

जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील मतभेद पुन्हा चर्चेत.
नंदुरबारमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून भाजप आणि शिंदेसेना आमनेसामने.
एका स्वीकृत नगरसेवकाने राजीनामा दिल्यानंतर नव्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू.
सागर निकवाडे, साम प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या निवडणुकांआधी महायुतीत वादाचे फटाके फुटू लागलेत. झेडपी निवडणुकीवरून भाजप-शिंदेसेना आमनेसामने आलेत. या वादाला भडका देणारं विधान शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलंय. नंदूरबारमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून सत्ताधारी शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील वाद पुन्हा एकदा उफाळून आलाय. स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपवर थेट हल्लाबोल केलाय. एक लाख १० हजार मतदारांमध्ये भाजपला एकही पात्र उमेदवार सापडला नाही, अशी खोचक टीका शिवसेनेच्या आमदाराने केलीय.
एका स्वीकृत नगरसेवकाने राजीनामा दिल्यानंतर नव्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होती. मात्र, भाजपकडून देण्यात आलेल्या उमेदवाराचा अर्ज कागदपत्रांतील त्रुटींमुळे प्रांताधिकाऱ्यांनी अपात्र ठरवला. यावरून शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपला जोरदार लक्ष्य केले आहे. नंदूरबार शहरात तब्बल 1 लाख 10 हजार मतदार असताना, भाजपला स्वीकृत नगरसेवकपदासाठी एकही लायक आणि पात्र माणूस मिळू नये, याची मला लाज वाटते.
अशा सडेतोड शब्दांत रघुवंशी यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच, योग्य उमेदवार शोधण्यासाठी इतरांचे मार्गदर्शन घेण्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. या ताज्या घडामोडीमुळे महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
नंदूरबारमध्ये महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून येत आहे. येथे भाजप, शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीचे तिन्ही घटक पक्ष एकमेकांविरोधात दंड थोपटणार आहेत. त्यामुळे महायुतीमधील या अंतर्गत वादामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. जिल्ह्यात निवडणुकीआधीच राजकीय संघर्षाला सुरूवात झालीय. भाजपला सत्ताकाळातील विकासकामांचा विश्वास व्यक्त केला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.