सचिन जाधव, पुणे|ता. ११ ऑगस्ट २०२४
'देशातील एनडीए सरकार कधीही पडू शकतं आणि इंडिया आघाडीचे सरकार येऊ शकतं, आज नाही सहा महिन्याने, सहा महिन्याने नाही एक वर्षाने येईल पण इंडिया आघाडीचे सरकार नक्की येईल आणि ते चंद्राबाबू नायडू आणि नितेश कुमार यांच्या मनावर आहे,' असा सर्वात मोठा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेमध्ये ते बोलत होते.
"2019 ला ही अशीच शिवस्वराज्य यात्रा काढली होती. तेव्हा लोक म्हणायचे की आपले 22 आमदार येतील. आम्ही यात्रा काढली आणि कष्ट केल्याने 54 आमदार निवडून आणले. पक्ष फुटल्यानंतर लोक आम्हाला खाजगीत बोलायचे की तुमचं आता काही खरं नाही, पण शरद पवार यांच्या नावाची ताकद कळली. लोकसभेला आम्ही चार पावले मागे घेतले आणि मित्र पक्षांना जागा सोडल्या, लोकसभेला आमचे ८ खासदार निवडून आले," असे जयंत पाटील म्हणाले.
"आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी सरकार म्हणत नाहीत, आता एनडीए सरकार म्हणतात. नितेश कुमार यांनी एवढ्यांदा पलटी मारली आहे की गडी पुन्हा कधी पलटी मारेल ते मोदी साहेबांना देखील कळणार नाही. चंद्राबाबू नायडूदेखील काही वेगळे नाहीत. भाजपने सहा महिन्यापूर्वी या दोन्ही नेत्यांना शिव्या घातल्या त्यांच्याकडे भीक मागण्याची पाळी आली आणि या दोघांमुळे भारताचे सरकार उभे आहे," असा घणाघात जयंत पाटील यांनी केला.
"देशात एनडीएचे सरकार कधीही पडू शकतं आणि इंडिया आघाडीचे सरकार येऊ शकते. आज नाही सहा महिन्याने, सहा महिन्याने नाही एक वर्षाने येईल. पण सरकार इंडिया आघाडीचे नक्की येईल. ते चंद्रबाबू नायडू आणि नितेश कुमार यांच्या मनावर आहे. लोकसभेला बहिणीच्या एवढं पाठीमागे लागले की बहिणीवर काहीच प्रेम नाही असं वाटत होतं आणि आज लाडकी बहीण योजना आणत आहेत. लोकसभेचा निकाल आला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणी लाडक्या झाल्या पण हे भाऊ लाडके बहीण लाडके फक्त तीन महिन्यासाठी, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.