जळगाव : मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्प बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत ‘सुकन्या समृद्धी’ ही विशेष गुंतवणूक योजना सुरू केली आहे. या योजनेला प्रतिसाद चांगला मिळत आहे. पोस्टाच्या (Jalgaon) जळगाव व भुसावळ (Bhusawal) विभाग मिळून आतापर्यंत ९३ हजार २९० मुलींच्या नावे सुकन्या खाते उघडण्यात आली आहेत. (Live Marathi News)
भारतीय डाक विभागाने सामाजिक बांधिलकी म्हणून नवीन योजना व तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. विशेष म्हणजे, मागे पडत असलेल्या टपाल कार्यालयाच्या सेवा सर्वसामान्य व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करीत आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र शासनाने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मासिक पाच हजार गुंतवा, मिळवा २५ लाख
सध्या सुकन्या समृद्धी योजनेवर ७.६ टक्के व्याजदर निश्चित केला आहे. या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त १.५० लाख रुपये, तर किमान २५० रुपये जमा करता येतात. सध्या सुरू असलेला व्याजदर कायम राहिल्यास आणि १४ वर्षांसाठी दरमहा पाच हजार रुपये किंवा वार्षिक ६० हजार रुपये गुंतविले, तर १५ वर्षांसाठी ६० हजारांच्या वार्षिक गुंतवणुकीवर एकूण योगदान नऊ लाख रुपये असेल. नंतर पुढील सहा वर्षांसाठी त्या रकमेवरील परतावा वार्षिक ७.६ टक्के चक्रवाढ होईल. २१ वर्षांच्या म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे २५ लाख ४६ हजार ६२ रुपये असेल. जळगाव जिल्ह्यात पोस्टाच्या या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जळगाव विभागातून ४८ हजार ९५० व भुसावळ विभागातून ४४ हजार ३४० खाते सुरू झाले आहेत.