बीड : शिवसेना आमदारानंतर आता गावखेड्यातील शिवसेनेला देखील खिंडार पडत असल्याचा चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळुक यांनी शिवसेनेला रामराम ठोकत, शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला असून जिल्ह्यातील जवळपास 70 टक्के शिवसेना कार्यकर्ते आणि पदाधिकारी माझ्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. (Beed Shivsena Marathi News)
यामुळं आता भविष्यात शिवसेनेला मोठं भगदाड पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख आनंद जाधव हे अवैध धंद्यात सामील आहेत. तर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेल्या दिवशी चंद्रकांत खैरे यांनी द्विगुणित आनंद झाल्यासारखा डान्स केला. असा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सचिन मुळक यांनी केला आहे. ते बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
तर यावेळी पुढे बोलताना मुळूक म्हणाले, की शिवसैनिक म्हणून आमची भूमिका मांडत आहोत. गेली 25 वर्षांपासून शिवसेनेत काम केले आहे. माझ्यासह बीडमधील अनेकांचा हाच निर्णय आहे. येणाऱ्या काळात ते देखील निर्णयही घेतील. बाळासाहेब ठाकरे , आनंद दिघे यांच्या विचारावर आम्ही चालणार आहोत. आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसैनिक आहोत. त्यांचीच शिवसेना अनेक शिवसैनिकांना मान्य आहे. जिल्ह्यातील 70 टक्के आजी - माजी पदाधिकारी संपर्कात आहेत. त्यांच्यासोबत बैठक झाली असून लवकर ते देखील निर्णय घेणार असल्याचे मुळूक म्हणाले. (CM Eknath Shinde News)
दरम्यान, संपर्क प्रमुख आनंद जाधव संपर्क प्रमुख नव्हे तर दलाली करणारे अन अवैध धंदे करणारे आहेत. त्यांची माजलगाव येथील वाळूच्या धंद्यात भागीदारी आहे, त्याची पक्षाने चौकशी केली पाहिजे. तर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी संभाजीनगरचे नामकरण झाल्याचा आनंद साजरा केला. मात्र त्यांना याचा नव्हे तर मुख्यमंत्री पदावरून उद्धव ठाकरे यांचा पायउतार झाल्याचा आनंद जास्त झाला, म्हणून त्यांनी दिलखुलास डान्स केला. असा गंभीर आरोपही सचिन मुळूक यांनी केलाय.
दरम्यान आता मराठवाड्यातील शिवसैनिक देखील आता एकनाथ शिंदे यांना साथ देण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आता गाव खेड्यातील शिवसेनेला देखील खिंडार पडणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.