साताऱ्यापाठोपाठ आता मराठवड्यामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटातील पदवीधर मतदार संघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी पक्षाला घरचा आहेर देत पक्षाच्या बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. गंगापूर विधानसभा मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवतील अशी चर्चा सध्या सुरू आहे. आचारसंहिता लागू होताच त्यांनी एक प्रसिद्धीपत्रक जारी करत थेट आपल्याच सरकारविरोधात मनातील खदखद व्यक्त केली आहे.
पदवीधर आमदार असलेले सतीश चव्हाण यांची गंगापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. तशी तयारी सुरु केलेल्या सतीश चव्हाण यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला की काय? अशी चर्चा सुरू आहे. आमदार चव्हाण यांच्या पत्रकानुसार जवळपास दीड वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सरकारमध्ये सहभागी झाला, त्यानंतर राज्यातील बहूजनांचे प्रश्न सुटतील या उद्देशाने सरकारमध्ये सहभागी झालो, मात्र मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती, परंतू सरकार बहूजनांचे प्रश्न सोडवू शकले नाही, अशी खंत सतीश चव्हाण यांनी व्यक्त केली.
महत्त्वाचे म्हणजे आमदार चव्हाण यांना तिकीट मिळणार नसल्याची कुणकुण लागताच त्यांनी मराठा आरक्षणाकडे मोर्चा वळविल्याचे पत्रकातून दिसत आहे. परिपत्रकात म्हटल्यानुसार मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेल्यावर्षी नवी मुंबईतील वाशी येथे मोर्चा धडकल्यानंतर राज्य सरकारने मनोज जरांगे यांची भेट घेऊन ५४ लाख कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा बांधवांना आरक्षण देणार, कुणबी नोंदी सापडलेल्यांना सगेसोयरे प्रमाणपत्र देणार, अशा मागण्या मान्य केल्या होत्या.
मात्र त्यानंतर मराठा आंदोलनाचा प्रश्न हाताळण्यात सरकारला यश आले नाही. आजही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. आज मराठवाड्यासह महाराष्ट्रात अनेक मराठा तरुण आत्महत्या करत आहेत, या गोष्टींकडे सरकारने गांभीर्याने पाहिले नाही असे देखील आमदार चव्हाण यांनी म्हटले आहे. असे असले तरी या वर्षभरात आमदार चव्हाण यांनी ब्र का काढला नाही असा उलटा सवाल उपस्थित होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.