
महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ७ जणांचा मृत्यू, ११ बेपत्ता.
मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात जनजीवन विस्कळीत.
नांदेडमध्ये लेंडी नदीला पूर; गावकऱ्यांना हलवण्यासाठी एनडीआरएफची मदत.
पुण्यात वाहतूक ठप्प, विदर्भातील अनेक धरणांचे दरवाजे उघडले.
राज्यात सोमवारपासून पावसाची संततधार सुरू असून, आजही अनेक भागांत मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबई, मराठवाडा आणि विदर्भात जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूर, भूस्खलन आणि अपघातांमुळे आतापर्यंत मुंबईत १, मराठवाड्यात ४ तर विदर्भात २ जणांचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात तब्बल ११ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबईत रविवारी रात्रीपासून कोसळधार सुरू आहे. भरतीच्यावेळी झालेल्या पावसामुळे अनेक भाग जलमय झाले. नेपियन सी रोडवरील शिमला हाऊस गोदरेज बागेत संरक्षक भिंतीचा भाग झाडावर कोसळला. यावेळी झाडाजवळून जात असलेल्या सतीश तरके यांच्यावर झाड कोसळून ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, नांदेडमध्ये लेंडी नदी दुथडी भरून वाहत असून, लेंडी धरण ओव्हरफ्लो झाल्यामुळे नऊ गावांमध्ये पाणी शिरले आहे. एनडीआरएफ टीमकडून गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या भागात गंगाबाई मादळे, भीमाबाई हिरामण मादळे यांच्यासह तीन महिलांचा तसेच विशाल बल्लाळ या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर, परळी वैदनाथ येथील कौडगाव हुडा येथील तरूणांची कार वाहून गेली. चौघांपैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे.
विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना पूर आल्यानं अनेक धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहेत. यवतमाळ व बुलढाण्यात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चिखली तालुक्यात मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून शाळा दोन दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पुण्यातही संततधार सुरू आहे. शहरात पुढील २ दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसणार, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसाचा थेट फटका वाहतूकीवर झाला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी रस्ते जलमय झाले आहेत. शहरांत वाहतूक कोंडीमुळे आधीच संथगतीनं सुरू होती. त्यात सतत पडणाऱ्या पावसामुळे वाहतूकीचा वेग आणखी मंदावला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.