अभिजित देशमुख
कल्याण : मागील आठवड्यात लोकल ट्रेनमध्ये २० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग सापडली होती. इतकी मोठी रक्कम कोणाची याबाबत कल्याण रेल्वे पोलिसांकडून शोध सुरु होता. दरम्यान या २० लाख रुपयांच्या रोकडचा मालक आता पोलिसांसमोर आला आहे. मात्र कल्याण रेल्वे पोलिसांनी सदरच्या रकमेचा तपशील मागविला असून त्या अनुषंगाने पोलिसांनी देखील तपास सुरु केला आहे.
कल्याण (Kalyan News) रेल्वे पोलिसांकडे मागील आठवड्यात काही प्रवाशांनी एक बेवारस बॅग आणून दिली. कसारा सीएसटी लोकलमध्ये आसनगावजवळ डब्यात सापडलेल्या या बॅगेत २० लाख रुपयांची रोकड होती. ही रोकड ताब्यात घेत पोलिसांनी पैसे जप्त करुन त्याचा पुढील तपास सुरु केला होता. कल्याण रेल्वे पोलिस (Railway Police) ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ कांदे यांनी ही रोकड कुणाची आहे? याचा शोध घेण्यासाठी तीन पथके नेमली. स्टेशन परीसरातील सीसीटीव्ही तपासण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान मुंब्रा येथे राहणाऱ्या एका इसमाने हे पैसे आपले असल्याचा दावा केला.
मात्र पोलिसांनी या रकमेबाबत तपशील व इतर माहिती घेऊन येण्यास सांगितले, त्यानंतर हा इसम परतला नाही. त्यानंतर सचिन बोरसे नावाचा इसम पुढे आला. बोरसे हे धुळ्यातील राहणारे असून ते ठेकेदार आहेत. त्याचे कुटुंबिय मुंबई येथील चर्चगेट परिसरात राहतात. सचिन बोरसे यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी पैसे लागणार असल्याने पैसे घेऊन मुंबईला येत होते. कसाराहून त्यांनी कल्याणसाठी लोकल ट्रेन पकडली. आसनगाव रेल्वे स्थानक येण्यापूर्वी त्यांना झाेप लागली. याच वेळी काही तरुण गाडीत चढले. संशय आल्याने यामधील एका तरुणाने बॅग कल्याण रेल्वे स्थानकात उतरवून घेतली. त्यामध्ये पैसे दिसल्याने त्याने ती पोलिसात जमा केल्याचे सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. कल्याण रेल्वे पोलिसांनी सचिन बोरसे यांनी सांगितल्याप्रमाणे या संदर्भातील प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास आत्ता कल्याण रेल्वे पोलिस करीत आहेत
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.