खानापूरमध्ये जमीन वादातून घरावर हल्ला व जेसीबीने तोडफोड
२५ ते ३० जणांविरोधात गुन्हा; सुमारे ५० लाखांचा ऐवज लंपास
दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल
परिसरात तणावाचे वातावरण कायम
रणजित माजगावकर, कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथील खानापूरमध्ये जमिनीच्या वादातून थरारक प्रकार घडला आहे. सरस्वती नामदेव चव्हाण यांच्या घरावर तब्बल २५ ते ३० जणांनी हल्ला करत जेसीबीच्या साहाय्याने घर जमीनदोस्त केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भुदरगड पोलिस ठाणे येथे परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून परिसरात तणावाचे वातावरण आहे.
गुरुवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सरस्वती चव्हाण आणि त्यांचा मुलगा राजेंद्र घरी असताना संशयितांनी घरात घुसून लोखंडी रॉडने मारहाण केली. राजेंद्र यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावण्यात आली. मारहाणीत जखमी झालेल्या जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर दुपारी खानापूर येथील गट क्रमांक ३३२ मधील राहते घर पृथ्वीराज घाडगे, संजय देसाई यांच्यासह २५ ते ३० जणांनी दहशत निर्माण करत जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केले.
घरातील जमिनीच्या वाटणीपत्राचे स्टॅम्प, पाच तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, तीन तोळ्यांची चेन, दोन तोळ्यांचे ब्रेसलेट, तीन तोळ्यांच्या अंगठ्या आणि तब्बल नऊ लाखांची रोकड असा सुमारे ५० लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची फिर्याद देण्यात आली आहे. पोलिसांनी बजरंग पांडुरंग देसाई, पृथ्वीराज दिनेश घाडगे, संजय अमृत देसाई यांच्यासह इतर २५ ते ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपविभागीय अधिकारी रामदास इंगवले यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, दुसऱ्या बाजूने बजरंग देसाई यांच्या फिर्यादीवरून जितेंद्र चव्हाण, राजेंद्र चव्हाण, सरस्वती चव्हाण आणि अन्य एकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खानापूर परिसरात तणाव निर्माण झाला असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.