मराठी हिंदी भाषिक वादानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले असताना काल निशिकांत दुबे यांनी चुकीचे वक्तव्य करून मराठी माणसांच्या भावना दुखावल्या. यावर अनेक नेत्यांनी दुबे यांची कानउघडणी केली. याप्रकरणी संजय राऊत यांनी पत्रकारपरिषद घेत "कोण आहे हा दुबे ? मराठी माणसाला पटकून पटकून मारणं हे मोदी शहांची बूट चाटण्याइतकं सोप्प आहे का ?" अशा प्रकारचा पलटवार केला आहे. तसेच आज मीरा भाईंदर येथे होत असलेल्या मोर्चा प्रकरणी राऊत यांनी "महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यांनी हा मोर्चा कुठे काढायचा हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले पाहिजे" असे देखील म्हटले आहे.
गल्लीबोळ्यापासून सुरु झालेल्या मराठी हिंदी भाषिक वादाचे राजकारणातही पडसाद उमटू लागले आहे. भाजप नेते निशिकांत दुबे यांनी काल मराठी माणसे आमच्या पैशांवर जगतात अशी गरळ ओकली. तसेच "आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा." असे खुले आव्हान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केले. त्यानंतर सगळ्या नेत्यांनी दुबे यांची परखड शब्दात कानउघडणी केली.
याप्रकरणी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत " कोण आहे हा दुबे? आम्ही आमच्या महाराष्ट्रात राहत आहोत आणि खात आहोत तुमच्या बापाचं खात नाही. त्या दुबेला म्हणावं महाराष्ट्राच्या नादाला लागू नको, नाहीतर पटकनी काय आहे ते आम्हाला दाखवाव लागेल. डरपोक लोक आहात तुम्ही. निशिकांत दुबे आम्ही इथे कोणत्याही महाराष्ट्र मध्ये उत्तर भारतीय वरती हल्ला केला नाही. हे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या वतीने सांगितले पाहिजे. कोणत्याही हिंदी भाषिकावरती आम्ही अपशब्द वापरला नाही.
काय माहित आहे त्या दुबेला? मराठी माणसाला पटकून पटकून मारणार, हे उद्योगपती यांचे दलाली करून कमिशन खोरी करण्याइतकं सोपा आहे का? दुबे हे मोदी शहा यांचे बूट चाटण्या इतकं सोपं नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे. फेक डिग्री घेऊन हा माणूस संसदेत बसलेला आहे. मौवा मोहिते यांना विचारा, त्यांची मुलाखत घ्या. दिल्ली युनिव्हर्सिटीची फेक डिग्री. जसा गुरु जसा चेला आणि तुम्ही महाराष्ट्राला आम्हाला धडे देत आहात" अशा प्रकारे राऊत यांनी दुबे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अमराठी व्यापाऱ्याला प्रत्युत्तर म्हणून मीरा - भाईंदरमध्ये मनसैनिकांनी मराठी बाणा दाखवत मोर्चा काढला आहे. या मोर्चाला सरकारकडून संमती देण्यात आलेली नाही. या मोर्चापूर्वीच पोलिसांनी रात्रीच्या सुमारास मनसे नेत्यांना घरी जाऊन अटक करण्यात आली. यावर संजय राऊत यांनी "मीरा भाईंदरचा विषय अत्यंत गंभीर आहे. कोणाच्या दबावाखाली देवेंद्र फडणवीस यांनी या मोर्चाला परवानगी नाकारली? या महाराष्ट्र राज्यामध्ये मराठी माणूस मराठी भाषेसाठी मोर्चा काढू शकत नसेल तर मग त्यांनी हा मोर्चा कुठे काढायचा? हे आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले पाहिजे. " असे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत पुढे म्हणाले की, " मीरा भाईंदर मध्ये सर्वपक्षीय त्यांचे झेंडे बाजूला ठेवून एक प्रतिकात्मक मोर्चा काढत आहेत. आणि या मोर्चाची परवानगी मागितली जाते. आधी ती परवानगी देण्यासाठी चर्चा होते, मग परवानगी नाकारले जाते. आणि अचानक पोलीस बाळाचा वापर करून मोर्चा काढणाऱ्या प्रमुख नेत्यांना कार्यकर्त्यांना पहाटे दोन वाजता तीन वाजता जाऊन अटक केली जाते. हे राज्य नक्की महाराष्ट्र राज्य आहे का? इथे नक्की या राज्याला मराठी मुख्यमंत्री आहे का ? की मोरारजी देसाई यांचा आत्मा देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरात गेला आहे. त्यामुळे फडणवीस हे अघोरी काम करायला लागले. मला भीती वाटते की हे एक दिवस मराठी माणसावरती मोरारजी भाई प्रमाणे गोळ्या झाडून जे १०६ हुतात्मे झाले त्याचा विक्रम मोडतील.
अशा प्रकारचा वर्तन देवेंद्र फडणवीस करत आहेत. पहाटे मनसेचे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी अविनाश जाधव राजू पाटील शिवसेनेचे काही प्रमुख नेते आहेत. मयेकर त्या भागातले आमचे पदाधिकारी आहेत. इतर काही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत. त्या सगळ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या मोर्चा काढू नका आणि मग त्यांना अटक केली कशाकरता? कोणासाठी ? तुमच्यावरती कोणत्या दुबेचा दबाव आहे? हे तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. " अशा शब्दात संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.