
औरंगाबाद : राजकारणात एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले कधी एकमेकांचे सच्चे मित्र होतात, हे कळतंच नाही. महाराष्ट्रात सध्या आपण ते पाहतच आहोत. भाजपचे नेते दिल्लीमध्ये जाऊन कट्टर वैचारिक विरोध असलेल्या एमआयएमच्या नेत्यांचा सत्कार केला. सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होतोय, ज्यात औरंगाबाद भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) विजय औताडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी हे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचा हसतमुखाने सत्कार करत आहेत.
भाजपचे जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत एमआयएमच्या खासदारांचा दिल्लीमध्ये जाऊन सत्कार केला म्हणजे काहीतरी विशेष असेल, यावर चर्चा सुरू झाली आहे. व्हाट्सऍपच्या वेगवेगळ्या ग्रुपवर चर्चा रंगू लागल्या आहेत. विशेष म्हणजे हा फोटो दिल्लीमधला असून केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या रेल्वे भवन परिसरातला आहे. दिल्लीतील रेल्वे भवनाच्या इमारती बाजूला हसतमुखाने सत्कार करणारे भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे आणि कार्यकर्ते हे खासदार इम्तियाज जलील यांचा सत्कार का करत होते? याचे कोडे अद्याप उलगडलेले नाही.
हे देखील पहा -
यावर आता औरंगाबाद शहरात चर्चा सुरू आहेत, ती निवडणुकीच्या अनुषंगाने. औरंगाबाद महानगरपालिकेची लवकरच निवडणुक होईल, अशी शक्यता आहे. आतापर्यंत औरंगाबाद महापालिकेत भाजप-शिवसेना युती होती. आता मात्र राज्यात भाजप आणि शिवसेना हे एकमेकांच्या विरोधात असल्यानं येणाऱ्या महापालिका निवडणुकीतही ते विरोधात असतील, हे आजतरी स्पष्ट आहे. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदही शिवसेनेच्या सोबत असेल. त्यामुळे भाजपला स्वतःच्या बळावर निवडणूक लढवावी लागणार आहे. सत्तेसाठी जर ऐनवेळी कुणाची मदत घ्यावी लागली तर कुणी तरी जवळ करावं लागेल कुणाचा तरी बाहेरून पाठिंबा घावा लागेल, म्हणून भाजपचे स्थानिक नेते चाचपणी करत असावेत अशी चर्चा सुरू झालीय.
भविष्याच्या पोटात काय दडलंय आणि कोण कुणाच्या सोबत कोण जाईल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे आतापासूनच एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि औरंगाबादचे स्थानिक खासदार इम्तियाज जलील यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवावेत यासाठीच हा खटाटोप असावा अशी औरंगाबादमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय औताडे यांना विचारले असता, त्यांनी सत्कार केला नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, सत्कार एमआयएमचा कार्यकर्ता करीत होता, आम्ही जवळ असल्याने थांबलो होतो. तसे आमचे सत्कार करण्याचे प्रयोजन नव्हते, असे स्पष्टीकरण दिले. मात्र भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये एखादा एमआयएमच्या कार्यकर्ता कसा आणि कुठून अचानक अवतरला याचे उत्तर मात्र दिले नाही.
इम्तियाज जलील हे सव्वा दोन वर्षापूर्वी खासदार झाल्यानंतर विमान आणि रेल्वेचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीवेळा सभागृहात प्रश्न मांडला होता. पण दिल्लीतला रेल्वे भवनाखाली भाजपच्या जिल्हाध्यक्षासह पदाधिकाऱ्यांनी एमआयएमच्या प्रदेशाध्यक्ष आणि खासदार यांचा सत्कार का केला हे उलगडलं नाही. सोशल मीडियामध्ये मात्र खुमासदार चर्चा सुरू आहे. जसं भविष्याच्या पोटात काय दडलंय हे कोणी सांगू शकत नाही, तसच काहीसं या या फोटोत खरं काय दडलंय हे भाजपचे पदाधिकारी जाणो.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.