-- राजेश भोस्तेकर
रायगड : अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आग लागून दहा जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. या दुर्घटनेनंतर अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालयात अशी दुर्घटना घडू नये यासाठी वीज यंत्रणा, अग्निशमन तसेच नादुरुस्त यंत्रणांची पाहणी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी अधिकाऱ्यांसोबत केली. नादुरुस्त झालेली वीज यंत्रणा आणि इतर यंत्रणा त्वरित बदलण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुहास माने यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
हे देखील पहा :
अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय (आताचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) येथे जिल्ह्यातून शेकडो रुग्ण उपचारासाठी नेहमी येत असतात. जिल्हा रुग्णालयाची इमारत ही 40 वर्षांपूर्वी बांधण्यात आली असून जीर्णही झाली आहे. या इमारतीत अनेक ठिकाणी पडझड झाली असून नुकताच जिल्हा नियोजन तर्फे दुरुस्तीसाठी 13 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे इमारतीच्या डागडुजीची कामे सुरू आहेत. अहमदनगर येथे रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी ओपीडी विभाग, अपघात विभाग, डायलिसिस, आयसीयू, महिला प्रसूती कक्ष, शस्त्रक्रिया कक्ष, मेल वार्ड, कोव्हिड सेंटर या विभागात जाऊन पाहणी केली. यामध्ये वीज यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा आणि इतर उपकरणे याची पाहणी केली. नादुरुस्त यंत्रणा त्वरित बदलण्याच्या सूचना डॉ.माने यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाचे फायर ऑडिटही झाले असून एखादी दुर्घटना घडू नये यासाठी खबरदारीची पावले उचलली जात असल्याचे डॉ.सुहास माने यांनी सांगितले.
Edited By : Krushnarav Sathe
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.