मेहुणबारे (जळगाव): पशुधन चोरट्यांनी अक्षरशा उच्छांद मांडला आहे. लोंढे (ता.चाळीसगाव) शिवारातून एकाच रात्रीतून दावणीचे दोर कापून तब्बल सहा गायी चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी मेहूणबारे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Jalgaon-news-crime-news-cow-robbery-mehunbare-police-station-case)
लोंढे (ता.चाळीसगाव) येथील बापु पितांबर भेासले यांचे चिंचगव्हाण रस्त्यावर लोंढे हायस्कुलजवळ शेत आहे. शेतात रस्त्याच्या कडेला पत्री शेड असून त्यात गुरांना लागणारा चाऱ्यासह गुरे बांधलेली असतात. बापु भोसले हे बुधवारी सायंकाळी गुरांना चारापाणी करून घरी गेले. आज (ता.२८) सकाळी सहाला ते शेतात गुरांना चारापाणी करण्यासाठी व गायींचे दुध काढण्यासाठी गेले असता त्यांचे तीन गायी व एक गोऱ्हा नसल्याचे दिसून आले. त्यांचे दावणीचे दोर कापलेले दिसून आले. गायी व गोऱ्ह्याचा भोसले यांनी शोध घेतला; मात्र त्या मिळून आल्या नाही. त्याचवेळी त्यांच्या शेताशेजारी असलेल्या शेतकरी सतिष प्रकाश भोसले यांच्या शेतात मोकळ्या जागेत बांधलेल्या दोन गायी व दोन बैलांपैकी दोन गायी जागेवर दिसून आल्या नाहीत. या गायींचे दोर कापलेल्या अवस्थेत दिसून आले. दोन्ही शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी गायींचा आसपास शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाही. त्यामुळे बापु भोसले यांच्या मालकीच्या तीन गायी व एक गोऱ्हा तसेच सतीष प्रकाश भोसले यांच्या मालकीच्या दोन गायी अशा पाच गायी व एक गोऱ्हा अशी सुमारे 1 लाख 40 हजार रूपये किंमतीची सहा गुरे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने दिसून आले. याप्रकरणी बापु भोसले यांच्या फिर्यादीवरून मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार दीपक नरवाडे करीत आहेत.
पशुधन चोरीमुळे शेतकरी हैराण
गेल्या काही दिवसापासून मेहूणबारे पोलीस ठाण्यातर्ंगत गुरे चोरीच्या घटना घडत आहेत. यामुळे पशुधन मालक भयभीत झाले आहेत. हजारो रूपये किंमतीचे गुरे शेतकरी पोटाच्या पोराप्रमाणे जगवतात पण चोरटे येतात आणि सहजपणे गुरे चोरून नेतात. या चोरट्यांना कायद्याचा धाक व पोलीसांची जरब राहिली नाही. अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. यापूर्वीही या भागातून गुरे चोरीच्या घटना घडल्या आहेत. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे शेतकरी संतप्त झाले असून गुरांना आता घरात बांधायचे की काय असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.