20 thousand youth will get employment in Pune : पुण्यात रोजगाराच्या तयारीत असलेल्या तरुणांसाठी मोठी बातमी आहे. येत्या पाच वर्षात पुण्यात हजारो तरुणांच्या हाताला काम मिळणार आहे. कर्जसुविधा देण्याबरोबरच वित्तीय व्यवहारासाठी देशात आघाडीच्या समजल्या जाणाऱ्या 'बजाज फिनसर्व्ह' कंपनीने पुण्यात ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
'बजाज फिनसर्व्ह' कंपनीने राज्य सरकारशी करार केला असून मुंढवा येथे १९ एकर जागेत कंपनीच्या मुख्यालयाच्या कार्यक्षेत्रात सेवाप्रकल्प उभारला जाणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होण्यास मदत होणार आहे.
यासंदर्भात राज्य सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यामध्ये शनिवारी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि बजाज फिनसर्व्ह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. श्रीनिवासन यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बजाज फिनसर्व्ह कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव बजाज उपस्थित होते.
या करारामुळे रोजगार निर्मितीबरोबर पुण्याच्या विकासात भर पडणार आहे; तसेच अन्य कंपन्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आयटी धोरणानुसार, फिनटेक कंपन्यांना सहकार्य केले जाणार आहे. राज्य सरकारने माहिती तंत्रज्ञान सुविधेबाबतचे (आयटी) धोरण जाहीर केले आहे. त्यानंतर आता पुणे परिसरांमध्ये मोठ्या कंपन्यांनी गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याचे या करारावरून समोर आले आहे.
मुंढव्यात १९ एकरमध्ये प्रकल्प
बजाज फिनसर्व्ह कंपनीमार्फत देण्यात येणाऱ्या कर्जासह विविध प्रकारच्या विमांची प्रक्रिया ही मुंढव्यातून केली जाणार आहे. त्या सेवेत तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आयटी क्षेत्राशी निगडित दहा हजार नोकरदार; तसेच अन्य सेवा देणारे १० हजार अशा सुमारे २० हजार तरुणांना पुढील पाच वर्षांत रोजगार मिळण्याची संधी आहे. (Pune news)
तंत्रज्ञानावर आधारित, कमी वेळेत कर्ज सुविधा देणारी कंपनी म्हणून नावारूपाला आलेल्या या कंपनीचा आयटीचा बॅकअप, सर्व्हर्स मुंढव्यातील इमारतीत ठेवण्यात येणार आहेत. कर्ज सुविधेबाबतची सर्व प्रक्रिया ही आता एकाच ठिकाणाहून चालविली जाणार आहे. बजाज फिनसर्व्ह कंपनीमार्फत लवकरच म्युच्युअल फंडही सुरू होणार आहे, त्याचे कार्यालयही मुंढव्यात असणार आहे. बजाज कंपनीच्या मालकीच्या १९ एकर जागेत ही कंपनी उभी राहणार आहे. (Latest Political News)
सरकारकडून कोणती मदत मिळणार?
- आयटी धोरणानुसार राज्य सरकार बजाज फिनसर्व्ह कंपनीला बांधकाम परवानग्या मिळवून देणार.
- तीन टॉवर इमारतीसाठी अतिरिक्त प्रीमिअम शुल्कात ५० टक्के सवलत.
- पाच एफएसआय मिळणार.
- पर्यावरण विभागाची परवानगी मिळवून देणार.
- इमारतीच्या काही प्रमाणात व्यावसायिक वापरास परवानगी.
- औद्योगिक दराने वीज दरआकारणी.
सरकारकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन- देवेंद्र फडणवीस
आर्थिक सेवा क्षेत्रातील देशातील सर्वांत मोठी गुंतवणूक महाराष्ट्रात होत आहे. महाराष्ट्र सरकार आणि बजाज फिनसर्व्ह यांच्यात सुमारे पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा करार, 'बजाज फिनसर्व्ह'चे अध्यक्ष संजीव बजाज यांच्या उपस्थितीत झाला. या गुंतवणुकीमुळे चाळीस हजार तरुणांना रोजगारनिर्मिती होऊन यामुळे 'आर्थिक सेवा हब'होण्यासाठी पुण्याला मोठी चालना मिळणार आहे. प्रकल्पाच्या जलद अंमलबजावणीसाठी सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन मी दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आणखी काही कंपन्या गुंतवणूक करणार - डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव, उद्योग
राज्य सरकारच्या वतीने सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. आयटी धोरण जाहीर केल्याने त्याचे परिणाम दिसून येत आहेत. आणखी काही कंपन्या पुण्यासह महाराष्ट्रात गुंतवणूक करतील, अशी आशा आहे. त्या कंपन्यांना आयटी धोरणानुसार एफएसआय, प्रीमिअममध्ये सवलत, अन्य सुविधा या देता येणार आहेत, असे डॉ. हर्षदीप कांबळे यांनी सांगितले. (Latest Marathi News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.