कल्पेश गोर्डे
Thane News Today: ठाण्याच्या दिव्या खाली अंधार ही म्हण आता हळूहळू खरी होत चालली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाण्यातील एकट्या दिवा शहरात ५८ शाळा आहेत त्यापैकी तब्बल ४३ शाळा या अनधिकृत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला त्यानंतर एकच खळबळ उडाली. या अनधिकृत शाळांवर ठाणे महानगर पालिकेकडून कारवाई करत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा तर दाखल केला. पण या अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी आणि पालकांसमोर मात्र एक भले मोठे आव्हान उभे ठाकले आहे. (Latest Marathi News)
या शाळांवर महापालिका शिक्षण विभागाकडून कारवाई तर झाली परंतु विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून या शाळांना सील ठोकले पाहिजे अशी मागणी शैक्षणिक सामाजिक संस्थांकडून केली जात आहे. एकीकडे पालिका प्रशासनाने शाळांवर कारवाई केली मात्र या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या जवळपास १५ हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि शैक्षणिक वर्षाचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.
ठाणे (Thane) महानगर पालिकेच्या हद्दीतील दिवा शहरात ४३ शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या घटनेनंतर ठाणे महानगर पालिकेच्या शिक्षण विभागाकडून या शाळांना (School) वेळोवेळी नोटीस बजावल्या आणि नियमांचे पालन न केल्याने महापालिकेच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोप करत मुंब्रा पोलीस (Police) ठाण्यात भादवि कलम १८८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
मात्र महापालिकेकडून अनधिकृत शाळांवर झालेली ही कारवाई औपचारिकता आणि दाखवण्यापुरती असल्याचा आरोप ठाणे जिल्हा मर्यादित महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टी असोशियन या संस्थेचे अध्यक्ष नरेश पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. आजच्या शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता भाजीपाल्यासारख्या अनधिकृत शाळा सुरु झाल्या आहेत.
त्यावर महापालिका शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषद विभागाने जातीने लक्ष देऊन कडक कारवाई केली जावी अशी मागणी देखील मेस्टाच्या माध्यमातून केली आहे. त्या करीत या संस्थेच्या माध्यमातून महापालिकेच्या संबंधित विभागाला अनधिकृत शाळा आणि आरटीई संदर्भात वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच संदर्भात शिक्षण मंत्री दीपक केसरकर, शिक्षण विभागाकडे याची लेखी पत्रव्यवहार केला आहे. सदर पालिकेकडून झालेली हि कारवाई थातुरमातुर असून कठोर पाऊले उचलली पाहिजे अशी मागणी मेस्टा मार्फत करण्यात आली आहे.
दिव्यातील ४३ अनाधिकृत शाळांमध्ये अंदाजे १२ ते १५ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या अनधिकृत शाळांवर कारवाई नंतर या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष दावणीला लागणार आहे. या विद्यार्थ्यांचे पुढे काय होणार यावर मार्ग काढण्यासाठी दिव्यातील १५ अधिकृत शाळांनी या विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी अधिकृत शाळांकडून पालकांचा भार कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना फी मध्ये माफी, गणवेशासाठी आणि पुस्तकांसाठी कुठलीही सक्ती राहणार नसल्याचे मेस्टा समाविष्ट अधिकृत शाळांकडून सांगण्यात आले आहे.
संपूर्ण दिवा हा अनधिकृतपणे उभा असून दिव्यात अनधिकृतपणाचा भस्मासुर आहे. त्यात येथील ४३ शाळा अनधिकृत समोर आल्या आहेत. या ४३ अनधिकृत शाळा सुरु होईपर्यंत ठाणे महानगर पालिका शिक्षण विभाग झोपले होते का? असा सवाल भाजप दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी उपस्थित केला आहे.
हे अधिकारी एसीत बसून पाकीट घेऊन विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप देखील मुंडे यांनी केला आहे. या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच काय? दिवा आहे म्हणून त्याला कायम अंधारातच ठेवणार का? या शाळांवर तातडीने कारवाई करून या शाळा बंद झाल्या पाहिजे आणि त्या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने आणि महापालिका प्रशासनाने त्यांची व्यवस्था दुसऱ्या शाळांमध्ये करून द्यावे अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.