

महाराष्ट्रात महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात महायुती आणि जागावाटपावर चर्चा सुरू असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दिल्लीत गेले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास बैठक झाल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीत त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची स्वतः एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना माहिती दिली.
एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शिंदेंनी मोदींना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराज यांची मूर्ती भेट दिली. या बैठकीत केंद्र आणि राज्यातील अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) सर्व घटक पक्षांनी एकाच विचाराने एकत्रित राहावे आणि महायुती मजबुतीनं काम करत राहायला हवी, अशी अपेक्षा यावेळी पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्याचे समजते. यावेळी मोदींनीही एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट होती, असे सांगितले जात असले तरी, राजकीय आणि प्रशासकीय दृष्टीने या भेटीला महत्व असल्याचे मानले जात आहे. कारण या बैठकीत राज्य आणि केंद्राचे सहकार्य आणि आगामी योजनांच्या रणनीतीवरही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली. त्यांना शुभेच्छा दिल्या आणि ही सदिच्छा भेट होती, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मी दिल्लीत आलो, गावी गेलो की चर्चा होते. चर्वितचर्वण सुरूच असतं. मोदी जे देशासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी जे काही करतात त्याचा अभिमान आम्हाला सगळ्यांना आहे, असेही ते म्हणाले.
मोदींची जेव्हा भेट घेतो तेव्हा ते विकासावरच बोलत असतात. मोदींची भेट घेतल्यानंतर एनडीएचे नेते म्हणून तर आहेत, पण कुटुंबप्रमुख म्हणून भावना आहे ती आमच्या मनात आहे. बाळासाहेबांच्या आठवणींनाही त्यांनी उजाळा दिला, असेही शिंदे यांनी सांगितले. एनडीएबद्दल आणि महायुतीबद्दल अतिशय स्पष्ट मत आहे. एनडीए आणि महायुतीने मजबुतीने प्रत्येक निवडणुकांत, विकासकामांत एकत्र राहायला पाहिजे, अशी भूमिका मोदींनी घेतली आहे. जेव्हा जेव्हा बैठका होतात, तेव्हा मोदी हीच भूमिका घेतात, असेही शिंदे म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा महायुतीतील घटक पक्षांमधील नेत्यांकडून केली जात आहे. त्यावरही शिंदेंनी प्रतिक्रिया दिली. जागावाटप आणि रणनीतीवर अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांकडून घेतला जाईल. या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. त्यामुळे त्या त्या ठिकाणचे नेते, कार्यकर्त्यांना निवडणुका लढवाव्यात असे वाटत असते. पण शेवटी निर्णय हा वरिष्ठांकडून घेण्यात येतो, असेही शिंदे म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.