी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दोन्ही तालुक्यांतील घरांची पडझड व पीक नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत सादर करण्यात आला आहे.

बीड जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

गेल्या अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर बीड जिल्ह्यात काल रात्रीपासून सर्वदूर पाऊस पडत आहे. रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार अद्यापही कायम असून, शहरासह गावखेड्यांतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातील बीडसह माजलगाव, गेवराई, पाटोदा, आष्टी, वडवणी, केज, परळी यासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे.

नांदेडमध्ये विष्णुपुरीचे दोन दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड जिल्ह्यात कालपासून पावसाचा जोर वाढल्याने गोदावरी नदीवरील विष्णुपुरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. ३० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत आहे. प्रकल्पाचे ५ आणि ६ क्रमांकाचा दरवाजा उघडण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. नदीच्या वरच्या क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास आणखी दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नदीकाठच्या ५० गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

नाशिक जिल्ह्यांतील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

नाशिकमध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर, दारणा, भावली, पालखेड या धरणातील पाणीसाठ्यांत वाढ झाल्याने दिलासा मिळाला आहे. गंगापूर धरण ३७ टक्के, दारणा धरण ४४ टक्के भरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिकमध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्र्यंबकमध्ये ९२ मिलीमीटर, इगतपुरीमध्ये ९३ मिलीमीटर, तर नाशिकमध्ये ६० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

चिखलदराचे सौंदर्य खुलले

सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हिरवागार झाले आहे. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखले जाणारे चिखलदराचं सौंदर्य दाट धुक्यामुळं खुललं आहे. सकाळच्या वेळी घनदाट धुके या ठिकाणी पाहायला मिळत आहे. निसर्गाचा अद्भुत आनंद लुटण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात राहण्यासाठी सद्या चिखलदरा हा उत्तम पर्याय आहे.

Edited By - Nandkumar Joshi

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com