भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (१३ मार्च) रोजी जाहीर झाली. राज्यातील २० उमेदवारांचा यामध्ये समावेश आहे. भाजपमधून अनेक नवीन चेहऱ्यांना यामध्ये संधी देण्यात आली आहे. भाजपच्या यादीतील एक नाव पाहून अनेकजण सरप्राईज झाले. बीडमधून पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली. पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट मिळल्याने त्याचा मागील पाच वर्षांचा राजकीय वनवास संपल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
मात्र पंकजा मुंडे यांचा मागील पाच वर्षांचा राजकीय प्रवास इतका सोपा नव्हता. राज्याच्या सक्रीय राजकारणातून त्या अक्षरश: बाजूला झाल्या होत्या. मात्र ज्या धनंजय मुंडे यांच्यामुळे त्यांची आमदारकी गेली होती, तेच धनंजय मुंडे आता त्यांच्या प्रचारात दिसतील. मागील पाच वर्षात बीडचं राजकारण नेमकं कसं बदललं, यावर एक नजर टाकूया.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) २००९, २०१४ असं सलग दोनवेळा बीडच्या परळी विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिल्या होत्या. २०१४ साली गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा राजकीय वारसा पंकजा मुंडे यांच्याकडे आला होता. त्या निवडणुकीत पंकजा मुंडे मोठ्या मताधिक्याने निवडून देखील आल्या. राज्यात कॅबिनेट मंत्रिपदी काम करण्याची संधीही मिळाली. मात्र सत्तेत मंत्रिपदी असताना देखील पुढच्या २०१९च्या निवडणुकीत त्यांचा अनपेक्षितरित्या पराभव झाला.
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सत्तेला सुरुंग लावला. जवळपास ३० हजारहून अधिकची मतं घेत धनंजय मुंडेंनी विजयाचा गुलाल उधळला. त्यानंतर खऱ्या अर्थाने पंकजा मुंडे यांच्या राजकीय कारकीर्दिला उतरली कळा लागली. धनंजय मुंडे त्याच वर्षी महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री बनले. त्यानंतर त्यांनी आक्रमक राजकारण करत बीडमध्ये आपलं राजकीय वजन वाढवलं. स्थानिक स्वराज्य संस्था, बाजार समित्या अशा अनेक ठिकाणी धनंजय मुंडे यांच्यासमोर पंकजा मुंडे पराभूत होत गेल्या.
एकीकडे धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजकीय आलेख वर वर जात होता, तर पंकजा मुंडे यांचा आलेख त्याच वेगाने खाली येत होता. पंकजा मुंडे यांचं कमबॅक होईल की नाही असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र २०२२ नंतर राज्यातील बदलेल्या राजकीय परिस्थितीमुळे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी एकत्र आले. त्यामुळे बीडमधील राजकीय परिस्थिती देखील बदलली. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीत सामील झाल्याने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे देखील एकत्र आले. अनेक व्यासपीठांवर मुंडे बंधू-भगिणी एकत्र दिसू लागले. दोघांमधील राजकीय वैर हळूहळू संपुष्टात आलं. आता लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे बीडमध्ये एकत्र प्रचार करतानाही दिसतील.
भाजपमधील अंतर्गत राजकारणाचा फटका?
पंकजा मुंडे यांना भाजपमधील अंतर्गत राजकारणाचा देखील फटका बसल्याचं बोललं जातं. भाजपमध्ये पंकजा मुंडे या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचं बोललं जातं होतं. या राजकीय स्पर्धेतूनच त्यांचा २०१९ साली पराभव झाल्याची देखील चर्चा होती. परळी विधानसभा निवडणुकीत भाजपने धनंजय मुंडे यांना छुप्या मार्गाने मदत केल्याने पंकजा मुंडे यांचा पराभव शक्य झाल्याचं बोललं जातं. पंकजा मुंडे यांच्या नाराजीचं कारण देखील हेच असल्याची चर्चा होती. अनेकदा त्यांनी आपली नाराजी भाषणांमध्ये बोलून दाखवली होती. मात्र पंकजा मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना भापजच्या राष्ट्रीय कार्यकारणीत संधी देण्यात आली. मात्र राज्याच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठीच त्यांनी ही जबाबदारी दिली गेल्याचीही चर्चा होती.
पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी का?
पंकजा मुंडे नाराज असल्याने त्यांची मनधरणी करण्यासाठी भाजपकडून गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. त्यामुळेच पंकजा मुंडे यांचा राजकीय वनवास संपण्याची जबाबदारी भाजपने घेतली. भाजपकडून लोकसभेसाठी ताकदीचे उमेदवार देण्याचं आधीच ठरलं होते. यातूनच दोन टर्म खासदार असलेल्या प्रीतम मुंडे यांना डावलून पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली. मात्र या उमेदवारीतून दोन गोष्टी साध्य करण्यात आल्या आहेत. पंकजा मुंडे या केंद्रात गेल्याने महाराष्ट्र भाजपमधील संभांव्य अंतर्गत संघर्ष टाळता येणार आहे. याशिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार धनंजय मु्ंडे यांची जागादेखील सेफ करण्यात आली आहे. त्यामुळे बीडमध्ये महायुतीत रस्सीखेच देखील आता होणार नाही.
प्रीतम मुंडे यांचं काय?
दोनना खासदार राहिलेल्या प्रीतम मुंडे यांचं पुढे काय होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. प्रीतम मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी भविष्यात विधानपरिषद हा एक पर्याय असू शकतो. याशिवाय भाजपमधील मोठी जबाबदारी त्यांना दिली जाऊ शकते.
मात्र राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर महायुतीच्या सरकारमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे अनेकवेळा एकाच व्यासपीठावर आले. शरद पवारांनी भाजपसह सत्तेत सहभागी झाल्यावर पंकजा मुंडेंनी स्वत: धनंजय मुंडेंचं औक्षण करत स्वागत केलं होतं.
नाराजीच्या चर्चा
2019 साली पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर परळीच्या राजकारणातून त्या काहीशा अलिप्त झाल्या होत्या. त्यानंतरची काही वर्षे त्या सक्रीय राजकारणापासून दूर झाल्या होत्या. पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चाही अनेकदा राजकीय वर्तुळात होत्या. अशावेळी पक्षाकडून पंकजा मुंडेंना राष्ट्रीय सचीव करण्यात आलं. यामुळे राज्याच्या राजकारणापासून त्या काही काळ दूर गेल्या.
मुख्यमंत्री पदाच्या दावेदार
पंकजा मुंडे सत्तेत होत्या तेव्हा मुख्यमंत्री पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा होत होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मार्गातून त्यांना दूर करण्यासाठी असं केलं असावं, अशी ही चर्चा अनेकदा झाल्याचं पाहायला मिळालंय. मात्र काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस आणि पंकडा मुंडे यांच्यात सुरू असलेली पक्षांतर्गत धुसफूस संपल्याचं चित्र देखील पाहायला मिळालं.
१७ फ्रेब्रुवारी रोजी प्रितम मुंडे यांचा वाढदिवस होता. यावेळी भाजपच्या एका कार्यक्रमात दोघी बहिणी आल्या होत्या. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांसह भाजपमधील दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रितम मुंडेंचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यातून पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणावीस यांतील पक्षांतर्गत धुसफूस काहीशी कमी झाल्याचं पाहायला मिळालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.