

सुनेत्रा पवार या अर्थशास्त्रात पदवीधर आहेत.
त्या अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात.
राजकारणाबाहेरही त्या विविध कलागुणांमध्ये पारंगत आहेत.
अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत अत्यंत साधेपणाने हा शपथविधी सोहळा लोकभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या कार्यक्रमासाठी राज्यपाल आचार्य देवव्रत,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव आणि राजशिष्टाचार अधिकारी उपस्थित होते. सुनेत्रा पवार याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार होत्या. खासदारकीच्या राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या इतर सामाजिक कामांबाबत आपण जाणून घेऊ. सुनेत्रा पवार यांनी अजितदादांच्या सामाजिक, राजकीय निर्णय प्रक्रियेत त्यांनी खंबीर साथ दिली. राजकीय नेत्यापेक्षा त्यांची एक वेगळी ओळख आहे. सुनेत्रा पवार यांचे माहेर धाराशिव जिल्ह्यातील संत गोरोबाकाकांची पावन भूमी असलेले तेर गाव. सुनेत्रा पवार यांचे वडील मराठवाडा मुक्तीसंग्रामात स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचे बंधू माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांचे दीर्घकालीन राजकारण, हे त्यांनी लहानपणापासूनच जवळून पाहिले. त्यामुळे समाजकारण आणि राजकारणाचे बाळकडू त्यांना मिळाले आहे.
सुनेत्रा पवार यांनी कला क्षेत्रातून अर्थशास्त्राची पदवी घेतलीय. शिक्षणासोबत त्या अनेक कलागुणांत पारंगत आहेत. पेंटींग, संगीत, फोटोग्राफी आणि शेती हे त्यांचे विशेष आवडीचे विषय आहेत. अजित पवार यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्या काटेवाडीतील शेतीत रमल्या. प्रसंगी स्वतः शेतात राबायला सुरुवात केली. त्यावेळी काटेवाडी, कण्हेरीतील कष्टकरी वर्गाशी त्यांचा संपर्क आला.
दरम्यान त्या स्वतः शेतात जात. त्यांनी आपल्या कष्टाने मेहनतीनं काटेवाडीची शेती फुलवली. केवळ शेतीच नाही तर आधीची दहा हजार पक्षांची पोल्ट्री त्यांनी एक लाखावर नेली. शारदा दूध डेअरीत देखील लक्ष घालून दूध संकलन वाढवलं. राज्य शासनाच्या स्वच्छता अभियानात मोलाचा सहभाग घेवून स्वत:चे गाव काटेवाडी राज्यात सर्वप्रथम आणले. सोबतच त्यांनी निर्मल ग्रामची चळवळ यशस्वी करण्यात मोठा सहभाग नोंदवला.
विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या व्यवस्थापन समितीच्या सदस्य, त्यानंतर याच विद्यापिठाच्या सिनेट सदस्यपदी त्यांना संधी मिळाली. या सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या. सन 2002 पर्यंत त्यांच्या काटेवाडी गावातील चित्र विदारक होते. गावात घाणीमुळे आणि परिपूर्ण आरोग्य सेवेची सोयच नसल्याने गावात अनारोग्याचे वातावरण होते.
त्यामुळे अनेक दुखण्यांनी आजारी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय होती. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांनी ग्रामस्थांमध्ये आत्मविश्वासाचे बीज पेरून ग्रामविकासाची चळवळ सुरु केली. त्यांनी हाती घेतलेल्या ग्रामविकासाच्या कामातून काटेवाडी निर्मलग्राम, यशवंतग्राम, तंटामुक्तग्राम, विमाग्राम, देशातील पहिले सायबरग्राम, कृषिग्राम आणि पर्यावरणग्राम झाले. पुढे ग्रामपंचायतसह, प्राथमिक शाळा, अंगणवाडीला आय.एस.ओ. मानांकन देखील मिळाले. गावच्या दोन महिला सरपंचांचा आदर्श सरपंच पुरस्काराने गौरव, शिक्षकांचा राष्ट्रपती पुरस्काराने गौरव, या अभियानातून प्रेरणा आणि बळ मिळाल्याने कृषिविकास झाल्याने शेतकऱ्यांचा तसेच शैक्षणिक विकास झाल्याने विद्यार्थ्यांचा विविध पातळीवर गौरव झाला.
शैक्षणिक विकासासाठी ’शाळा प्रवेश उत्सव दिन’ उपक्रम सुरू केला, जो पुढे राज्य सरकारचा अधिकृत कार्यक्रम झाला. गाव हागणदारीमुक्त त्यांनी प्रयत्न केले. पिण्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेत फिल्टर प्लँट बसवणारी आणि भूमिगत गटार योजना राबवणारी काटेवाडी पहिली ग्रामपंचायत ठरली. ’झीरो बॅलन्स अकाउंट’ची ’जनधन योजना’ 2014 नंतर आली. मात्र त्यापूर्वीच सात वर्षांपूर्वी काटेवाडीत राष्ट्रीयीकृत बँकेशी सामंजस्य करार करून ’झीरो बॅलन्स’ची अनेक बँक खाती उघडली गेली. बँक सुविधा केंद्राची देशाला देणगी दिली. काठेवाडीत भारतातील प्रथमच वाय मॅक्सच्या माध्यमातून महा ई -सेवा केंद्रांचा प्रारंभ झाला .
चूल, मूल आणि शेत एवढ्याच परिघात असणाऱ्या महिलांना संघटित करून त्यांच्यातील ’स्वत्व’ जागृत केले. त्यांना या चळवळीत सक्रिय केले. ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद करून घरांवर महिलांची मालकी निर्माण केली. घराच्या दारावर महिलांच्याही नावाच्या पाट्या लावल्या, ज्यामुळे खऱ्या अर्थाने तमाम महिलांना ’मालकीण’ केले.
सुनेत्रावहिनी पवार काटेवाडी, बारामतीशी एकरूप झाल्या त्याला 41 वर्ष झाली. एवढ्या वर्षात त्यांनी आदणीय पवारसाहेब, सुप्रियाताई, अजितदादा यांच्यापैकी कोणाचीही निवडणूक असो, त्या प्रत्येक निवडणुकीत त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गाव, वाडी, वस्ती पालथी घातली. सामाजिक कार्याच्या वेगवेगळ्या उपक्रमातून त्यांचा स्वतःचा बारामती शहरासह तालुक्यातील गावागावात थेट संपर्क निर्माण झाला होता. त्या संपर्काच्या बळावर त्यांनी या सर्वांच्या निवडणुकीत वेळोवेळी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.