Maharashtra Live News Updates: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक

Maharashtra Breaking LIVE Marathi Updates 2nd July : राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट, महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन, संसदीय अधिवेशन, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे
Saam TV Live Marathi News
Today's Marathi News Live By Saam TV Saam TV

NCP Meeting : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या आमदारांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक होत आहे. या बैठकीला नवाब मलिक यांनी हजेरी लावलीय. तटस्थ राहिलेले मलिक अजित पवार गटाच्या बैठकीला उपस्थित राहिलेत. मलिकांचा महायुतीला पाठिंबा आहे का? अशा राजकीय गोटात चर्चेला उधाण आले आहे.

Baramati Crime : रणजित निंबाळकर हत्या प्रकरण, आरोपींवर कारवाई करा निंबाळकर यांच्या पत्नीची मागणी

बारामती तालुक्यातील निंबूत गावात रणजित निंबाळकर यांची बैल वादातून हत्या झाली होती. त्यांच्या पत्नींने घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आरोपीवर कडक कारवाई करण्याची केली मागणी त्यांनी केलीय. रणजित निंबाळकर यांची बैलाच्या वादातून हत्या झाली होती.

Amravati News : घोरपड विकणाऱ्यांना फॉरेस्ट विभागाने घेतलं ताब्यात

अमरावती शहरातील वडाळी परिसरात घोरपड विक्री सुरू असल्याची माहिती हेल्प फाउंडेशनला मिळाली होती. हेल्प फाउंडेशन व फॉरेस्ट विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केलीय.

Parbhani Rain: परभणीच्या गंगाखेड तालुक्यात वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस

परभणीच्या गंगाखेड तालुक्यात धारासुर, खळी, रूमना,गोंडगाव परिसरात सायंकाळच्या वेळेस वादळी वाऱ्यासह ढगफुटी सदृश पाऊस झाला. तब्बल एक तास पडलेल्या पावसाने शेतांना नद्याचे स्वरूप आले. शेतकऱ्यांनी पेरणी केलेले सोयाबीन मूग उडीद कापूस तूर वाहत जात मोठया प्रमाणात नुकसान झाले.

 Pune Solapur Highway Accident : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कारचा टायर फुटून अपघात; ५ जण जागीच ठार

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील ब्रिझा गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात पाच जण जागीच ठार झालेत. तर एक जण गंभीर जखमी तर एक किरकोळ जखमी झालाय ... पुणे जिल्ह्याच्या इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 2 येथे राष्ट्रीय महामार्गावरती हा अपघात झालाय.. या अपघातात गाडीचा पुढच्या बाजूचा पूर्णतः चुराडा झालंय.

Pune Hit And Run Case: पोर्शे कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा यांना जामीन मंजूर

पोर्शे कार अपघात प्रकरणात चालकाचे अपहरण केल्याचा दोघांवर येरवडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील आणि आजोबा यांना जामीन मंजूर करणअ्यात आलाय. आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल आणि वडिल विशाल अग्रवाल यांनी चालकाचे अपहरण केल्याचा गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने अल्पवयीन आरोपीच्या वडील आणि आजोबांना जामीन मंजूर केला,मात्र विशाल अग्रवाल याला इतर गुन्ह्यांमध्ये न्यायालयीन कोठडीतच राहावे लागणार आहे.

MLA Kishore Darade : शिक्षक आमदार किशोर दराडे यांची येवला शहरातून विजयी मिरवणूक

उत्तर महाराष्ट्रातील चुरशीची व विविध आरोपनी गाजलेल्या शिक्षक आमदार निवडणुकीत महायुतीचे किशोर दराडे मोठ्या मताधिक्याने निवडून आले,दराडे यांच्या विजयाने त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला असून संध्याकाळी येवला शहरातून कार्यकर्त्यानी त्यांची मिरवणूक काढली,गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावर निघालेल्या मिरवणुकीत महिला मोठ्या संख्येने सामील झाला होत्या.

Mumbai Crime News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ५.३४ किलो गांजा जप्त

महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) मोठी कारवाई केली असून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ५.३४ किलो गांजा जप्त केला आहे. बँकॉक वरून आलेल्या प्रवाशाकडून गांजाज प्त करण्यात आला. ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळून गांजाची तस्करी सुरू होती.

Raju Shetti : गाईच्या दुधाला ४० रुपये दर द्या, नाशिकमध्ये होणाऱ्या 'स्वाभिनानी'च्या दूध परिषदेकडे राज्याचं लक्ष

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत दूध परिषद आणि शेतकरी मेळावा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात होत आहे. गेल्या काही दिवसांपासून दूध दरवाढीचा मुद्दा ऐरणीवर आहे. दुधाला ४० रुपये भाव मिळावा, यासाठी राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे आजच्या दूध परिषदेत राजू शेट्टी काय भूमिका घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Narendra Modi : नरेंद्र मोदींकडून राहुल गांधींचा बालकबुद्धी असा उल्लेख

नरेंद्र मोदी यांच्याकडून संसदेतील राहुल गांधी यांच्या कालच्या भाषणाचा बालकबुद्धी असा उल्लेख केला. राफेल, वीर सावरकर यांच्याबाबत बोलल्यावर माफी मागावी लागली. बालक बुद्धी सदनात कोणाला मिठी मारतात, कोणाला डोळा मारतात, त्यामुळे बालकबुद्धीकडून काही होणार नाही, असं वक्तव्य मोदींनी केलं आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेत मागासवर्ग आयोग देखील प्रतिवादी

मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेत मागासवर्ग आयोग देखील प्रतिवादी करण्यात आलं आहे. आयोगाला प्रतिवादी करण्याचा अंतरिम अर्ज न्यायालयाने केला मान्य केला आहे. मराठा आरक्षणाच्या समर्थनात असलेल्या याचिकाकर्त्यांचा मागासवर्ग आयोगाला प्रतिवादी करण्यास विरोध होता. तर आरक्षणाला विरोध असणाऱ्यांची आयोगाला प्रतिवादी करण्याची मागणी होती

 Shiv Sena Eknath Shinde Group : विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या आमदारांची आज बैठक

विधान परिषद आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आमदारांची आज संध्याकाळी ८ वा मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे. सह्याद्री अतिथीगहावर शिवसेनेचे सर्व आमदार व मंत्री यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Narendra Modi Speech : २५ कोटी जनतेची गरिबीतून मुक्तता : नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विरोधकांच्या गदारोळात संसदेत भाषण सुरू आहे. नरेंद्र मोदींनी २५ कोटी जनतेला गेल्या १० वर्षात गरिबीतून मुक्त केल्याचं सांगितलं. तसंच सबका साध सबका विकास साधल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. विरोधकांनी मात्र मणिपूरला न्याय द्या, नीट च्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू ठेवली आहे.

Narendra Modi : संसदेत मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांचा गदारोळ : लोकसभा अध्यक्षांनी खडसावलं

नरेंद्र मोदींच्या संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देताना विरोधकांनी गोंधळ घातला. सभागृहात नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहताच विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली आहे. त्यावरून लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना खडसावलं.

Zika Virus : पुण्यात आढळला झिकाचा सातवा रुग्ण, PMC कडून काळजी घेण्याचं आवाहन

पुण्यात झिकाचा सातवा रुग्ण आढळला आहे. पुण्यातील डहाणूकर कॉलनीत 45 वर्षीय महिलेला झिकाची लागण झाली आहे. पुणे महापालिकेकडून नागरिकांना काळजी घेण्याचे केले आवाहन. घरामध्ये 5-6 दिवस पाणी साठवून न ठेवण्याचे आरोग्य विभागाचं आवाहनही करण्यात आलं आहे.

Maharashtra Assembly Session: शासन दूध उत्पादकांना प्रति लिटर ५ रुपये अनुदान देणार, विखे पाटील यांचं आश्वासन

गाईच्या दुधाला ३० रुपये निश्चित करण्यात आले आहेत. त्यावर ५ रुपये अनुदान शासन देईल. त्यामुळे ३५ रुपये प्रति लीटर दुधाला भाव मिळणार आहे. शासन दूध उत्पादकांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचं राधाकृषण विखे पाटील म्हणाले.

Maharashtra Assembly Session: मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे ५ दिवसांसाठी निलंबन

राज्याच्या पावसाळी अधिवेशनातून मोठी बातमी समोर आली आहे. प्रसाद लाड यांना शिविगाळ केल्याचा ठपका ठेवत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचे ५ दिवसांसाठी निलंबन करण्यात आले आहे. 

OBC Reservation: OBC प्रकरणात सरकारची चालढकल? सर्वपक्षीय नेत्यांचं शिष्टमंडळ CM शिंदेंच्या भेटीला!

ओबीसीबाबत सरकारची भूमिका अद्यापही अस्पष्ट  आहे का? असा सवाल उपस्थित करत OBC सर्व पक्षीय बैठकीसाठी ओबीसी नेत्यांचं शिष्ठमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या भेटीला विधीमंडळात दाखल झाले आहे. २९ जून रोजी होणारी ओबीसी सर्व पक्षीय बैठक सरकारने रद्द करत ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती दिली होती. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला १३ जुलै पर्यंतची वेळ दिली आहे. त्या आधी ओबीसीबाबत सरकारने भूमिका स्पष्ट करावी यासाठी ओबीसी नेते आग्रही आहेत. मात्र त्यानंतर अजूनही सरकार या सर्व पक्षीय बैठकिबाबत साधा उच्चार काढत नसल्याने ओबीसी नेते अस्वस्थ सगेसोयरेंचा मुद्दा हा सत्ताधारी विशेषता शिंदेंनी जरांगेंना शब्द दिला. त्याबाबत मुख्यमंत्र्यानीच तोडगा काढावा अशी काही नेत्यांकडून माहिती

Beed News:  रोहित पवारांच्या वक्तव्याचा निषेध; अजित पवार गटाकडून उद्या परळी बंदची हाक

आमदार रोहित पवार यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उद्या परळी बंदची हाक देण्यात आली आहे..परळीतील बापू आंधळे खून प्रकरणात आमदार रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्याचा, अजित पवार गटाने आता निषेध व्यक्त केला आहे..

Maharashtra Politics: 'विधान परिषद निवडणुकीत माघार नाही', मविआचा निर्णय!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता जवळपास मावळल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीतून माघार घ्यायची नाही असा निर्धार महाविकास आघाडीने केला असून तिसरा उमेदवार दिल्याने तगडी फाईट होण्याची शक्यता आहे. 

Ashadhi Wari 2024: संत निवृत्ती महाराज यांच्या दिंडीचे नगरमध्ये आगमन

नाशिक त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्ती महाराज यांच्या दिंडीचे नगर शहरात आगमन झाले असून सालाबाद प्रमाणे अहमदनगर जिल्ह्यात या दिंडीचे ठिकठिकाणी उत्साहात स्वागत होत असते नगर शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या पिंपळगाव मळवी या ठिकाणी या दिंडीच्या आगमन झाले असून दरवर्षीप्रमाणे गावकऱ्यांनी या आलेल्या दिंडीचे स्वागत करून त्यांची सेवा केली.

Pune Sinhgad Road News: सिंहगड रस्त्यावर कोसळला सहा टनाचा  दगड; दुर्घटना टळली

पुण्यातील सिंहगड घाट रस्त्यावर दरडींसोबत सहा टनाचा मोठा दगड कोसळला. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने सुदैवाने जिवितहानी टळली आहे. वन विभागाने ब्रेकरच्या साह्याने हा दगड फोडून बाजूला केला. दरवर्षी पावसाळ्यात सिंहगड घाट रस्त्यावर दरडी कोसळत आहेत, त्यामुळे पर्यटकांवर दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात येतेय.

Maharashtra Assembly Session: विधान परिषदेचे कामकाज २ तासांसाठी तहकूब 

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी, विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. आज सलग दोन वेळा एक- एक तासासाठी परिषदेचे कामकाज ठप्प झाले होते. त्यानंतर कामकाजास सुरुवात झाल्यानंतर आता पुन्हा दोन तासासाठी विधान परिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले आहे.

CM Shinde Pandharpur Visit: CM शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार; आषाढी यात्रेच्या तयारीचा घेणार आढावा

आषाढी यात्रेच्या तयारीची पाहाणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. 13 किंवा 14 जुलै रोजी पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पंढरपूर दौरा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू असून गेल्या वर्षी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी यात्रेची पूर्व तयारीची पाहणी केली होती.

Ladaki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी नागरिकांची गर्दी

राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना सुरू केली असून कालपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. तर भंडारा येथे महिलांनी फॉर्म भरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याचं दिसून येत आहे. लाडकी बहीण या योजनेत महिलेला महिन्याला पंधराशे रुपये मिळणार असल्याने महिला ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवा जुळत करताना दिसून येत आहे.. भंडारा येथील सेतु केंद्रात महिला यांनी अर्ज भरण्यासाठी आणि अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवा जुळत करताना दिसून येत आहे...

Rahul Gandhi Letter To OM Birla: 'भाषणातून भाग वगळणे लोकशाहीविरोधात', राहुल गांधींचे ओम बिर्लांना पत्र

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहले आहे. कालच्या भाषणातील काही भाग हटवल्यानंतर हे पत्र लिहले असून भाषणातील भाग हटवल्याने मी आश्चर्यचकित झालो आहे. भाषणाचा भाग काढून टाकणे हे लोकशाहीच्या सिद्धांता विरोधात आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Yavatmal News: भावना गवळींची विधानपरिषदेवर वर्णी; समर्थकांचा जल्लोष

वाशिमच्या माजी खासदार आणि शिंदेगटाच्या नेत्या भावाना गवळींची विधान परिषदेवर वर्णी लागणार असल्याने यवतमाळच्या दत्त चौकात गवळी समर्थकांनी फटाके फोडून,ढोलताशांच्या गजरात आनंदोत्सव साजरा केला.भावना गवळी ह्या पाचटर्म खासदार म्हणुन निवडुन आल्या नुकताच त्यांना ऐववेळी लोकसभेला उमेदवार नाकारण्यात आली.तद्नंतर नाराज असलेल्या भावना गवळींचा पुनर्वसन करण्याच्या दृष्टीकोनातून विधान परिषदेवर पाठविल्या जात असल्याची चर्चा सुरू आहेत.

Kolhapur News:  रेशन धान्य दुकानदारांचे राज्यभरात आंदोलन

राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या वतीने आज राज्यभर आंदोलन छेडण्यात आले आहे. रेशन धान्य दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात हे आंदोलन करण्यात आले आहे. केंद्राच्या वतीने देण्यात येणारी सबसिडी रद्द करून सर्वसामान्य नागरिकांना धान्य द्यावे, सर्व नागरिकांना रेशनचे धान्य मिळालेच पाहिजे, गॅसची दरवाढ त्वरित कमी करावी, रेशन धान्य दुकानांचे कमिशनमध्ये वाढ करावी अशा मागण्या करण्यात आलेल्या आहेत.

Melghat Bus Accident: मेळघाटात बसचा अपघात; बचावपथके रवाना

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या पोपटखेडपुढ असलेल्या अमरावती जिल्ह्यातील भागात बसचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. खटकालीजवळील 'हाय पॉईंट'जवळ बस पलटी झाली आहे. बस दरीत कोसळल्याची भीती व्यक्त केली जात आहे.अकोटवरून मध्यप्रदेशमध्ये जात होती बस. या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अकोटवरून बचावपथक आणि रुग्णवाहिका रवाना. घटनेत नेमकं काही जिवितहानी आणि किती प्रवासी जखमी झालेत याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

PM Narendra Modi Speech: NDAच्या खासदारांमध्ये एकवाक्यता हवी' PM मोदींचा कानमंत्र

"तीन वेळा आपला विजय झाल्यामुळे काहीजण बेचैन झाले आहेत पण तुम्ही त्याकडे लक्ष देऊ नका. नवीन संसद आणि त्याची प्रक्रिया समजून घ्या. NDA च्या सगळ्या खासदारांच्या बोलण्यामध्ये एकवाक्यता हवी, एनडीएचा एक प्रवक्ताही असावा असे मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले. तसेच नेहरूंच्या समोर कुठल्याही अडचणी नसताना ते जिंकले होते पण आपल्यासमोर अनेक आव्हान आणि अडचणी असतानाही आपण जिंकलो, असेही ते म्हणाले.

Maharashtra Politics: मुंबई पदवीधर निवडणूकीत विजयी; अनिल परब यांचे मविआकडून अभिनंदन

मुंबई पदवीधर निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अनिल परब यांचं मविआकडून विधान भवनात अभिनंदन करण्यात आलं. यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप, अनिल देशमुख उपस्थित होते

Lonavala News:  भुशी धरणाजवळ असलेल्या टपऱ्यांवर कारवाई

भुशी धरणातील दुर्घटनेनंतर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली असून लोणावळ्यातील भुशी धरणाजवळ असलेल्या टपऱ्यांवर बुलडोझर चालवण्यात आले आहे. धरणाजवळ असलेल्या अनाधिकृत टपऱ्यांवर अतिक्रमण विभागाने ही कारवाई केली आहे. लोणावळ्यातील अनेक ठिकाणी ३१ ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

Manoj Jarange News : मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, कुणी केली मागणी?

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, अशी मागणी जरांगे यांचे सहकारी पांडुरंग तारख यांनी केली आहे. आज जालना जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी करणार असल्याचं तारख यांनी स्पष्ट केलं आहे. मनोज जरांगे राहत असलेल्या अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरावर ड्रोनद्वारे टेहाळणी केल्याचा प्रकार समोर आला होता. यावरून तारख हे मागणी करणार आहेत.

Pune Ahmednagar Highway : पुणे-अहमदनगर महामार्गावरील बर्निंग कारचा थरार

पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिक्रापुर येथे बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. भरधाव वेगाने जाणाऱ्या CNG कारला अचानक आग लागली. आग लागल्याचं कळताच चालकासह कारमधील प्रवाशांनी प्रसंगावधान दाखवत आपला जीव वाचवला. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितानी झाली नाही. मात्र, आगीत कार पूर्णत: जळून खाक झाली आहे.

Ahmednagar News : राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज राहुरी शहरात भव्य रास्तारोको

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरात रास्ता रोको आंदोलन केलं जाणार आहे. दुधाला किमान 40 रुपये दर मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी होणार आहेत. थोडाच वेळात होणार आंदोलनाला सुरुवात.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पशु संवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जिल्ह्यात आज शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. विशेष बाब म्हणजे आंदोलनातशेतकऱ्यांसह जनावरे देखील आणले जाणार आहेत.

राहुरीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे देखील आंदोलनात सहभागी होणार आहेत.

Pankaja munde News : पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी; कार्यकर्त्यांनी ५००० नारळ फोडून नवस केला पूर्ण

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळाल्यानंतर मुंडे समर्थकांमध्ये उत्साह दिसून येतो आहे. बीड जवळील नामलगाव गणपतीला मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर संधी मिळावी त्याबरोबरच मंत्रिपद मिळावं असा नवस केला होता.

हा नवस पूर्ण झाल्याने गणेश लांडे आणि गणेश पुजारी हे मुंडे समर्थक नामलगावच्या गणपतीच्या मंदिरात आले आहेत. यावेळी पाच हजार नारळ फोडले जातायत. पंकजा मुंडे उमेदवारी अर्ज दाखल करतील तोपर्यंत हा नवस अशाच पद्धतीने नारळ फोडून पूर्ण केला जाणार आहे. नामलगावच्या गणपतीला 5000 नारळाचा नवस पूर्ण केला जातोय.

 Kolhapur News : कोल्हापुरात रिक्षाचालकांचे जेल भरो आंदोलन; विलंब शुल्क रद्द करण्याची मागणी

रिक्षा चालक आणि वाहक यांच्या विविध मागण्यांसाठी कोल्हापुरात आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू झाला आहे. कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती चौक असलेल्या दाभोळकर चौक इथं रिक्षा चालकांच्या वतीने जेल भरो आणि रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. रिक्षा पासिंगचा 50 रुपयांचा विलंब आकार रद्द करावा या मागणीसाठी आज कोल्हापुरात जेलभरो आंदोलन करण्यात आलं.

कोल्हापुरातील रिक्षा चालक संघटना दाभोळकर चौक परिसरामध्ये एकत्र येत त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत हे विलंब शुल्क तात्काळ रद्द करावे ही मागणी केली. राज्यभर रिक्षा चालकांचे आंदोलन सुरू झाले आहे.

मात्र सरकार कुठल्याही पद्धतीने दखल घेत नाहीत. 'आम्हाला काही देऊ नका, आणि आमच्याकडे काही घेऊ नका' अशी मागणी करत तात्काळ हा विलंब शुल्क रद्द करावा अन्यथा 20 लाख रिक्षा चालक विधानसभा निवडणुकीवरती बहिष्कार टाकतील असा इशारा आंदोलकांनी दिला.

Ahmednager News : अनुदानाची भिक नको, दुधाला किमान 40 रुपये भाव द्या; अकोले येथे शेतकऱ्यांचं उपोषण

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गणोरे गावात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे. दूधाच्या भावात वाढ करा, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. शुभम आंबरे आणि संदीप दराडे या शेतकरी पुत्रांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे. त्यांच्या उपोषणाला गणोरे ग्रामस्थांसह पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा पाठिंबा दिला आहे. अनुदानाची भिक नको. दुधाला किमान 40 रुपये भाव द्या, अशी आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी आज गणोरे गावात जाऊन घेणार आंदोलकांची भेट घेणार आहेत.

maharashtra assembly monsoon session :  भाजपकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात आंदोलन

भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर राहुल गांधी आणि अंबादास दानवे यांच्या विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. यावेळी भाजप आमदार प्रसाड लाड यांच्यासहित इतर आमदार उपस्थित आहेत. यावेळी भाजप आमदारांकडून विरोधकांच्या विरोधात घोषणाबाजी सुरु आहे.

Amaravati News : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची आर्थिक लूट; पैसे घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

राज्य सरकारने महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू आहे. राज्यभरामध्ये सर्वच महिला योजनासाठी लागणाऱ्या कागदपत्राची जुळवाजुळव करीत आहे. परंतु अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यातील सावंगी गावातील तलाठी तुळशिराम कंठाळे हे आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचारी प्रत्येक महिलांनकडून 50 रुपये घेत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Mumbai News : मुंबईच्या चेंबूरमधील कॉलेजमध्ये नकाब,  हिजाब घालण्यास बंदी; कॉलेजकडून विद्यार्थ्यांना सूचना

मुंबईतील चेंबूरच्या आचार्य आणि डी के मराठे कॉलेजमध्ये नकाब, हिजाब, बुरखा ,टोपी याच्यानंतर आता जीन्स टी-शर्ट आणि जर्सी परिधान करण्यास घालण्यास बंदी घातली आहे. याबाबत कॉलेजच्या प्राचार्यांनी नोटीस काढून मुलांना सूचना दिल्या आहेत.

Sanjay Raut News : अकेला सब पे भारी; राहुल गांधींच्या मुद्यावरून संजय राऊतांची भाजपवर टीका

संजय राऊत काय म्हणाले?

एक अकेला सब पे भारी, अस चित्र काल होतं. राहुल गांधी बोलत असताना ९ मंत्री उभे राहिले. आम्हाला कालपर्यंत संरक्षण मागावं लागत होतं. राहुल गांधी यांनी त्यांना गुडघ्यावर आणलं, अशी टीका संजय राऊत यांनी भाजवर केली.

Nashik Rain Update : नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरु

नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू होता. आज सकाळी पावसाने नाशिकमध्ये जोरदार हजेरी लावली. जोरदार पावसाने धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला.

Uddhav Thackeray Group : ठाकरे गट विधान परिषदेच्या निवडणुकीत मिलिंद नार्वेकरांना उतरवणार?

ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. विधान परिषद निवडणुकीत विधानसभा सदस्यांच्या मतांचे गणित जुळवून आणण्यासाठी मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी देणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Team India : विश्वचषक जिंकूनही टीम इंडियाचा मुक्काम अमेरिकेतच

विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ अजूनही उत्तर अमेरिकेतच आहे.

उत्तर अमेरिकेतल्या बार्बाडोसमध्ये चक्रीवादळामुळे कर्फ्यू लागू करण्यात आहे.

या भागात वीज आणि पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.

भारतीय क्रिकेट संघ अद्याप बार्बाडोसमध्येच आहे. त्याचबरोबर माध्यमांचे प्रतिनिधी आणि भारतीय संघही अडकून पडला आहे.

कर्फ्यू लावल्याने सगळ्या विमानांची उड्डाण रद्द करण्यात आली आहे.

Zika virus : पुण्यात झिका विषाणूचा आणखी एक रुग्ण

पुण्यात झिकाचा आणखी एक रुग्ण आढळला आहे.

पुणे शहरातील एकूण रुग्णसंख्या सहावर पोहोचली आहे.

एरंडवणे परिसरातील आणखी एका गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाला आहे. शहरात एरंडवणे परिसरात ४ आणि मुंढव्यातील कोद्रे वस्ती परिसरात २ असे एकूण शहरात झिकाचे ६ रुग्ण झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.