
"इतकं चांगलं काम करणारा व्यक्ती मंत्रिमंडळात असला पाहिजे. ही आमची आणि संजय बनसोडेंची खूप इच्छा आहे. तो योग कसा येणार हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही सगळे जण सुद्धा वाट बघताहेत की भय्या कधी उडी घेणार", असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार विक्रम काळे यांनी केलंय.
विक्रम काळेंनी केलेल्या विधानावर "जिथे आहोत तिथे आनंदी आहोत" अशा शब्दात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात बरीच चर्चा रंगलीय.
विक्रम काळे अमित देशमुखांबद्दल काय बोलले?
लातूरमध्ये आयोजित कार्यक्रमात विक्रम काळे म्हणाले, "अमित देशमुख हे २०२३ साली सांस्कृतिक मंत्री असताना फेस्टिव्हलची सुरूवात केली होती. मात्र ते आज मंत्री नाहीत, तरीसुद्धा ही परंपरा कायम ठेवण्याचं काम अमित देशमुखांनी केलेलं आहे. एवढं चांगलं काम करणारा माणूस मंत्रिमंडळात असायला पाहिजे, ही आमची आणि संजय बनसोडेंची खूप इच्छा आहे," असं विक्रम काळे म्हणाले.
"मी त्यांच्या पलीकडून बसलो, अलिकडून संजय बनसोडे बसलेले आहेत. गरज पडली तर जब्बार पटेल कानात सांगायला बसलेले आहेत. त्यामुळे हा योग लवकर जुळवून यावा. आणि सांस्कृतिक कार्य विभागाच्या मंत्र्यांनी हा फेस्टिव्हल लातूरमध्ये आयोजित केलाय, हा कार्यक्रम बघण्याचा योग लातूरकरांना यावा, तो कसा येणार हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. सगळेजण वाट बघत आहेत, की भैय्या कधी उडी घेणार, त्यामुळे तो योग येईल अशी अपेक्षा करतो", असं मोठं विधान अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांनी केलं आहे.
अमित देशमुख विक्रम काळेंच्या ऑफरवर काय बोलले?
विक्रम काळेंनी दिलेल्या ऑफरवर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिलीय. "विक्रम काळे दरवेळेला इथे एका नव्या चित्रपटाची निर्मिती करतात. मग ते दिग्दर्शन, निर्मिती, पटकथा, अभिनय सगळं तेच करतात. मात्र हे त्यांचं प्रेम आहे माझ्यावर. पण, मला असं वाटतं की, जसा सामाजिक समतोल असला पाहिजे. तसा राजकीय समतोल सुद्धा असायला हवा."
"तराजूप्रमाणे सगळेच जर तिथे जाऊन बसले तर... त्यामुळे तो समतोल राखण्याचं काम लोकशाहीमध्ये अभिप्रेत असतं. शेवटी महायुती आणि महाविकास आघाडी. तुम्ही जिंकलात, पण ज्यांनी महाविकास आघाडीला मते दिलेली आहेत, त्या मतांचा आदरसुद्धा करणं आमचं काम आहे.
जिथे आहोत तिथे आनंदी आहोत. भविष्यात तुम्हीच कदाचित इकडे याल. असं होऊ शकतं. काळ बदलतो, राजकीय परिस्थिती बदलत राहते", असं अमित देशमुख यांनी विक्रम काळे यांनी दिलेल्या ऑफरवर उत्तर दिलंय. दरम्यान या दोन्ही नेत्यांच्या विधानांची लातूरमध्ये रंगतदार चर्चा सुरू आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.