ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागू नये यासाठी जालना येथे उपोषणाला बसलेले ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके (MLA Laxman Hake) यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'जरांगे धमक्या देऊ नका, छगन भुजबळ- पंकजा मुंडेंना टार्गेट करणं बंद करा. आमच्या नेत्यांवर बोलू नका. हा लक्ष्मण हाके तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी तयार असेल.', असा थेट इशारा लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांना दिला आहे. यासोबतच, जरांगेंनी आरक्षणाचा थोडासा अभ्यास करावा, असा सल्ला देखील त्यांनी यावेळी दिला आहे.
लक्ष्मण हाके यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. भुजबळांना टार्गेट करणाऱ्या जरांगेवर टीका करत लक्ष्मण हाके यांनी अनेक प्रश्न विचारले. '७० वर्षे कुणाचं खायचा प्रश्न येत नाही. २७-२८ वर्षांत काय मिळाले आहे. ते नेहमी छगन भुजबळांना टार्गेट करून बोलतात. भुजबळ तू सगळं खालं असे ते म्हणतात. या जरांगेंना माझा एक सवाल आहे. एकनाथ शिंदे मुंख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा या राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा जास्त ओबीसींना १०० टक्क्यापैकी १ टक्केसुद्धा बजेट या महाराष्ट्राने राबवले नाही. आमदार कोण, खासदार कोण, मुख्यमंत्री कोण सगळे मराठेच आहेत ना. ओबीसींना १ टक्कासुद्धा बजेट देत नाहीत आणि कुणी कुणाचा खायचा प्रश्न येतो.जर ओबीसींनी आरक्षण खाल्ल असतं तर ओबीसीचे राज्यात ४०० कारखाने दिसले असते. राज्यात २०० साखर कारखाने आहेत. यामधील १० ते १५ कारखाने सोडले तर ९० टक्के कारखाने फक्त मराठा समाजाचे आहेत.'
ओबीसी आणि मराठवाड्यात काडी फक्त छगन भुजबळांनी लावली असा आरोप करत मनोज जरांगे पाटील यांनी भुजबळांची राजकीय कारकिर्द उद्धवस्त केल्याशिवाय राहणार नाही अशा इशारा दिला होता. यावर बोलताना हाके यांनी सांगितले की, 'राजकीय कारकिर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे. तू कोण राजकीय काारकिर्द उद्ध्वस्त करणारा. या महाराष्ट्रातला ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी हा एक झाला तर त्यांनी स्वाभिमानाला मत दिले तर येणारा काळ ठरवेल फुले-शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र काय आहे.',
मी जातीयवाद केला नाही असे म्हणणाऱ्या जरांगे पाटील यांच्यावर लक्ष्मण हाके यांनी जोरदार निशाणा साधला. 'छगन भुजबळ, लक्ष्मण हाके, प्रकाश शेंडगे, महादेव जाणकर, मुंडे बहीण-भाऊ, वडेट्टीवार असतील हे सर्वजण राज्यातील जाती उपजातीसह ४९२ जातीची भाषा बोलतात. जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलत आहात. मग नक्की जातीयवादी कोण? या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला पाहिजे.' तसंच, 'गेली ७ ते ८ महिने आम्ही शांत बसलो. आम्ही तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो. तुम्ही संविधानिक मार्गाने आंदोलनं केली ती आम्ही पाहिली. तुम्ही बीड शहर जाळले. टार्गेट करून ओबीसी नेत्यांना बदनाम केले. त्यांची हॉटेल-घरं जाळली. मग जातीयवाद कोण करतंय.', असा सवाल हाके यांनी केला आहे.
त्यासोबतच, 'जरांगेंनी थोडासा आरक्षणाचा अभ्यास करावा. मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस आहेत. जरांगे बोलताना सावधपणे आणि सल्लागाराचा योग्य सल्ला घेऊन बोलत जा.', असा सल्ला लक्ष्मण हाके यांनी दिला आहे. 'या देशांमध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांची जनतेने जिरवली आहे. यामध्ये अटलजी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचा देखील पराभव झाला आहे. तू कुठला कोण काय आहे. लोकशाहीमध्ये असल्या धमक्या देऊ नका. असे चॅलेंज आम्हाला करू नका. आमच्याकडे मॅन, मनी मसल पावर नाही. लक्ष्मण हाके प्रत्येक प्रश्नाचा प्रतिवाद करायला तयार आहे. जरांगे तुम्ही छगन भुजबळ, महादेव जानकर, मुंडे बहीण-भावांना टार्गेट करू नका.', असे देखील हाके यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.