अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडली. अनेक आमदार शरद पवार यांना सोडून महायुतीत सहभागी झाले. अशातच हार न मानता 84 वर्षांचे शरद पवार पुन्हा नव्या जोमाने मैदानात उतरले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी 10 पैकी 8 जागांवर आपले उमेदवार निवडून आणले. आता विधानसभा निवडणुकीतही आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त आमदार निवडून यायला हवेत, असा निर्धार शरद पवार यांनी केलाय.
सध्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. या यात्रेच्या माध्यमातून ते पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असून विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. आज बुधवारी सुप्रिया सुळे यांची शिवस्वराज्य यात्रा धाराशिव येथे दाखल झाली.
यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं आणि अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) यांचं जंगी स्वागत केलं. धाराशिवमध्ये दाखल होताच दोन्ही नेते आई तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला गेले. राज्यात चांगला पाऊस पडू दे,अडचणीत आलेल्या बळीराजाला मदत मिळू दे, असं साकडं खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी तुळजाभवानीच्या चरणी घातलं.
यानंतर सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या हस्ते तुळजाभवानीची महाआरती करण्यात आली. विशेष बाब म्हणजे, यावेळी तुळजाभवानी मंदिरातील एका पुजाऱ्याने देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पवार पक्षासाठी प्रार्थना केली. ज्येष्ठ नेते शरद पवार पंतप्रधान व्हावे, अशी इच्छा पुजाऱ्याने बोलून दाखवली.
त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री होऊ दे, असं साकडंही पुजाऱ्यांने आई तुळजाभवानीच्या चरणी घातलं. यावेळी मोठ्या संख्येने शरद पवार गटाचे कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. आई तुळजाभवानीचे दर्शन घेतल्यानंतर अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी आपल्या शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.