जळगाव : पहिल्या व दुसऱ्या लाटेतही हॉटस्पॉट बनलेल्या जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटने बाधित आणखी सहा रुग्णांची भर पडली आहे. असे असले तरी हे सर्व रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यापैकी एकालाही ऑक्सिजन लावण्याची गरज भासली नाही. (jalgaon-news-six-Delta-Plus-patients-also-in-Jalgaon-district)
कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासूनच जळगाव जिल्हा संसर्गाचा ‘हॉटस्पॉट’ बनला होता. पहिल्या व दुसऱ्या लाटेत संसर्गाची तीव्रता अधिक असलेल्या देशातील निवडक जिल्ह्यांत जळगाव जिल्ह्याचे नाव अग्रभागी होते.
लाट ओसरली, चिंता कायम
या दोन्ही लाटांचा सामना प्रशासन व नागरिकांनी मिळून समर्थपणे केला. आता गेल्या महिन्यापासून दुसरी लाट ओसरू लागली आहे. ती पूर्णपणे ओसरत असताना ‘डेल्टा प्लस’ व्हेरिएंटने बाधित आणखी सहा रुग्ण समोर आले आहेत. याआधीही जिल्ह्यात ‘डेल्टा’ बाधित सात रुग्ण आढळले होते. गेल्या जूनमध्ये पारोळा तालुक्यातील एकाच गावातील हे सात रुग्ण होते. त्यामुळे ‘डेल्टा प्लस’ बाधित आतापर्यंत १३ रुग्णांची जिल्ह्यात नोंद झाली आहे.
जळगावसह जामनेरात
सद्य:स्थितीत नव्याने आढळून आलेल्या ‘डेल्टा प्लस’ बाधित रुग्णांमध्ये जळगाव मनपा क्षेत्रातील दोन, जामनेरातील तीन व पारोळा येथील एका रुग्णाचा समावेश आहे. पारोळा येथील रुग्ण लक्षणेविरहित होता, तर जळगाव व जामनेरातील रुग्णांना सौम्य लक्षणे होती. हे सर्व रुग्ण गृहविलगीकरणात होते, त्यापैकी कुणालाही ऑक्सिजनची गरज भासली नाही. सर्वच्या सर्व रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. पैकी पारोळा येथील रुग्णाने कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस बाधित झाल्यानंतर घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
चिंतेचे कारण नाही
विषाणूने जनुकीय रचना बदलत राहणे हा त्या विषाणूचा नैसर्गिक जीवनक्रमाचा भाग आहे. त्यामुळे ‘डेल्टा प्लस’ बाधित रुग्ण आढळून आले असले तरी नागरिकांनी चिंता न बाळगता कोरोनासंबंधी नियम पाळणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी केले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.