डीआरआयने रक्तचंदन तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. तब्बल आठ कोटी रुपयांचं आठ मेट्रिक टन रक्तचंदन जप्त करण्यात आलं आहे. जेएनपीटी न्हावा शेव बंदर अहमदनगर नाशिक हैदराबाद येथे टाकल्या डीआरआयने धाडी टाकल्या आहेत. संगमरवराच्या नावाखाली रक्तचंदनाची तस्करी सुरू होती. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपोषण मागे घेतलं आहे. दोन दिवसांपासून आझाद मैदानात सुरू होत सुषमा अंधारे यांचे उपोषण. पोलीस भरती २०२२-२३ प्रकरणी राज्य सरकार योग्य तो निर्णय घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.
उद्यापासून मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याचा दौरा करणार आहेत तत्पूर्वी अशोक चव्हाण आणि संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये राज्य सरकार मराठा आरक्षण आणि सगळी सोयरेबाबत काय काम करत आहे, याबद्दल माहिती दिली आहे. शिंदे समिती लवकरच यासंदर्भात संपूर्ण अभ्यास करण्यासाठी हैदराबादला जाणार आहे. कारण हैदराबाद लागू करावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांची आहे
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या आहेत. रूटीन चेकअपसाठी रश्मी शुक्ला यांना रिलायन्स रुग्णालयात भरती केल्याची माहिती आहे.
अहमदनगर येथे खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली कांदा आणि दुधाला योग्य दर मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला या आंदोलनात झाला असून सकाळी अकरा वाजेपासून सुरू झालेलं आंदोलन अजूनही सुरूच आहे. खासदार लंके यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर अडवल्यामुळे लंके यांनी ठिया आंदोलनाचा पावित्र घेतला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः येऊन निवेदन स्वीकारत आंदोलकांना आश्वासन द्यावं अशी भूमिका लंके यांनी घेतली आहे. उद्यापासून हे आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचं लंके यांनी म्हटल आहे
मुंबई महापालिकेतील जन्म, मृत्यू, नोंदणीचे सर्व्हर बंद आहेत. गेले २०-२५ दिवस सर्व्हर बंद असल्यामुळे जन्म- मृत्यू प्रमाणपत्र मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
विधानसभा पूर्वतयारी बैठक होत आहे. एक सभा मुंबईत घेणार आहोत.अजून तारीख नाही ठरली. पण मविआच्या सर्व नेत्यांना बोलवून एक सभा मुंबईत घेणार. तिकडून शंखनाद करणार. आमच्या जवळ मत आहेत. आमचे सर्व उमेदवार जिंकून येतील. घोडेबाजार करणारेच घोडेबाजारावर बोलत आहेत. भ्रष्टाचार केला आणि त्याच पैश्यांनी घोडेबाजार .विधानसभेची जागा वाटप पण लवकर होइल, असं कॉंग्रेसचे प्रेदशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेदारांची पीक कर्जखात्याचे नूतनीकरण केले नसल्याच्या कारणावरुन जवळपास 180 शेतकऱ्यांची बँक खाते होल्ड केली आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या चालू पीक कर्जाचे न केल्याने बँकेने ही खाती होल्ड केली आहेत. दरम्यान शेतकऱ्यांनी नूतनीकरण करून घ्यावे, असं आवाहन बॅंकेने केले असून एसबीआयच्या शाखेने तब्बल 300 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज खात्याचे नूतनीकरण केले. परंतु याच परिसरातील 180 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्ज खात्याचे नुतनीकरण न केल्याने 180 खाते बँकेकडून होल्ड करण्यात आल्याची माहिती बँक व्यवस्थापक यांनी दिली.
कांदा खरेदीत झालेल्या प्रकरणात साम टिव्हीच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट पडला आहे. नाफेडमध्ये दिल्लीत केंद्र स्तरावर मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. नाफेडचे दिल्लीतील कांदा खरेदी प्रमुख सुनील कुमार सिंग यांची तडकाफडकी उचलबांगडी झाल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे.
भाजपकडून विविध राज्यातील प्रभारी - सहप्रभारी यांची नाव जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील ३ नेत्यांकडे विविध राज्यांच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्याकडे बिहारच्या प्रभारीपदाची जबाबदारी कायम आहे. तर राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे मणिपूर प्रभारीपद, माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळच प्रभारीपद कायम ठेवण्यात आलं आहे.
महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची थोड्याच वेळात यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक सुरू होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा जाहीरनामा तयार करण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहे. तसेच १२ तारखेला होणारी विधान परिषद निवडणूक यावरील बैठकीत चर्चा होण्याची शक्यता.
माकपने महाविकास आघाडीकडे 12 जागांची मागणी केली आहे. काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या शहर मध्यच्या रिक्त जागी माकपच्या नरसय्या आडम यांनी दावा केला आहे. मात्र 12 पैकी 5 जागा देण्यास महाविकास आघाडीचे नेते तयार असल्याचा माजी आमदार नरसय्या आडम यांचा दावा आहे. महाविकास आघाडीतील मागच्या काही दिवसात जेष्ठ नेत्यांची माकपच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली होती.
NEET UG पेपर लीक प्रकरणी केंद्र सरकारने आज सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केलं. NEET परीक्षा रद्द करणे योग्य नाही, जर परीक्षा रद्द केली तर हा होतकरू विद्यार्थ्यांचा विश्वासघात ठरेल. मोठ्या प्रमाणात परीक्षेत अनियमितता झाल्याचा कोणताही पुरावा नाही, असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. NEET प्रकरणी ८ जुलै रोजी रेग्युलर बेंच समोर सुप्रीम कोर्टात होणार आहे सुनावणी
टीम इंडियाच्या विजयानंतर वर्षा बंगल्यावर खेळाडूंचं स्वागत झालंय. रोहित शर्मा, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल वर्षावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेळाडूंची भेट घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रोहित शर्माचा सत्कार केला आहे.
खासदार निलेश लंके यांचे जनआक्रोश आंदोलन गेल्या चार तासापासून सुरूच आहे. जिल्हाधिकारी जोपर्यंत आंदोलनस्थळी येत नाही तोपर्यंत आंदोलन थांबवणार नाही, अशी भूमिका खासदार निलेश लंके यांनी घेतली आहे. दुधाला, कांद्याला भाव मिळत नसल्याने सकाळी अकरा वाजल्याापासून आंदोलन सुरू आहे.
भारतीय खेळाडुं थोड्याच वेळात विधान भवनात येणार आहेत. खेळाडुंच्या स्वागतासाठी विधान भवनाच्या परिसरात नवे पोस्टर्स, झेंडे लावण्यात आले आहेत. खेळाडुंच्या स्वागतासाठी ढोल ताशा पथका सज्ज झाले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील आदर्श मराठी विद्यालयाची इयत्ता तिसरीत शिकणारी कुमारी नारायणी मराठे या चिमुकलीने साता समुद्र पार असलेल्या कजाकिस्तान येथे झालेल्या 26 व्या आशियाई स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदकांची कमाई केली आहे. अवघ्या आठ वर्ष वय असलेल्या नारायणी मराठी या चिमुकलीने आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा डंका वाजवला आहे. तिने रॅपिड आणि क्लासिकल स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदक मिळवून दिले आहेत.
राज्य मंत्रीमंडळ बैठकीत मोठा निर्णय झालाय. ईडब्ल्यूएस, एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थिनींसाठी मोठी घोषणा करण्यात आली. व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग(एसईबीसी) तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी आता १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आलाय.
आरटीओच्या विलंब पासिंग विरोधात पुण्यात रिक्षाचालक आक्रमक झाले आहेत. पासिंग उशिरा करणाऱ्या रिक्षा चालकांना रोज 50 रुपये दंड आकारण्यात आलाय. हा दंड अन्याय करत असल्याचा रिक्षा संघटनांचा आरोप आहे. दंड रद्द करण्याची रिक्षा संघटनांची मागणी आहे. पुण्यात रिक्षा चालकांनी रिक्षावर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांना आवाहन करणारे बॅनर्स लावले आहेत.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 अर्ज आले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. मात्र एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होणार नाही.
लोकसभेत खासदार म्हणून शपथ घेताना आता घोषणा नाही तर फक्त शपथ घ्यावी लागणार आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी अध्यक्षांना असलेल्या अधिकारांचा वापर करत 'निर्देश-1’ मध्ये बदल केला असून या नुसार सदस्याने शपथ घेतल्यानंतर त्यांना कोणतीही घोषणा देता येणार नाही १८ व्या लोकसभेच्या खासदारांनी शपथ घेताना वेगवेगळ्या घोषणा दिल्याने वाद झालाहोता. वाद त्यामुळं लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी शपथ घेतानाच्या नियमात बदल केला असल्याची माहिती आहे.
नीट PG प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२४ रोजी होणार परीक्षा होणार आहे. ११ ऑगस्ट २०२४ रोजी दोन शिफ्ट मध्ये परीक्षा होणार असून ३ तास आधी तयार प्रश्नपत्रिका तयार होणार आहे. प्रश्नपत्रिका फुटण्याच्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
अकोल्यात पाण्याच्या मोटरचा शॉक लागून 19 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अकोला शहरातल्या डाबकीरोड परिसरातल्या गजानननगर मधील घटना आहे. आज सकाळी पिण्याच्या पाण्याचे नळ आले असता 19 वर्षीय संजना अंभोरे हिला पाणी भरत असताना अचनाक पाण्याच्या मोटरचा जोरदार शॉक लागला. यात संजना ही तरुणी गंभीर स्वरूपात जखमी झाली. तातडीने तिला अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेय. मात्र इथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
२०२२- २३ च्या पोलिस भरती प्रकरणी महाराष्ट्र शासन योग्य निर्णय घेत नसल्याने गेल्या ३६ तासापासुन उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्या नेत्या सुषमा अंधारे आझाद मैदानात उपोषणाला बसल्या आहेत. त्यांची तब्येत काहीशी बिघडली असून बीपीलो झाल्याची माहिती आहे. पोलिस भरती मधील या विद्यार्थ्यांसाठी गृह विभाग का वेळ देत नाही?.. लाडकी बहिण योजना करतात मग पोलीस भरती च्या बहिणी बाबत का वेगळा न्याय? असा सवाल सुषमा अंधारे यांनी सामटीव्हीशी बोलताना विचारला आहे.
नाशिकच्या चांदवड येथे तालूक्याचे भूमीपुत्र डॉ शाम पगार यांनी कांदा प्रश्नावरील विविध मागण्यांसाठी गेल्या चार दिवसांपासून चांदवड येथे अन्नत्याग आंदोलन सुरु केले होते. आज दिंडोरी मतदार संघाचे खासदार भास्कर भगरे यांनी त्यांची भेट घेत कांदा प्रश्नावर चर्चा करत आपण याप्रश्नावर संसदेत आवाज उठवू असे आश्वासन देत त्यांना नारळपाणी देत त्यांचे अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यास विनंती केली आणि डॉ शाम पगार यांनी आपले आंदोलन स्थगित केले,कांद्याला अडिच हजार रुपयांचा दर मिळावा,निर्यातबंदी,कांद्याला हमी भाव अशा विविध मागण्यांसाठी कृषी दिना पासून अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली होती.
शाळेत उशिरा आल्याने शिक्षकाने वर्गाबाहेर उभे करून विद्यार्थिनीला धक्का दिला होता. यावेळी पायऱ्यांवरून खाली पडल्याने तृप्ती भोसले या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे २०१८ मध्ये ही घटना घडली होती. 2018 साली घडलेल्या घटनेत न्यायालयाच्या आदेशानंतर शिक्षकावर अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर हे दीक्षाभूमी येथे झालेल्या 1 तारखेचा जाळपोळच्या घटनेनंतर पाहणी करण्यासाठी आले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत यावेळी संख्यने समर्थक सोबत होते. भीमराव आंबेडकर यांचा विजय असो म्हणत समर्थकांनी स्मारक समितीविरोधात घोषणा दिल्यात. यावेळी भीमराव आंबेडकर यांनी स्तूपातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलेश यांना अभिवादन केले. त्यानंतर स्तूपाच्या वरील भागात अंडरग्राउंड पार्किंग संदर्भात सुरू असलेल्या कामाची पाहणी सुद्धा केली.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी घोषित केलेल्या वसतिगृहांत प्रवेश मिळत नसल्याने आज ओबीसी संघटनेने मुक्काम आंदोलन सुरू केले. चंद्रपूर जिल्ह्यात 72 नवे वसतिगृह ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्याची घोषणा सरकारने केली. त्यासंबंधीचे आदेशही काढले. त्यानुसार विद्यार्थ्यांकडून प्रवेश अर्ज मागवले गेले. मात्र अजूनही ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे गरीब घरची मुले भाड्याने राहत आहेत. त्यासाठी मिळेल ती कामे करून घराचे भाडे देत आहेत. हे चित्र बदलण्यासाठी आज ओबीसी संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला. समाजकल्याण अधिकारी कर्यालासमोर जोरदार घोषणाबाजी करीत त्यांनी तिथेच मुक्काम ठोकण्याचा निर्णय घेतलाय. जोपर्यंत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळणार नाही, तोपर्यंत मुक्काम इथेच कायम राहील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतलीय.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. शिंदे गटाच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार खासदार रवींद्र वायकर यांच्या विजयावर संशय घेत पराभूत उमेदवार भरत शाह यांनी रवींद्र वायकर आणि निवडणूक आयोगाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.भरत शाह यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात काल ॲड. असीम सरोदे, ॲड. विनय खातु, ॲड. श्रीया आवले, ॲड. बाळकृष्ण निढाळकर, ॲड. किशोर वरक यांनी ही तक्रार याचिका दाखल केली. 4 जून रोजी झालेली मतमोजणी आणि जाहीर करण्यात आलेल्या निकालाला स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश मधील हाथरस दुर्घटना प्रकरण: सत्संग आयोजक आणि मुख्य सेवेकरी देवप्रकाश मधुकर अजूनही फरार असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांकडून देवप्रकाशचा शोध सुरू असून त्याला शोधून देणाऱ्याला १ लाख रुपयांच बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमधल्या सलीमपुर गावचा देवप्रकाश मधुकर हा रहिवाशी आहे. देवप्रकाशच्या घराला सध्या कुलूप असल्याची माहिती
दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात दुधाच्या दरासाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून विविध आंदोलने सुरू असून अनेक ठिकाणी शेतकरी आमरण उपोषणाला बसला आहेत. नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे गेल्या चार दिवसांपासून शेतकरी दुध दरासाठी आमरण उपोषणाला बसलेले असताना प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाहीए.. उत्पादन खर्चही आम्हाला मिळत नसल्याने आम्ही जगायचं कसं? असा संतप्त सवाल शेतक-यांनी उपस्थित केलाय..
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जवळपास 60% शेतकऱ्यांचे विमा दावे कंपनीने फेटाळले आहेत. हे दावे फेटाळण्याचं कारण काय होतं? हे कंपनीने कृषी अधिकाऱ्यांनाही सांगितले नाही. याबाबतची माहिती देण्यासाठी काल सायंकाळी पाच वाजेची डेडलाईन दिली होती. मात्र कंपनीकडून पूर्ण माहिती आली नाही.
आलेल्या माहितीमध्ये मोठी तफावत आढळून आली आहे. काल त्यांनी स्वीकृत केलेल्या दाव्यांची संख्या 2 लाख 29 हजार 553 इतकी दिली होती आणि सायंकाळी हीच संख्या 3 लाख 43 हजार 683 इतकी सांगण्यात आली. म्हणजे साधारण सव्वा लाख शेतकऱ्यांचे विमा दावे हे कंपनीने सात ते आठ घंट्याचा कालावधीमध्ये त्यांनी एक्सेप्ट केलेले आहे.
तरीसुद्धा अजून 2 लाख 61 हजार457 दावे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक पी.आर देशमुख यांनी दिली. 2 लाख 4 हजार 780 ही प्रकरण अशी आहे की जिथे वेगवेगळ्या कारणास्तव म्हणजे नैसर्गिक आपत्ती, अशा विविध कारणांनी हे फेटाळण्यात आले आहे.
अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय आज महाविकास आघाडीच्या वतीने दूध आणि कांद्याला भाव मिळावा यासाठी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला सुरुवात झाली असून पोलीस आणि निलेश लंके यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं कळतंय. सध्या परिसरात तणापूर्व परिस्थिती आहे. खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा जात असून महानगरपालिकेपासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये धाडी टाकल्या आहेत. ईडीच्या पथकाने मुंबईसह दिल्ली, अहमदाबाद आणि हैदराबाद येथे छापेमारी केली आहे. या छापेमारीत ४१ लाखांच्या रोख रकमेसह काही महत्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहे. दिल्लीच्या जल बोर्डाच्या संबंधित विभागात ही छापेमारी करण्यात आली आहे. गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे आणि तांत्रिक पुरावे जप्त केल्याचा ईडीचा दावा आहे.
रत्नागिरीच्या खेड तालुक्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला असून एकाच दिवशी ७ ठिकाणी चोऱ्या केल्याआहेत. खेड रेल्वे स्थानकाच्या शेजारी वेरळ येथे चोरट्यांनी एकाच सोसायटी मधील दोन बंगले आणि पाच फ्लॅट फोडले आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सध्या श्वान पथकासह खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फसवी- अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखेडे यांची टीका. भविष्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फसवी ठरेल व बारगळेल, खासदार बळवंत वानखडे यांचा मोठा दावा.
मध्यप्रदेशची ही योजना आयात केली मात्र अतिशय घाई गडबडीत ही योजना आणली. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेवून ही योजना आणली व अधिवेशन असल्याने याबाबत घाई केली गेली, दोन दिवसात नियम बदलले अभ्यास केला गेला नाही, असंही खासदार वानखेडे म्हणाले.
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबईत महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला महायुतीचे आमदार, खासदार, प्रमुख नेते हजर राहणार आहेत. लोकसभेनंतरची स्थिती, महायुतीच्या नेत्यांमधील समन्वय, मेळाव्यात चर्चा होणार असल्याची माहिती आहे. विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाबाबत देखील मेळाव्यात चर्चा होणार आहे. षण्मुखानंद सभागृहात उद्या संध्याकाळी हा मेळावा होणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच उमेदवार जिंकणार, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीचा एक उमेदवार पाडणार, कोणता पाडायचा ते वेळेवर ठरवू, असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत माध्यमांसोबत बोलत होते.
ठाण्यातील नेहमीच वर्दळीचा मार्ग असलेल्या घोडबंदर रोडवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे घोडबंदर मार्गावर मानपाडा ते पातलीपाडापर्यंत वाहनांचा लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे.यामुळं वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईतील अंधेरी उड्डाणपुलावर २ महाविद्यालयीन तरुणांना भरधाव टेम्पो उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक अटळ असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. अजित पवार यांनी उमेदवार मागे घेण्यास नकार दिला आहे. ११ जागांसाठी १२ अर्ज दाखल झाले आहेत.
भिवंडीत रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात दोन फुटांपर्यंत पाणी साचले आहे. भिवंडी शहरातील तीन बत्ती ,भाजी मार्केट, बाजारपेठ ,कल्याण नाका, पटेल नगर ,कमला हॉटेल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे पाहायला मिळाले.
अमरावतीमधील अचानक दोन मुलींची प्रकृती खालावल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अन्नातून विषबाधा झाली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज शुक्रवारी हाथरस दुर्घटनेतील दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान, राहुल गांधी यांनी हाथरस दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांची भेट घेतली.
पालघरमधील बोईसरच्या वर्तक गल्लीतील एका कपड्याच्या दुकानात गुरुवारी मध्यरात्री भीषण अशी आग लागल्याची घटना घडली आहे. या दुकानाला लागेलली आग तासाभरानंतर विझविण्यात अग्निशमन दलाला यश आलं. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीत कपड्याचे दुकान जळून लाखोंचे नुकसान झाले. आगीचे कारण मात्र अस्पष्ट आहे.
मुंबईकर खेळाडूंचा आज विधीमंडळात सत्कार होणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे यांचा सत्कार होणार आहे. विधीमंडळाच्या सेंट्रल हॅालमध्ये सायंकाळी ४ वाजता सत्कार सोहळा पार पडणार आहे.
राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात पुढील दोन दिवस विदर्भ ,मध्य महाराष्ट्र ,खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये अनेक ठिकाणी येलो अलर्ट जारी केला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील पावसाचा अंदाज आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेडमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.