जळगाव जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव जिल्हा विकासात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्नशील : पालकमंत्री गुलाबराव पाटील
Published On

जळगाव : कोरोना विषाणूला जिल्ह्यातून हद्दपार करण्याबरोबरच जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करुन जिल्हा विकासाच्या बाबतीत अग्रेसर राहील, याकरीता प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज केले. (Jalgaon-news-independence-day-2021-celebreation-gulabrao-patil-jalgaon-collector-office)

भारतीय स्वातंत्र्याचा 74 वा वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, महापौर जयश्री महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे, भारतीय प्रशासकीय सेवेतील परिविक्षाधीन अधिकारी नेहा भोसले, जळगाव शहर महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील आदिंसह स्वातंत्र्यसैनिक, ज्येष्ठ नागरीक, कोरोनायोध्दे, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, विविध शासकीय ‍विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरीक, माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

लोकशाही आणखी बळकट करू या

पालकमंत्री पाटील म्हणाले, की आपल्या देशाच्या स्वातंत्र्याकरीता अनेकांनी आपले बलीदान दिले आहे. अनेक ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला. या स्वातंत्र्य सैनिकांच्या सर्वांगीण प्रयत्नांमुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. भारतीय स्वातंत्र्यासाठी ही मोठी अतुलनीय बाब ठरणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याबरोबर जगातील अनेक देशांना स्वातंत्र्य मिळाले. या देशांनी सुरवातीला लोकशाहीचा स्वीकार केला. कालांतराने या देशांना लोकशाहीची मूल्य जोपासता आली नाहीत. ती मूल्ये आपल्या भारत देशातील प्रत्येक नागरिकाने जोपासली आहेत. त्यामुळेच भारतासारखा विशालकाय देश एकसंघ राहू शकला. ही सर्व कमाल आपल्या लोकशाहीची आहे. म्हणूनच आपण आजपासून भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास सुरुवात करून लोकशाहीला आणखी बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.

राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार

मागील काळात आपल्या जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत होता. जिल्हा प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे आता तो कमी झाला आहे. मात्र, दुसरे संकट आपल्यासमोर निर्माण होवू पाहत आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिली आहे. माझा बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. जून, जुलैत म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. मात्र, ऑगस्टच्या 15 दिवसानंतरही पाऊस रुसलाच आहे. असेच चित्र राहिले, तर नैसर्गिक आपत्ती ओढावण्याची चिन्हे आहेत. मात्र, शेतकरी, नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

जिल्ह्यात खरीप हंगामात विविध पिकांची चांगल्याप्रकारे पेरणी झाली आहे. त्यासाठी लागणारी खते मुबलक उपलब्ध आहे. सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस पडलेला आहे. पीकांसाठी पावसाची नितांत आवश्यकता असल्याने आपण सर्वजण वरूण राजाला साकडे घालू या. याबरोबरच नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही त्यांनी जिल्हावासीयांना केले.

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज

जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सन 21-22 करीता 536 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर आहे. मात्र, यंदा कोरोना विषाणूमुळे राज्याच्या उत्पन्नातही घट झाली आहे. त्यामुळे एकूण आराखड्याच्या 60 टक्के निधी उपलब्ध होणार असून या निधीतून जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यात येईल. त्याचबरोबर तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी म्हणून जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यात हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. काही प्रकल्प कार्यरत झाले असून काहींचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्ह्यातील प्रत्येक उपजिल्हा व ग्रामीण रुग्णलयात ऑक्सिजन पाईपलाईन सुविधा सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात 17 हजार 461 खाटांचे व्यवस्थापन केले आहे. तसेच शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात बालरुग्ण कक्ष सुरु केला आहे. तसेच व्हेन्टीलेटर व आयसीयु खाटांची संख्या वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोगय केंद्रात दोन ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर उपलब्ध आहेत. शिवाय 14 लाखापेक्षा अधिक नागरीकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी आतापर्यंत जिल्ह्यातील 11 लाख कोविड लसीचे डोस देण्यात आले आहे. यात आठ लाखापेक्षा अधिक नागरीकांना पहिला तर अडीच लाखापेक्षा अधिक नागरीकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला. काही घरांमध्ये पती-पत्नी दोघांचा मृत्यू झाला. आई-वडिल गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत.

लॉकडाऊनमुळे रोजगार बुडालेल्यांना शासनाची भरीव मदत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केला होता. या कालावधीत बांधकाम मजूर, घरेलू कामगार, ॲटोरिक्षा चालकांना मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारने भरीव मदत जाहीर केली होती. त्यानुसार आपल्या जळगाव जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून एकूण 43 हजार 357 नोंदीत कामगारांना 8 कोटी 92 लाख 8 हजार रुपयांचे अर्थसाहाय्य थेट बँक खात्यात जमा केले. महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून आतापर्यंत 2 हजार 723 कामगारांना 40 लाख 84 हजार 500 रुपयांची मदत केली. नोंदीत 1 हजार 628 माथाडी कामगारांना 32 लाख 56 हजार रुपयांची मदत केली. नोंदीत सुरक्षा रक्षकांना 1 हजार रुपये अतिरिक्त वाहन भत्ता मंजूर केला. एकूण 538 सुरक्षा रक्षकांना 5 लाख 38 हजार रुपयांची मदत केली. याबरोबरच जिल्ह्यात 4 हजार 137 ॲटोरिक्षा परवानाधारकांना प्रत्येकी 1500 याप्रमाणे 62 लाख 5 हजार 500 रुपयांचे अर्थसहाय्य संबंधितांच्या बँक खात्यात जमा केले आहे. त्याचबरोबर लॉकडाऊन काळात नागरीकांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरीता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 8 लाख 10 हजार 295 मनुष्य दिवसांची निर्मिती करण्यात आली असून याकरीता 23 कोटी 27 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. शिवाय जिल्ह्यात खावटी योजनेतंर्गत 70 हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून आतापर्यंत 60 हजार लाभार्थ्यांना लाभाचे वाटप केले आहे. तर शासकीय आश्रमशाळांमार्फत आदिवासी विद्यार्थी, गरजू मजुरांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य

जलजीवन मिशनच्या माध्यमातून 2024 पर्यंत राज्यातील प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ठ पाणीपुरवठा विभागाने ठेवले आहे. याकरीता राज्यासाठी 13 हजार कोटींचा तर जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांतील 2025 गावांसाठी 3 हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यात आपल्या जळगाव जिल्ह्यासाठी तब्बल 1200 कोटी रूपयांची तरतूद केली असून स्वच्छता विभागातर्फे घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 314 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

यांचा झाला सत्कार

यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी पार पाडलेल्यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नेहरु युवा केंद्रातर्फे दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट युवा मंडळ (सन 2019-2020) पुरस्कार तुळजाई बहुउद्देशीय संस्था यांना प्रदान केला.

पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह

सहाय्यक फौजदार शिवाजी राजाराम पाटील, सहाय्यक फौजदार लिलाकांत पुंडलिक महाले, जिल्हा विशेष शाखा, जळगाव, पोलीस हवालदार विजय माधव काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, जळगाव, पोलीस हवालदार शशिकांत बाबुलाल पाटील, जिल्हा विशेष शाखा, जळगाव. पोलीस हवालदार सुनिल पंडीत दामोदरे स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव, पोलीस नाईक महेश रामराव पाटील, पारोळा पोलीस स्टेशन, पोलीस नाईक संदीप श्रावण सावळे, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव.

पोलिस महासंचालकाचे विशेष सेवा पदक - पोलिस शिपाई अतुल अंगद मोरे, पोलीस मुख्यालय, जळगाव.

महा आवास अभियान ग्रामीण मधील उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्था/व्यक्ती - उत्कृष्ट क्लस्टर रामजीपाडा, ग्रामपंचायत, अडावद, ता. चोपडा. प्रधानमंत्री आवास योजना जिल्हास्तरीय पुरस्कार- सर्वोत्कृष्ठ तालुका- प्रथम क्रमांक मुक्ताईनगर, व्दीतीय क्रमांक भुसावळ, तृतीय क्रमांक चाळीसगाव.

राज्य पुरस्कृत योजना सर्वोत्कृष्ठ तालुका प्रथम- मुक्ताईनगर, द्वीतीय- क्रमांक एरंडोल, तृतीय- बोदवड

कृषि विभाग - किशोर संभाजीराव साळुंखे, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, एरंडोल. श्री. तुफान तुकाराम खोत, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चाळीसगाव. श्रीमती वैशाली रंगराव पाटील, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, भडगाव. श्री. पांडूरंग बाबुराव महाजन, कृषी पर्यवेक्षक, तालुका फळरोप वाटीका, पाचोरा, श्री तुळशीराम रामदास पवार, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, चाळीसगाव, श्री. अमोर शिवदास पाटील, कृषी सहाय्य्क, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जामनेर यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com