आता बातमी काँग्रेसच्या आंदोलनाबाबत. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. रस्त्याची दुरवस्था झाली आहे. अशा स्थितीत टोल आकारणी सुरू आहे. याच मुद्यावरुन काँग्रेसचे नेते आक्रमक होत रस्त्यावर उतरले. पाहूया एक रिपोर्ट.
राज्यात सध्या जनता दोन गोष्टींमुळे त्रस्त आहे. एक म्हणजे जागोजागी असणारे खड्डे आणि दुसरी टोलची मनमानी..दरवर्षी पावसाळा आली की बेडूक जसे बाहेर येतात तसे महामार्गावर जागोजागी खड्डे दिसू लागतात. याचा मोठा त्रास वाहनधारकांना होतोय. मुंबई-नाशिक महामार्ग, मुंबई-गोवा महामार्ग, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा संतापाचा कडेलोट झालाय. तीन तासाच्या प्रवासासाठी सात तास लागतायेत. वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. अपघातांची संख्याही वाढू लागलीये. मंत्री दादा भुसे यांनी मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक दरम्यानच्या खड्ड्यांवरुन अधिका-यांना, कंत्राटदारांना धारेवर धरलं. तर दुसरीकडे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था असताना टोल कशासाठी असा सवाल करत टोलविरोधात काँग्रेसचे नेते आक्रमक झाले.
पुण्यातील खेड शिवापूर,कोल्हापुरातील किणी, साताऱ्यातील आणेवाडी आणि कराडच्या तासवडे टोलनाक्यावर काँग्रेसने आंदोलन केलं. खराब रस्त्यांचा टोल का भरायचा ? असा सवाल काँग्रेस नेत्यांनी केलाय. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विश्वजीत कदम, आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, विक्रम सावंत आंदोलनात सहभागी झाले होते.
पुणे ते कागल -कोगनोळी या महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची कमालाची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे टोल कंपन्यांनी टोल आकारणीचा हक्क गमावला आहे, अशी भूमिका काँग्रेसनं घेतलीय. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे आणि टोलचा झोल यावरून पुढच्या काळात राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.