सोयाबीन कापूस प्रश्नाकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी १९ जानेवारीला मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडविण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेसाठी बुलढाणा पोलिसांनी रविकांत तुपकरांना मलकापुरात पोहोचण्यापूर्वीच अटक केली आहे. तुपकर काल रात्रीपासून भूमिगत होते. त्यांच्या घराभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त होता तर त्यांना शोधण्यासाठी पोलिसांची अनेक पथके रवाना झाली होती.
सायं.७.०० च्या दरम्यान गाडी बदलून मलकापूर कडे जात असतांना राजुर घाटात पाठलाग करून पोलिसांनी रविकांत तुपकरांना ताब्यात घेतले आहे व तिथून त्यांना बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले आहे. कलम १५१अंतर्गत गुन्हा दाखल करून त्यांना उद्या न्यायालयात हजर केल्या जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप केला आहे. सोयाबीन-कापसाला दरवाढ, येलो मोझॅक, बोंडअळीची, दुष्काळाची नुकसान भरपाई मागणे हा गुन्हा आहे का? शेतकऱ्यांचा हक्क मागणे हा जर गुन्हा असेल तर असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाही, ही भूमिका यापूर्वीच मी जाहीर केलेली आहे, असं रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितलं.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आंदोलन दडपण्याचा आणि शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत आहेत. शिवाय आता लोकसभा तोंडावर आहेत आणि मी शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव लोकसभेची उमेदवारी लढणार असल्याचे जाहीर केल्यामुळे सत्ताधारी पक्षातील काही पुढाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे कोणते ना कोणते कारण पुढे करून तसेच कायदा व सुव्यवस्था बिघडणार असे सांगून मला किमान वर्षभर जेलमध्ये डांबून ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव आहे. परंतु काहीही झाले तरी मी घाबरणार नाही, शेतकऱ्यांसाठीचा हा लढा असाच सुरू राहणार आहे, मला अटक केली तरी माझे कार्यकर्ते आणि शेतकरी उद्याचं रेल्वे रोको आंदोलन पूर्ण करतीलच, असं रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.