Maharashtra Assembly Winter Session : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सीमावादाचा मुद्दा तापला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बेळगावातील महामेळावा रोखण्यासाठी कर्नाटक पोलिसांनी नेत्यांची धरपकड सुरू करण्याचा मुद्दा आणि सीमेवर महाराष्ट्रातील नेत्यांना अडवल्याच्या मुद्द्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर देतानाच, आमचं सरकार सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी उभं आहे, जी मदत लागेल ती पुरवू, अशी ठाम भूमिका फडणवीसांनी मांडली.
महाराष्ट्र राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात सीमावादाच्या मुद्द्यावरून विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने आले. यावेळी विरोधक आणि सत्ताधारी सदस्यांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. दुसरीकडे, सीमावादाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भूमिका स्पष्ट केली.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
सीमाभागातील आमच्या बांधवांच्या पाठिशी सभागृह आणि सरकार आहे. आजपर्यंत दोन राज्ये भांडत होती. पण केंद्राने लक्ष दिलं नाही. आता गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. आपल्या नेत्यांनी गृहमंत्र्यांकडे स्पष्ट भूमिका मांडली. कर्नाटक मुख्यमंत्र्यांचे ट्विट्स हे प्रक्षोभक आहेत. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ते ट्विट्स माझे नसल्याचं स्पष्ट केलं. त्या बैठकीत कुणीही वेगळा दावा करणार नाही. नागरिकांवर अत्याचार होणार नाही, वाहनांवर दगडफेक होणार नाही,असं ठरल्याचंही फडणवीस यांनी सांगितले. त्या बैठकीत तीन-तीन मंत्री नेमायचे. दोन राज्यात समन्वय राहिलं पाहिजे, असेही ते म्हणाले.
आज जे आंदोलन होते, त्यात अनेक नागरिक आणि आमदार होते. काहींना अटक करण्यात आली. त्यांना आम्ही सोडवूनच आणू. आम्हाला तिथे लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र कर्नाटक सरकारने चुकीच्या पद्धतीने ही अटक केलेली आहे.
कर्नाटक ज्या पद्धतीने सर्वपक्षीय एक भूमिका घेत आहे. तशी भूमिका आपणही घेतली पाहिजे. आंदोलन रोखण्याचा आणि अटकेचा निषेध आम्ही कळवणार आहोत, अशी ठाम भूमिका उपमुख्यमंत्र्यांनी मांडली.
मुख्यमंत्री हे स्वत: सीमाभागातील लढ्यात सहभागी होते. आम्ही सरकार आणि सभागृह सीमाभागातील मराठी बांधवांच्या मागे उभे आहोत. जी-जी मदत हवी, ती सरकार पुरवेल, असेही फडणवीसांनी सांगितले.
सीमाभागातील गावांना भडकावण्यामागे राजकीय हेतू
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीमाभागावर ठाम भूमिका मांडतानाच, तेथील नागरिकांसाठी योजनांवर काम करत आहोत, असं सांगितलं. सीमा भागातील गावांना सोयीसुविधा देण्यासंदर्भात आम्ही योजना आखत आहोत. तेथील गावांना भडकावण्यामागे राजकीय हेतू असल्याचे समोर आल्याचेही यावेळी फडणवीस म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.