काँग्रेस पक्षातून (Congress Party) निलंबित करण्यात आलेले संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी आज पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'संजय राऊत हे खिचडी घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार.', असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले. याच मुद्द्यावर पत्रकार परिषद घेत संजय निरुपम यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी थेट अमोल किर्तीकर आणि संजय राऊत यांच्यासोबत ठाकरे गटावर निशाणा साधला आहे.
संजय निरुपम यांनी सांगितले की, 'शिवसेनेचे उमेदवाराला खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने बोलावले आहे. तपासानंतर ईडी काय करेल मला माहित नाही. पण कारवाई झाली पाहिजे असे मला वाटते. किती मोठा चोर किती बेईमान केली. या घोटाळ्यावर काम करायला मी सुरुवात केली तर मास्टरमाईड कोणी वेगळाच आहे. राजकारणात कुटुंबाला आणणं योग्य नाही. पण खिचडी घोटाळ्यातील मुख्य आरोपी संजय राऊत हेच मुख्य सूत्रधार आहेत.', असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
त्याचसोबत, 'पत्राचाळमध्ये देखील त्यांनी पैसे घेतले, त्यांच्या पत्नीने देखील पैसे घेतले, त्यांच्या भावाने देखील पैसे घेतले. सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनीने ६ कोटी रुपयांत खिचडी पुरवण्याचे कंत्राट घेतले होते. याच कंपनीकडून संजय राऊत आणि त्यांच्या परिवाराने १ कोटी दलाली घेतली. संजय राऊत यांची मुलगी विधिता राऊतच्या बँक अकाऊंटवर पैसे आले आहेत. पहिली दलाली मे 2020 मध्ये घेण्यात आली. संदीप राजाराम राऊत यांच्या खात्यात देखील दलालीचे पैसे जमा झाले. सुजित मुकुंद पाटकर यांच्या खात्यात देखील दलालीचे पैसे जमा झाले.', असा देखील आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.
'हा सगळा खिचडी घोटाळा तेव्हा झाला जेव्हा तत्कालिन मुख्यमंत्री दर दोन दिवसाला फेसबुक लाईव्ह येऊन बोलत होते. आज इडी जो तपास करत आहे त्यात पुढे जाऊन सह्याद्री रिफ्रेशमेंटचा देखील तपास करून संजय राऊत यांना अटक करावी.', अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे. त्याचसोबत, 'आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी गरिबांसाठी एक पक्ष स्थापन केला. पण आता त्याच पक्षातील लोकांनी खिचडी चोरी केली. मराठी माणसाला कळेल की हे फक्त मराठी माणसाच्या नावावर आणि गरिबांच्या नावावरून राजकारण करत आहेत.'
'भाषा आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांना पराभूत करा. लोकांनी बाहेर येऊन मतदान करून त्यांना पराभूत केलं पाहिजे.', असे आवाहन यावेळी संजय निरुपम यांनी जनतेला केले आहे. संजय निरुपम हे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. यावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, 'अजून खरवास मास सुरू असून नवरात्र उद्यापासून सुरू होणार आहे. त्यानंतर माझा निर्णय घेतला जाईल.' यावेळी संजय निरुपम यांनी मनसेवर देखील प्रतिक्रिया देत सांगितले की, 'लोकांना बोलण्याचा अधिकार आहे. लोकशाही आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मी मराठी माणसाच्या विरोधात बोललो. मात्र तसं नाही. मराठी माणसांच्या नावावर चुकीचे करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात माझी भूमिका असते.' असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.