Devendra Fadnavis : मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीसच आघाडीवर का? 5 महत्वाची कारणे

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय भाजप नेतृत्वावर सोपवल्यानंतर या शर्यतीत देवेंद्र फडणवीसांचं नाव आघाडीवर आलंय. फडणवीसांचं नाव आघाडीवर येण्यामागे अनेक कारणे आहेत.
Devendra Fadnavis
Devendra Fadnavissaam tv
Published On

गणेश कवडे, साम टीव्ही | मुंबई

भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा घेतील त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असं सांगत मुख्यमंत्रि‍पदाच्या निर्णयाचा चेंडू एकनाथ शिंदेंनी दिल्लीतील नेतृत्वाकडे टोलवला आहे. तरीही मुख्यमंत्रि‍पदाच्या निर्णयावर आणि नावावर शिक्कामोर्तब झालेलं नाही. पण मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. मुख्यमंत्रि‍पदाचा अनुभव, प्रशासकीय कामकाजाचा दीर्घ अनुभव, प्रशासनावर वचक, प्रदेश पक्षबांधणी या तर जमेच्या बाजू आहेतच, पण आगामी काळात तीन प्रमुख पक्षांच्या महायुतीचं सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आदी कारणे यामागे असल्याचे बोलले जाते.

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीनं विधानसभा निवडणुकीत न भूतो...असं यश मिळवलं. राज्यातील सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष म्हणून भाजपनं रेकॉर्ड केला. भाजपनं १३२ जागा जिंकल्या. याशिवाय त्यांना इतर मित्रपक्ष आणि अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. तर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनंही जोरदार मुसंडी मारतानाच, ५७ जागा जिंकल्या. अजित पवार यांनीही ४१ जागांवर विजय मिळवला. निवडणूक निकालानंतर राजकीय समीकरणं बदलली आणि मुख्यमंत्रिपद कोणाकडे अशी चर्चा सुरू झाली.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा शिवसेनेच्या नेत्यांनी बोलून दाखवली. तर भाजपचाच मुख्यमंत्री असावा आणि तेही देवेंद्र फडणवीसच व्हावेत, असे भाजपचे नेते खासगीत बोलत आहेत. मुख्यमंत्रि‍पदाचा पेच दिल्ली दरबारी सुटेल असं वाटत असतानाच, काही तास आधीच स्वतः एकनाथ शिंदे यांनी हा पेच सोडवला. मुख्यमंत्रि‍पदाबाबत भाजप, मोदी आणि शहा निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे सांगून पदावरचा दावा जवळपास सोडला. आता मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचं नाव आघाडीवर आहे. त्याची अनेक कारणे आहेत.

महाराष्ट्रात पक्षबांधणी मजबूत

देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्षाची बांधणी चांगली केली. २०१४ च्या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात जबरदस्त यश मिळालं. २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले. २०१९ मध्येही भाजपला शंभराच्या वर जागा जिंकून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. पण त्यावेळी युती तुटली आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं. पण तरीही फडणवीसांनी राज्यातील प्रमुख नेते म्हणून पक्ष फुटू दिला नाही. एकही आमदार पक्षापासून दूर गेला नाही किंवा फूट पडू दिली नाही. उलट त्यांनी पक्ष मजबूत करण्यावर भर दिला, असे जाणकारांकडून सांगितले जाते.

प्रशासनावर वचक

देवेंद्र फडणवीस हे विरोधात असतानाही सत्ताधाऱ्यांसह प्रशासनावरही त्यांचा वचक होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची प्रशासनावरील पकड आणखी मजबूत झाली. हुशार आणि निर्णयक्षमता असलेला नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाऊ लागलं. मुख्यमंत्रि‍पदाचा त्यांचा कार्यकाळ यशस्वी ठरला. या काळात त्यांनी अनेक महत्वाचे प्रकल्प आणि योजनांना मार्गी लावलं. वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांमध्येही त्यांचा दबदबा पाहायला मिळाला. मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांच्यावर कुठलाही आरोप किंवा तो सिद्धही झाला नाही.

स्वपक्षातील आमदारही अनुकूल

भाजपने राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात अनेक निवडणुका लढल्या. अपयश कमी पण यशच अधिक मिळालं. हा यशाचा आलेख आजतागायत चढता राहिला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामागं फडणवीस यांचाही मोठा वाटा असल्याचे राजकीय क्षेत्रातील जाणकारांचं म्हणणं आहे. भाजप १३२ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळं मुख्यमंत्री म्हणून भाजपकडून त्यांच्याच नावाला अधिक पसंती मिळत आहे. याशिवाय फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत, अशी पक्षातील जवळपास सर्वच आमदारांची इच्छा आहे. काही आमदारांनी आणि नेत्यांनी तर, माध्यमांसमोर इच्छाही बोलून दाखवली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं आहे. आगामी काळात राज्यातील महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत. मिनी विधानसभा म्हणूनच याकडे पाहिलं जातं. या निवडणुका देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातच लढवल्या जातील यात शंका नाही. त्यामुळं आता मिनी विधानसभा समजल्या जाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पुन्हा बॅकफूटवर जायला नको, असे वरिष्ठांना वाटतं. त्यामुळं भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांचं नाव आघाडीवर असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Devendra Fadnavis
Maharashtra Politics : एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होणार? नवा फॉर्म्युला आला समोर

महायुतीला सांभाळू शकणारा सक्षम नेता

भाजप आणि शिवसेना (फुटीआधीची) यांची युती तुटल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणं बदलली. शिवसेनेतून एकनाथ शिंदे बाहेर पडले. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे दोन पक्ष एकत्र आले. त्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादीही भाजपसोबत गेली आणि तीन पक्षांची महायुती उदयास आली. ही महायुती पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकांना सामोरं गेली आणि यशही मिळवलं. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरल्यानं मुख्यमंत्रिपद भाजपकडे जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. आता यापुढे महायुतीतील प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सोबत घेऊन जावं लागणार आहे. भाजपसमोर महायुती टिकवण्याचे आणि या दोन्ही नेत्यांसह त्यांच्या नेत्यांना एकत्रित, एकविचारानं बांधून ठेवण्याची जबाबदारी भाजपकडे असेल आणि ही महायुती सांभाळू शकणारं सक्षम नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिले जाते.

Devendra Fadnavis
Maharashtra CM: मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचेच नाव फायनल, ५ डिसेंबरला होणार शपथविधी?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com