शुभम देशमुख, साम टीव्ही
अजित पवार गटाचे भंडाऱ्याचे आमदार राजू कारेमोरे यांचा महिला अधिकाऱ्याला धमकावल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. एकीकडं लाडकी बहीण योजना तर दुसरीकडं सत्ताधारी आमदारानं महिला अधिकाऱ्याला फोनवरुन दमदाटी करत असल्याचं दिसून येत आहे. तसेच त्यांना निपटविण्याची भाषा देखील बोलत असल्याचं स्पष्ट ऐकायला येत आहे. यावरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महायुती सरकारने माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना योजना अंमलात आणली. या योजनेचा तिन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार सुरु आहे. याच कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे लाडक्या बहिणींसोबत संवाद साधण्यासाठी भंडारा दौऱ्यावर आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारला भंडाऱ्याच्या तुमसर येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रम होता. जनसन्मान यात्रेनिमित्त ते लाडक्या बहिणींशी संवाद साधणार होते. मात्र, गुरुवारला आणि शुक्रवारला भंडारा जिल्ह्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली. यामुळं अजित पवारांचा कार्यक्रम असलेले स्थळावर चिखल निर्माण झाल्याने त्यावर तातडीनं उपाययोजना करण्याची जबाबदारी स्थानिक प्रशासनाची होती.
तुमसर नगर पालिकेची जबाबदारी असताना त्यांच्याकडून ते करण्यात आलं नाही. यावरून आमदार कारेमोरे यांनी महिला अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यांनी तुमसर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी करिष्मा वैद्य यांना धमकावल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, साम टीव्हीने या ऑडिओ क्लिपबाबत आमदार राजू कारेमोरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा "राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शासकीय कार्यक्रमाचं निमंत्रण प्रशासनाकडून सर्वांना देण्यात आलं. कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांची उपस्थिती लक्षात घेता नियोजन ढिसाळ होऊ नये यासाठी मी मुख्याधिकारी वैद्य यांना फोन केला होता. मात्र, त्यांच्याकडून उडवाउडवीचं उत्तरं आली, असं आमदार कारमोरे म्हणाले.
फोनवर मी फक्त कार्यक्रम निपटविण्याबाबत बोललो. मात्र, महिला अधिकाऱ्यांनी माझ्या बोलण्याचा विपर्यास केला आणि अर्धीच ऑडिओ व्हायरल करून माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे, असं स्पष्टीकरण आमदार राजू कारमोरे यांनी दिले. याबाबत महिला अधिकारी वैद्य यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.