अक्षय गवळी
अकोला : केंद्र सरकारकडून राबविण्यात आलेल्या ‘एक जिल्हा एक उत्पादन २०२४’ या अंतर्गत महाराष्ट्र राज्याने चमकदार कामगिरी केली असून राज्याला 'अ' श्रेणीतील सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राने उत्पादनांच्या नाविन्य पूर्णतेने, उच्च दर्जा आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणवत्तेने राष्ट्रीय स्तरावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर कापूस प्रक्रिया उद्योग विकासासाठी अकोला जिल्ह्याला केंद्र शासनाकडून राष्ट्रीय पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील रत्नागिरी, नागपूर, अमरावती, नाशिक व अकोला या जिल्ह्यांनी कृषी आणि अकृषी क्षेत्रातील आपल्या विशेष उत्पादनांसाठी सुवर्ण, रौप्य, कांस्य आणि विशेष उल्लेखनीय पुरस्कार पटकावले आहेत. नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये हा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला असून यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत सोमवारी पुरस्कार वितरण झाले. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जितिन प्रसाद हे उपस्थित होते.
जिनिंग, प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार
अकोला जिल्ह्याला जिनिंग आणि प्रेसिंगसाठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाला आहे. कापूस उत्पादन आणि प्रक्रिया क्षेत्रातील अकोल्याची प्रगती आणि औद्योगिक विकास यामुळे राष्ट्रीय स्तरावरील हा पुरस्कार मिळाला आहे. अकोला जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या वतीने जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष बनसोड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. अकृषी क्षेत्रात पुरस्कार मिळवणारा अकोला हा महाराष्ट्रातील एकमेव जिल्हा आहे. दरम्यान केंद्र शासनातर्फे जिल्ह्याला जिनिंग, प्रेसिंग साठी विशेष उल्लेखनीय पुरस्कार मिळाल्यामुळे कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाल्याचे मत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी व्यक्त केले.
बोरगाव मंजूत ‘संघा क्लस्टर’
जिल्हा उद्योग केंद्रातर्फे बोरगाव मंजू येथे महाराष्ट्र राज्य औद्योगिक समूह विकास योजनेत सामूहिक सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात कापूस प्रक्रिया उद्योगांना भांडवल मिळवून देण्यात आले. त्यामुळे बोरगाव मंजू परिसरात ‘संघा क्लस्टर’ निर्माण झाले असून त्याचे १०३ सदस्य आहेत. जिल्ह्यात सूतनिर्मिती, पोशाख निर्मिती केंद्रे निर्माण झाली. तर १०० जिनिंग- प्रेसिंग आहेत. या प्रक्रियेसाठी सीएम फेलो ऋग्वेद ऐनापुरे व सांख्यिकी सल्लागार अंकित गुप्ता, तसेच जिल्ह्यातील औद्योगिक संघटना व उद्योजकांचे सहकार्य मिळाले, असे श्री. बन्सोड यांनी सांगितले.
अमरावतीच्या मंदारिन संत्र्याला कांस्यपदक
अमरावती जिल्ह्याने मंदारिन संत्र्यांसाठी कृषी क्षेत्रातील 'अ' श्रेणी अंतर्गत तृतीय स्थान मिळवले. संत्रा उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता आणि बागायती क्षेत्रातील उत्कृष्ट प्रयत्नात अमरावतीला कांस्यपदक मिळाले. जागतिक स्तरावर आंब्यांचा राजा म्हणून ओळखला जाणारा रत्नागिरी जिल्ह्याचा हापूस आंबा या फळाला 'अ' श्रेणीत जिल्ह्याने प्रथम स्थान मिळवले आहे. नागपुरी संत्र्याला कृषी क्षेत्रातील 'अ' श्रेणीअंतर्गत द्वितीय स्थान. नाशिकला द्राक्षे आणि मनुकांसाठी (ग्रेप्स अँड रेझिन्स) कृषी क्षेत्रातील श्रेणी अ अंतर्गत विशेष उल्लेख पुरस्कार मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.