Ashish Shelar-Uddhav Thackeray : भाजपशी फारकत घेत महाविकास आघाडीसोबत जाऊन उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापन केल्यानंतर सुरू झालेला वाद सत्तांतरानंतरही निवळलेला दिसत नाही. भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यात टीका-प्रतिटीकेचा 'सामना' सुरूच आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी आता उद्धव यांच्यावर टीकेचा बाण सोडला आहे.
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) हे सहकुटुंब शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी टीका केली. मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी विश्वासघात केला. मोदीजींचे फोटो लावून मते मिळवली. युतीत मते मिळवून उडी मात्र लंकेत मारली, अशा शब्दांत शेलार यांनी उद्धव यांच्यावर हल्लाबोल केला. (Maharashtra Politics)
सत्तेसाठी उडी मारणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आम्हाला ज्ञान देऊ नये. मते मिळवण्यासाठी खोटं बोलणं हाच यांचा उद्योग आहे, असेही शेलार म्हणाले. २०२४ नंतर निवडणुका होणार नाहीत या ठाकरेंच्या वक्तव्यावरही त्यांनी भाष्य केले. जनतेत भ्रम पसरवणे आणि मतांसाठी खोटं बोलण्याचं काम उद्धव ठाकरे करत आहेत, असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायला भाजप घाबरते अशी टीका ठाकरे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यावरही शेलार यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांचा अभ्यास कच्चा आहे तेच लोक असे बोलतात. सध्या ओबीसी आरक्षण प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तरीही त्यावर बोलणे हा मूर्खपणा सार्वजनिक करण्यासारखे आहे, असा टोला त्यांनी लगावला.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवरही शेलार यांनी भाष्य केले. काका-पुतण्यात संवाद असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आम्ही विरोध करण्याचा अथवा त्यावर प्रतिक्रिया देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले. चांद्रयान ३ च्या यशस्वी लँडिंगनंतर भाजप आणि काँग्रेसमध्ये श्रेयवाद सुरू झाला आहे, त्यावर बोलताना चांद्रयान ३ मोहिमेच्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही. हे श्रेय भारताचे आणि शास्त्रज्ञांचे आहे. असे शेलार म्हणाले.
भाजपमध्ये विरोधी पक्षांचे नेत्यांचेच इनकमिंग मोठ्या प्रमाणात असल्याची टीका विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून सातत्याने होते. तर भाजपच्या निष्ठावंतांवर अन्याय होतो असाही टोला विरोधक लगावतात. त्याला शेलार यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. निष्ठावंतांना न्याय देण्याची भाजपची भूमिका असते. आमचं कुटुंब वाढलं असून, त्यात निष्ठावांनांचे स्थान आम्ही निश्चित ठेवू, असे शेलार यांनी स्पष्ट केले.
शेलार यांनी सहकुटुंब साईंचं दर्शन घेतलं. श्रावण महिन्यानिमित्त त्यांनी साईंचे दर्शन घेतले. साईबाबांचे दर्शन घेऊन मनाला समाधान मिळालं. ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही, याची चिंता बळीराजासह सर्वांनाच आहे. या सगळ्या अडचणी सोडवण्यासाठी शक्ती मिळो अशीच प्रार्थना साईंना केली, असे शेलार यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.