अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले. दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली. यात शरद पवार यांच्या पक्षाला मोठं यश मिळालं. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाला सपाटून मार खावा लागला. आता अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पुन्हा शरद पवारांकडे परतीच्या वाटेवर आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार (Ajit Pawar) गटातील अनेक आमदार पुन्हा परत येण्यासाठी शरद पवारांकडे संपर्क करीत आहेत. मात्र, यातील काही नेत्यांना पक्षात घेण्यास शरद पवार गटातील नेत्यांचा विरोध आहे. आमदार बबन शिंदे आणि अभिजित पाटील यांना पुन्हा पक्षात घेण्यास शरद पवार गटाचे नेते संजय कोकाटे यांनी विरोध केलाय.
आमदार बनन शिंदे सध्या माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता ते शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत.
दुसरीकडे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंढरपूरचे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी सुद्धा अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला होता. आता हे दोन्ही नेते पुन्हा शरद पवार यांच्याकडे परतीच्या वाटेवर आहेत.
मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाला आणि उमेदवारीला पक्षातील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी विरोध केलाय. आमदार बबन शिंदे आणि अभिजित पाटील पुन्हा शरद पवार गटात येणार असतील, तर आम्ही दुसऱ्या पक्षात जाणार असा थेट इशाराच माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते संजय कोकाटे यांनी दिला आहे.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अभिजीत पाटील व माढ्याचे आमदार बबन शिंदे यांनी शरदचंद्र पवार पक्षाच्या विरोधात काम केले होते. लोकसभा निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे हे अलीकडेच शरद पवार यांना भेटले होते. तर अभिजीत पाटील यांनी ऐनवेळी शरद पवारांची साथ सोडून भाजपला पाठिंबा दिला होता.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमदार बबन शिंदे व अभिजीत पाटील हे दोन्हीही नेते विधानसभेसाठी शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मात्र,माढ्यातील शरदचंद्र पवार पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी दोघांनाही विरोध केल्याने शरद पवार गटाची डोकेदुखी वाढली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.