संजय तुमराम
चंद्रपूर : शिक्षणाचे दिल्ली मॉडेल Delhi Model रुजवण्याचा प्रयत्न चंद्रपूर Chandrapur महापालिकेने सुरू केला आहे. त्याला यशही मोठं मिळू लागल्याचं चित्र बघायला मिळत आहे. इंग्रजी शाळातील विद्यार्थी मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागल्यानं प्रवेश फुल झाल्याने प्रवेश आता थांबवण्यात आले आहेत.
शासकीय शाळा म्हटली की, डोळ्यासमोर येते ती जुनी-गळणारी इमारत, अस्वच्छता, सोयीसुविधांचा अभाव आणि रोडावलेली विद्यार्थी संख्या. या परिस्थितीमुळं अनेक सरकारी शाळा बंद पडल्या आणि त्याचा थेट लाभ इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा म्हणजेच कॉन्व्हेंटनी उचलला. अशा वातावरणात सर्वसामान्यांना दिलासा देणारी योजना चंद्रपूर महापालिकेनं केली आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाचा एक नवा मार्ग गवसला.
हे देखील पाहा-
चंद्रपूर महानगरपालिकेनं आता आपल्या शाळा अद्यावत करण्याचं ठरवलं. त्यादिशेनं पहिलं पाऊल महापालिकेनं टाकलं. चंद्रपूर शहरातील बाबूपेठ भागातील शाळा आहे. पहिली ते दहावीचे वर्ग इथं चालतात. सेमी इंग्रजी माध्यम. शाळा बघताच एखादी खासगी शाळा असावी, असा भास होतो. शाळेचं केवळ बाह्य रूपच सुंदर आहे, असं नाही. अंतरंगही मनोवेधक आहे. शाळांच्या भिंती बोलक्या आहेत. बसण्याची व्यवस्था नेटकी. पिण्याचं स्वच्छ पाणी, अग्निशमन बंब, पंखे आणि शिक्षकांची पूर्ण उपस्थिती. दिल्लीतील शासकीय शाळांच्या धर्तीवर ही शाळा उभी करण्यात आली आहे. सध्या कोरोनामुळं शाळा बंद असून, ऑनलाईन शिक्षण दिलं जात असलं तरी ऑफलाईन शिक्षणासाठी काही विद्यार्थी शाळेत हजेरी लावत आहेत. ज्यांना कॉन्व्हेंटचं शिक्षण परवडत नाही, अशा पालकांसाठी ही शाळा मोठी संधी निर्माण करून देणारी ठरलीय. शिक्षणाप्रति आस्थेवाईक असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचं नवं दालन यानिमित्तानं उघडं झालंय.
महापालिकेच्या मराठी, हिंदी, उर्दू आणि तेलगु शाळा शहरात सुरू आहेत. त्या सर्व शाळा येत्या काळात अशाच स्वरूपाच्या होणार आहेत. काम प्रगतीपथावर आहे. या शाळेत डिजिटल पद्धतीने शिक्षण सुरु केल्यामुळे काॅन्व्हेंटमध्ये शिकणारे अनेक विद्यार्थी आता मनपाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले आहेत. त्यामुळे 2013 मध्ये केवळ 70 पटसंख्या असलेल्या या शाळेत आता 900 वर विद्यार्थी आहेत. अजूनही प्रवेशासाठी विद्यार्थी येत आहेत. पण आता प्रवेश बंद करण्यात आलाय. महापालिकेच्या शाळेत प्रवेश "फुल्ल" झाल्याची पाटी लागावी, हीच मुळी अपूर्वाई आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत एकूण 29 शाळा कार्यरत आहेत. यामध्ये तीन शाळांत तेलुगु, तीनमध्ये हिंदी, दोनमध्ये उर्दू शिक्षण दिलं जात असून, 21 शाळांत मराठी-सेमी इंग्रजी शिकवलं जातं. यात सोळा शाळांमध्ये नर्सरी, केजीचं शिक्षणसुद्धा दिलं जात आहे. येत्या काळात महापालिकेच्या सर्वच शाळा गुणात्मकरित्या विकसित केल्या जाणार असून, सर्वसामान्यांना शिक्षणासाठी सुदृढ वातावरण तयार केलं जाणार आहे.
2016-17 मध्ये या सर्व शाळांतील विद्यार्थीसंख्या 2571 होती. ती यावर्षी 3454 इतकी झाली आहे. सरकारी शाळांची अशी सुधारणा झाल्यास शिक्षणाच्या नावावर वारेमाप शुल्क घेणाऱ्या खासगी शाळांना नक्कीच चाप बसू शकेल, यात शंका नाही.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.