भारनियमन टाळण्यासाठी कृषिपंपांच्या पुरवठ्यात घट

भारनियमन टाळण्यासाठी कृषिपंपांच्या पुरवठ्यात घट
भारनियमन
भारनियमन

जळगाव : कोळशाचा तुटवडा भासत असल्याने भारनियमनाचे संकट उभे आहे. मात्र जळगाव परिमंडळात विजेची मागणी आणि पुरवठा यात तफावत नसल्याने सध्यातरी शहरी किंवा ग्रामीण भागात कोठेही भारनियमन होत नाही. असे असले तरी विजेची मागणी व पुरवठा त्यात तफावत नको म्हणून कृषिपंपांचा पुरवठा काहीअंशी म्हणजे दोन तासांनी घटवला आहे. (jalgaon-news-Decrease-in-supply-of-agricultural-pumps-to-avoid-weight-regulation)

देशभरात कोळसाटंचाई निर्माण झाल्यामुळे काही दिवसांपासून औष्णिक वीजनिर्मिती कोळशाअभावी हळूहळू कमी होत आहे. त्यातच महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १३ संच कोळशाअभावी बंद पडले आहेत. विजेची मागणी व उपलब्धता यामधील सध्या तीन हजार ३३० मेगावॅटची तूट भरून काढावी लागणार आहे. यामुळे राज्यात भारनियमनाचे संकट उभे आहे.

सध्या १५६८ मेगावॉटची मागणी

महावितरणच्या जळगाव परिमंडळात चालू महिन्यात बारा दिवसांत १५६८.६५ मेगावॉट विजेची मागणी झाली. यात जळगाव जिल्ह्यात ७१५.६५ मेगावॉट, धुळे जिल्ह्यात ३००.९४ मेगावॉट आणि नंदुरबार जिल्ह्यात ५५२.०६ मेगावॉट विजेची मागणी झाली. या मागणीनुसार वीजपुरवठा पूर्ण झाला. मागणी व पुरवठा यात कोणत्याही प्रकारची तूट झाली नाही. यामुळे भारनियमन होत नाही.

भारनियमन
जिल्‍हा बँक निवडणुकीत नवा व्‍टीस्‍ट; कॉंग्रेसची स्‍वबळावर लढण्याची तयारी

कृषिचे दोन तास केले कमी

कृषिपंपासाठी महावितरणकडून दिवसा आठ तास, तर रात्री दहा तास वीजपुरवठा केला जातो. मात्र कोळशाची टंचाई जाणवत असल्याने कृषिपंपासाठी रात्री दहा तास दिल्या जाणाऱ्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात करण्यात आली आहे. यामुळे रात्री आता आठ तास वीज मिळत आहे.

तरीही वीज होते गायब

सध्‍या भारनियमन होत नसल्‍याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे. मात्र आजही जळगाव शहरातील काही भागांत अर्धा तासापर्यंत ठराविक वेळेत वीज खंडित होत आहे. याबाबत दुरुस्‍तीच्‍या कामाचे नाव सांगितले जात आहे. परंतु रात्रीच्‍यावेळी दुरुस्‍तीचे काम कोणत्‍याही प्रकारे होऊ शकत नाही. यामुळे प्रत्‍यक्ष भारनियमन नसले तरी ते अप्रत्‍यक्षरीत्‍या होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com