पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात तीन जाहीर सभा घेणार आहेत. मोदी सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगरला जाणार आहेत. संभाजीनगरमध्ये आज एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या सभा होणार आहेत. नरेंद्र मोदी यांची सभा सकाळी ११.३० वाजता चिकलठाणा एमआयडीतील ग्रॅहम फर्थ कंपनीच्या मैदानावर, तर ठाकरे यांची सभा सायंकाळी ६ वाजता मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होईल. दोन्ही नेते एकाच दिवशी संभाजीनगर शहरात प्रचारसभा घेण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जवळपास २५०० पोलीस, तर ठाकरे यांच्या सभेसाठी ६०० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मात्र, शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी २०० पोलीस तैनात असतील. दोन्ही नेते एकाच दिवशी येत असल्याने दोन्ही पक्षांनी शक्ती प्रदर्शनाची जय्यत तयारी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या सभेमुळे आज संभाजीनगर शहरातील जालना रोडवरील केंब्रिज चौक ते वसंतराव नाईक चौक यादरम्यानचा रस्ता दुपारी १२ ते ४ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. ही वाहतूक केंब्रिज चौकातून वळविली आहे. त्याचबरोबर जालना रोडवर विमानतळ ते सभास्थळ यादरमयान वाहतूक सुमारे ४ तासांसाठी बंद असेल. या कालावधीत रस्त्यांच्या दोन्ही बाजूंचा परिसर नो पार्किंग झोन असणार आहे.
सभेसाठी गर्दी होणार असल्याने त्या परिसरातील पीएसबीए, एसबीओए या शाळांनी सुट्टी दिली आहे. परंतु या परिसरात इतर शाळेत बाल दिन असल्यामुळे अर्ध्या कालावधीसाठी सुरू असतील. ओपीडी आणि रुग्णालयातील इतर सर्व सुविधा सुरू राहणार आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी पनवेलमध्ये दुपारी ४.३० वाजता जाहीर सभेला संबोधित करतील. पंतप्रधानांची आजची शेवटची जाहीर सभा मुंबईत शिवाजी पार्कात सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात सर्व २८८ विधानसभा जागांवर मतदान होत आहे. त्याचा निकाल २३ नोव्हेंबरला लागणार आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथे होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी मंगळवारी वाहतूक निर्बंधाबाबत मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस यांच्यासह १४ नोव्हेंबरला दादरच्या शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या जाहीर सभेत मोठ्या संख्येने समर्थक जमू शकतात.
वेस्टर्न आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून सभेच्या ठिकाणी मोठ्या संख्येने वाहने येण्याची शक्यता आहे. या काळात मुंबईकरांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी दादर आणि आजूबाजूच्या १४ मार्गांवरील वाहनांसाठी आज म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक निर्बंध राहणार आहेत. या काळात वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे.
Written By: Dhanshri Shintre.