भूषण अहिरे, साम प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदखेडा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार संदीप बेडसे यांच्या प्रचारासाठी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची नरडाणा येथे जाहीर प्रचार सभा पार पडली. यावेळी जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या 'वोट जिहाद' संदर्भातील वक्तव्याचा समाचार घेतला.
पराभूत झाल्यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी वोट जिहादचा मुद्दा भाजपने आणला. महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 31 जागा मिळाल्या. फक्त विशिष्ट समाजानेच भाजपविरोधात मतदान केले नाही तर पूर्ण महाराष्ट्र त्यांच्याविरोधात गेला होता, असे म्हणत जयंत पाटील यांनी फडणवीसांना आरसा दाखवला.
अनेक वर्ष आपण शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. त्यांनी माझ्या मतदारसंघात येऊन चांगले शब्द माझ्याबद्दल काढले. निवडणूक झाल्यानंतर संख्या बघितल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत बोलणे योग्य ठरेल, आज कशाचीही घाई आम्हाला नाही, असे मत जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
केंद्रात आणि राज्यात तुमचेच सरकार आहे आणि जनता सेफ नाही हेच तुम्ही सांगात आहात. निवडणुकीसाठी असे स्लोगन करायचे आणि मत मिळवायचे असा हा भाजपचा प्रकार असून लोकांसमोर महागाई, बेरोजगारी, आरक्षणाचे प्रश्न उभे आहेत, मात्र भाजप आणि मित्र पक्ष हिंदू मुस्लिम यांच्यात अंतर निर्माण करायचं हे कायमच भाजप प्रयत्न करते.
हे निवडणुकीपुरतं यांचं काम असतं ते महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षात आले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रचार जोरात सुरू आहे. उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेचा मिळत असून महाविकास आघाडीचे सरकार आणायचे असा निर्णय जनतेने घेतला आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.