Leopard News: विहिरीत आढळला मृत बिबट्या; पिल्लांसाठी गमावला जीव

विहिरीत आढळला मृत बिबट्या; पिल्लांसाठी गमावला जीव
Leopard News
Leopard News
Published On

मेहुणबारे (जळगाव) : लांबेवडगाव (ता. चाळीसगाव) शिवारात दोन महिन्यांपूर्वी उसाच्या शेतात बिबट्या आणि त्याचे दोन बछडे आढळून आल्याची घटना घडली होती. त्याच शिवारात सोमवारी सकाळी बिबट्या (Leopard) कुजलेल्या अवस्थेत विहिरीत मृत स्थितीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या बिबट्याचा मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leopard News
खासदारांनी माझ्या नादी लागू नये; गुलाबराव पाटलांचे उन्मेष पाटील यांना प्रत्युत्तर

लांबेवडगाव येथे डॉ. विनोद कोतकर यांच्या मालकीची विहिर बापू जाधव यांच्या शेतात आहे. बापू जाधव हे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास शेतात गेले असता त्यांना या विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्याचे जाणवले. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता विहिरीच्या पाण्यावर एक बिबट्या तरंगाताना दिसून आला. त्यांनी ही बाब वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांना सांगितली. श्री. ठोंबरे यांनी वन विभागाला (Forest Department) माहिती दिल्यानंतर उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहाय्यक वनसंरक्षक सुदर्शन शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे, जी. एस. पिंजारी, एस. बी. चव्हाण, आर. आर. पाटील, एस. एच. जाधव, वाय. के. देशमुख, श्रीराम राजपूत, बापू शितोळे यांच्यासह वन मजूर यांनी मृत बिबट्याला जेसीबीद्वारे विहिरीतून बाहेर काढले घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मीरा रावणकर यांनी शवविच्छेदन करून बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कुजलेला मृतदेह

या विहिरीत पडलेला बिबट्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या अंगावरील केस गळाले होते तर कातडी पाण्यामुळे कुजलेली असल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली होती. हा बिबट्या सात ते आठ दिवसांपासून विहिरीत पडलेला असल्याचे सांगण्यात आले.

पिल्लांसाठी गमावला जीव

दोन महिन्यांपूर्वी लांबेवडगाव शिवारात प्रकाश पाटील यांच्या शेतात उसतोड (Sugarcane) सुरू असताना मजुरांना बिबट्याचे दोन बछडे आढळून आले होते. याची माहिती तत्काळ वन विभागाला दिल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतल्यानंतर बिबट्याचे नर जातीचे नुकतेच जन्मलेले पिल्लू आढळून आले होते. तर दुसरे पिल्ल कुठेतरी गेले असावे वा मादी बिबट्याने नेले असावे, अशी शक्यता व्यक्त केली गेली. वन विभागाने ज्या उसाच्या शेतात बछडे आढळून आले होते; त्या शेतात दोन ट्रॅप लावले होते व एका बछड्याला क्रेटमध्ये सुरक्षित ठेवले होते. दुसऱ्या दिवशी वन विभागाला त्या ट्रॅप कॅमेरा लावलेल्या ठिकाणी बिबट्या येऊन त्या बछड्याला घेऊन गेल्याचे ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले होते. तेव्हापासून ती मादी बिबट्या व ते बछडे कुठे गेले? याचा काही थांगपत्ता नव्हता. मादी बिबट्या व तिचे दोन बछडे यांचे काय झाले? ती कुठे आहेत? याची काहीही माहीती नसताना आज सकाळी भिकन दगा पाटील कसत असलेल्या शेतातील विहिरीत मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याने दोन महिन्यापूर्वी ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झालेली ती मादी बिबट हीच असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपल्या पिल्लांसाठी अन्न मिळावे म्हणून जीवाची पर्वा न करता रानोमाळ भटकंती करणाऱ्या मादी बिबट्याचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची दाट शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com