Koregaon Bhima Shaurya Din: कोरेगाव भीमामध्ये 207 व्या शौर्यदिनाचा उत्साह, अभिवादनासाठी लाखो अनुयायी दाखल, जाणून घ्या ऐतिहासिक महत्व

Koregaon Bhima Shaurya Din 2025: कोरेगाव भीमा याठिकाणी शौर्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. याठिकाणी असणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी फक्त राज्यातूनच नाही तर देशभरातून आलेल्या आंबेडकर अनुयायांनी मोठी गर्दी केली आहे.
Koregaon Bhima Shaurya Din: कोरेगाव भीमामध्ये 207 व्या शौर्यदिनाचा उत्साह, अभिवादनासाठी लाखो अनुयायी दाखल, जाणून घ्या ऐतिहासिक महत्व
Koregaon Bhima Shaurya Din 2025Saam Tv
Published On

207th Shaurya Din celebration:

पुण्यामधील कोरेगाव भीमा याठिकाणी आज 207 वा शौर्यदिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जात आहे. शौर्यदिनानिमित्त कोरेगाव भीमा याठिकाणी असणाऱ्या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी फक्त राज्यभरातून नाही तर देशभरातून आलेल्या लाखो अनुयायींनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासूनच विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी अनुयायींनी रांगा लावल्या आहेत. याठिकाणी मोठ्या उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

विजयस्तंभाला आकर्षक सजावट -

कोरेगाव भीमा याठिकाणी ऐतिहासिक विजयस्तंभाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी संविधानाचा अमृतमोहत्सव असल्यामुळे विजयस्तंभावर संविधानाच्या प्रतिकृतीची सजावट करण्यात आली आहे. या ७५ फुटी ऐतिहासिक विजयस्तंभाला ५० हजार कृत्रिम आणि १ हजार किलो खऱ्या फुलांनी सजावट करण्यात आली आहे. या विजयस्तंभावर फुलांपासून अशोकचक्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आणि संविधानाचे तैलचित्र तयार करण्यात आले असून ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त -

कोरेगाव भीमा या ठिकाणी शौर्य दिनानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. याठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या ठिकाणी तब्बल ५ हजार पोलीस सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ५० पोलिस टॉवर, १० ड्रोनची याठिकाणी नजर असणार आहे. तसंच, चोरी रोखण्यासाठी विशेष पोलिस पथक देखील तैनात करण्यात आले आहे.

प्रकाश आंबेडकरांनी केलं अभिवादन -

विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी राजकीय नेत्यांपासून सामाजिक कार्यकर्ते देखील येत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी देखील विजयस्तंभाला अभिवादन केले. त्यांनी सांगितले की, 'दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. भीमा कोरेगावचा जो संघर्ष आहे तो शारीरिकरित्या संपला असला तरी मानसिकरित्या अजूनही सुरूच आहे असं मी मानतो. या देशात जोपर्यंत मानसिक संघर्ष सुरू राहील, तोपर्यंत मानवतेच्या दृष्टीकोणातून जे-जे मानवतेची प्रतिके आहेत तिथे अभिवादन करण्यासाठी लोकं येत राहतील. मानवतेच्या बाबतीत आपली प्रतिबद्धता ते दाखवत राहतील.' तसेच यावेळी त्यांनी सर्वांना नवीन वर्षांच्या शुभेच्छाही दिल्या.

शौर्यदिनामागचा इतिहास काय आहे?

कोरेगाव भीमा इथे १ जानेवारी १८१८ मध्ये एक ऐतिहासिक लढाई झाली होती. ही लढाई इंग्रज आणि पेशव्यांमध्ये झाली होती. महार समाजातील सैन्याच्या जोरावर इंग्रजांनी पेशवाईविरुद्ध युद्ध पुकारले होते. महार समाजातील सैन्यांच्या पराक्रमामुळे ब्रिटीशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. हे युद्ध इंग्रजांनी जिंकल्यानंतर त्यांनी या लढाईच्या स्मरणार्थ कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ बांधला होता.

१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजयस्तंभाला भेट देऊन हा इतिसाह पुढे आणला. तेव्हापासून याठिकाणी शौर्यदिन साजरा करण्यास सुरूवात झाली. दरवर्षी कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी मोठ्या संख्येने राज्यासह देशभरातील आंबेडकर अनुयायी येतात आणि विजयस्तंभाला अभिवादन करत शौर्यदिन साजरा करतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com