
लग्नसराईच्या मोसमात अनेक विवाह सोहळे पार पडत आहेत. अशातच बीडमधील शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहातील अनाथ पूजा हिच्या लग्नाचा एक वेगळा आणि हृदयस्पर्शी सोहळा पार पडला. पूजाचा विवाह अण्णासाहेब सातपुते या तरुणाशी झाला असून, शासनाच्या अनाथालयात वाढलेली ही कन्या आज सातपुते कुटुंबाची सून बनली आहे. विशेष म्हणजे, बीडचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी स्वतः पूजाचे पालकत्व स्वीकारत तिचे कन्यादान केले. नेहमी कठोर आणि रुक्ष वाटणाऱ्या प्रशासनाच्या या संवेदनशील वागणुकीने उपस्थितांचे डोळे पाणावले. कन्या पाठवणीच्या भावनिक क्षणी पापण्यांच्या कडा ओलावल्या, आणि या लग्न सोहळ्याने माणुसकीचा अनोखा संदेश दिला.
सिडको एन-४ येथील गोपीनाथ मुंडे भवनात आज शासनाच्या सावित्रीबाई महिला राज्यगृहातील चि. सौ. कां. पूजा आणि चि. अण्णासाहेब सुंदरराव जनार्दन सातपुते यांचा शुभविवाह मंगलाष्टकांच्या गजरात आणि आशिर्वादरूपी अक्षतांच्या वर्षावात हर्षोल्हासात संपन्न झाला.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या विवाहप्रसंगी कन्यादान केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती करुणा स्वामी या सुद्धा या सोहळ्यात सहभागी झाल्या. कन्यादानाच्या सर्व विधीत त्यासहभागी होत्या. जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे आणि राज्यगृहाच्या अधीक्षक अपर्णा सूर्यवंशी विभागीय उपायुक्त श्रीमती हर्षा देशमुख यांनी विवाहाच्या सर्व तयारीत मोलाची भूमिका बजावली. या विवाह सोहळ्यासाठी राजेंद्र झंवर, कांचन साठे, रश्मी कुमारी, कविता वाघ यांनी सहकार्य केले.
काळजीपूर्वक निवड आणि प्रक्रिया
या विवाहासाठी अण्णासाहेब सातपुते यांच्या आई वडीलांनी राज्यगृहात संपर्क केला होता. त्यानुसार वरवधु पसंती झाली. ‘वर' अण्णासाहेब जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार नोंदणी केंद्रात व्यवस्थापक या कंत्राटी पदावर कार्यरत आहेत. तर ‘वधू’ पूजा ही १० वी उत्तीर्ण असून तिने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.
एकंदर सगळी माहिती, कौटुंबिक पार्श्वभूमी, मानसिकता, जबाबदारीची जाण लक्षात घेऊन त्यांची निवड करण्यात आली. वर वधुंची आपापसात भेट; हितगुज झालं. दोघांची एकमेकांना पसंती आहे. हे लक्षात घेतल्यानंतरच स्थानिक व्यवस्थापन समिती ज्यात अशासकीय सदस्यही असतात हे सगळे जण वराच्या घरी गेले. सर्व परिस्थिती पाहुन मगच या विवाहाला संमती दिली. त्यानंतर विभागीय समितीने सगळी परिस्थिती पाहुन या विवाहास मान्यता दिली. आधी सोमवारी (दि.३) नोंदणी विवाह करण्यात आला. विवाहास पारंपरिक संस्काराचे स्वरुप मिळावे म्हणून छत्रपती संभाजीनगरमधील गोपीनाथ मुंढे मंगल कार्यालयात विधीवत समारंभ पार पडला.
पुनर्वसनाचे यशस्वी उदाहरण
पूजा ही एक अनाथ मुलगी. पैठण येथील बालगृहात तिचे बालपण गेले. तेथेच तिचे प्राथमिक शिक्षण झाले. वयाच्या १८ व्या वर्षानंतर ती महिला बालविकास विभागाच्या छत्रपती संभाजीनगर येथील सावित्रीबाई राज्यगृहामध्ये आली. येथे महिलांच्या पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबवले जातात. पूजाने येथे फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून, ती आता आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या मार्गावर आहे. ‘मला आता हक्काचे कुटुंब मिळाले आहे. या क्षणी मी अतिशय आनंदी आहे,’ अशी भावना पूजाने व्यक्त केली.
समाजासाठी संदेश
हा विवाह केवळ दोन जीवांचे मिलन नव्हते, तर तो समाजासाठी एक सकारात्मक संदेश होता. अनाथ मुलींना पुनर्वसनाच्या माध्यमातून एक नवीन जीवन मिळू शकते, हे या विवाहाने अधोरेखित केले. प्रशासनाच्या संवेदनशीलतेने आणि सामंजस्यपूर्ण प्रयत्नांनी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. शासकीय सावित्रीबाई महिला राज्यगृहातील ‘पूजा’ हिचा विवाह आज अण्णासाहेब सातपुते या होतकरु युवकाशी करण्यात आला. हा विवाह दोन जीवांचे मिलन तर होताच त्यासोबतच अनाथाश्रमात लहानाची मोठी झालेल्या पूजा ला हक्काचं घर मिळवून देणाराही ठरला.
समाजाची जबाबदारी
अनाथ मुलींना सुरक्षित आणि सक्षम आयुष्य देण्यासाठी समाजानेही सरकारी यंत्रणेसोबत पुढाकार घ्यायला हवा. पूजाच्या विवाहाने सिद्ध केले की योग्य प्रयत्न आणि संवेदनशील दृष्टीकोनातून अनाथ मुलींनाही हक्काचे घर आणि कुटुंब मिळू शकते. या प्रेरणादायी विवाह सोहळ्यामुळे प्रशासनाच्या उपक्रमाला नवी दिशा मिळाली आहे. भविष्यात अशा उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप मिळावे, अशी समाजाची अपेक्षा आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.