
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर सत्ताधारी भाजपसह शिंदे गट आणि अजित पवार गटावर शाब्दिक हल्ले चढवून अंगावर घेणाऱ्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आता त्यांचा मोर्चा महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसकडेच वळवला आहे. सामनातील टीकेनंतर हुकूमशाहीशी लढायचे असेल तर काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. त्याला आता काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्हाला अपयश आले तर, त्यांनाही कुठे यश मिळाले, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्यामुळं यापुढील काळात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा 'सामना' रंगण्याऐवजी विरोधक विरुद्ध विरोधक असाच 'सामना' पाहायला मिळू शकतो.
काँग्रेसला 'आरसा'
शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून एरवी सत्ताधारी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिंदे गटावर राजकीय आणि धोरणात्मक मुद्द्यावरून टीकास्त्र डागलं जातं. पण यावेळी तोफ इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसकडे वळवली.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया आघाडी कुठे आहे, अशी विचारणा होते. त्याला काँग्रेसने गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या पक्षाच्या अधिवेशनातून उत्तर द्यायला हवे होते, असं सामनात म्हटलं आहे.
त्यात चुकीचं काय?
काँग्रेसला दिलेल्या सल्ल्याबाबत संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सामनामध्ये असं म्हटलं असेल तर त्यात चुकीचं ते काय? आम्ही सर्व काँग्रेससोबत बांधील आहोत, ते इंडिया आघाडी म्हणून आहोत. एक गट म्हणून बांधील आहोत. हुकूमशाहीशी लढायचं असेल तर, काँग्रेसनं पुढाकार घ्यायला हवा. इंडिया आघाडीतील मित्रपक्षांसोबत सातत्यानं संवाद ठेवायला हवा. पण आज तो संवाद कमी झाला आहे, असं संजय राऊत म्हणाले.
सामनातील टीकेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सामनाची टीका ही निरर्थक आहे. तो काही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा कार्यक्रम नव्हता. तो काँग्रेसचा मेळावा होता. परंतु, त्यांच्या मनात काय आहे, याचा मी आज अंदाज घेऊ शकत नाही, असं वडेट्टीवार म्हणाले.
त्यांना तरी कुठे यश मिळालं?
काँग्रेसवरील टीकेनं घायाळ झालेल्या विजय वडेट्टीवारांनीही ठाकरे गटाच्या वर्मावर घाव घालण्याचा प्रयत्न केला. आम्हाला अपयश आलं तर, त्यांना तरी कुठं यश मिळालं, असा सवाल त्यांनी केला. जबाबदारी एका पक्षावर ढकलत असताना, हे आघाडीचे अपयश आहे, याची जबाबदारी आघाडीने स्वीकारली पाहिजे. कोणावरही टीका करणे म्हणजे स्वतःचा बचाव करण्यासारखे आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
एकमेकांच्या फाइल अडवा, एकमेकांची जिरवा..
भाजप नेते अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावरही वडेट्टीवार यांनी भाष्य केलं. ज्यावेळी तीन पक्षांचे प्रमुख एकत्र येतात, दिल्लीश्वर बॉस उपस्थित असतात, त्यावेळी त्यांची चर्चा होणार नाही. आता सध्या तरी महाराष्ट्रात चर्चा व्हावी, अशी काही परिस्थिती नाही. आता एकमेकांच्या फाईल अडवा, एकमेकांच्या विभागांची जिरवा, जेवढी जिरवता येते, तेवढीच जिरवा अशी परिस्थिती आहे, अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली. आम्ही तुमची फाईल अडवणार नाही, तुम्ही आमची अडवू नका आणि तुमची जिरवणार नाही, तुम्हीही जिरवू नका, अशीच बहुतेक चर्चा झाली असेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.