Beed Farmer News: राज्यभरात परतीच्या पावसाने हाताशी आलेलं पीक उद्ध्वस्त झालं आहे. यात सोयाबीन पिकालाही (soybean crop) मोठा फटका बसला आहे. उद्ध्वस्त झालेले सोयाबीन पाहून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना बीडमध्ये घडली आहे. अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्याने (Farmer) आपल्या सोयाबीनच्या ढिगाऱ्यासमोरील लिंबाच्या झाडालाच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. बीडच्या केज तालुक्यातील राजेगाव येथे ही धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. (Beed Latest News)
संतोष अशोक दौंड वय 40 रा. राजेगाव ता. केज असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. संतोष यांना तीन मुली आणि एक मुलगा असून त्यातील एक मुलगी लग्नाच्या वयाची आहे. या वर्षीच्या पिकाचे पैसे आल्यावर मुलीचं लग्न करता येईल, अशी इच्छा त्यांनी घरी बोलून दाखवलेली होती. मात्र डोळ्यादेखत काढलेलं सोयाबीन परतीच्या पावसाने वाहून गेलं, तर काही भिजलं तर कापूस होता त्याच्या देखील पावसाने वाती झाल्या. यामुळे शेतकरी संतोष दौड हे नैराश्येत होते.
पीकाचं नुकसान झालं, आता मुलीचं लग्न कसं करायचं? सोसायटीचं कर्ज कसं फेडायचं? या नैराश्येतून त्यांनी आपल्या सोयाबीनसमोरच गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. सकाळी सोयाबीन वेचायला गेलेले संतोष अजून कसे परतले नाही? हे पाहण्यासाठी गेलेल्या कुटुंबियांना त्यांचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसल्याने त्यांनी एकच टाहो फोडला.
दरम्यान बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तळहाताच्या फोडासारखी जपलेली पिकं उद्ध्वस्त झाली असून शेतकऱ्यांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तात्काळ मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.