अकोला जिल्ह्यातील उमरा गावात ३०० वर्षांपासून द्वारका उत्सव साजरा केला जातो.
पोळ्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी गावातील बैलांना मंदिर प्रदक्षिणा घालून आशीर्वाद घेतले जातात.
शेतकरी स्वतः रथ ओढून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करतात.
वाकाजी महाराजांच्या स्मृतीशी जोडलेली ही परंपरा गावकऱ्यांच्या श्रद्धा व ऐक्याचं प्रतीक आहे.
अक्षय गवळी, अकोला
आपल्या कृषिप्रधान संस्कृतीत बैलाचं स्थान अतिशय मोठं आणि महत्वाचं. याच बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील उमरा गावानं एक आगळी-वेगळी आणि ऐतिहासिक परंपरा जोपासली आहे. वृषभराजाप्रती या कृतज्ञोत्सवाला तीनशे वर्षांची परंपरा आहे. काय आहे ही परंपरा? चला जाणून घेऊया
नांगर, वखर किंवा बैलगाडीला जुंपलेले बैल वर्षभर आपल्यासाठी हे दृश्य अगदी नित्याचच पण रथात बसवलेले बैल, आणि त्या रथाला स्वतःला जुंपत रथ ओढणारे शेतकरी. हे चित्र काहीसं वेगळं आहे. हे दृष्य आणि हा उत्सव या गावात 'द्वारका उत्सव' म्हणून साजरा केला जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी उमरा गावात हा 'द्वारका उत्सव' साजरा केला जातो. ही परंपरा या गावात तीनशे वर्षांपासून सलग सुरु आहे. तेव्हापासून बैलांच्या चांगल्या आरोग्यासाठी गावात या आगळ्या-वेगळ्या परंपरेनं जन्म घेतला आहे. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी गावातील सारे बैल वाकाजी महाराजांच्या मंदिराला प्रदक्षिणा घालून त्यांचे आशिर्वाद घेतात. त्यांच्या वंशजांनी गावकऱ्यांसोबत ही ऐतिहासिक परंपरा अजूनही निष्ठेने जोपासली आहे.
या परंपरेमागे पूर्वापार चालत आलेली आख्यायिका आहे. ३०० वर्षांपूर्वी गावात एका अज्ञात तापाची साथ आली होती. त्या तापाने गावातील बैल मरत होते. काही केल्या ही साथ थांबत नव्हती अन घाबरलेल्या गावकऱ्यांनी गावातील संत पुरुष असणाऱ्या वाकाजी महाराजांना साकडं घातलं. पुढं वाकाजी महाराजांनी दिलेल्या औषधाने बैलांचा आजार बरा झाला.
शेतकरी आतुरतेने या उत्सवाची वाट पाहत बघतात. बैलाच्या चांगल्या आरोग्यासाठी नवस करणारे शेतकरी स्वतःच रथ तयार करतात. एका रथासाठी साधारणतः १५ ते २० हजार रुपयांचा खर्च येतो आहे. हा उत्सव पाहण्यासाठी उमऱ्यात नोकरी निमित्ताने बाहेरगावी असलेले चाकरमानीही आणि सासुरवाशीनीही गावी आलेल्या असतात. आज उमरा गावातील 'द्वारका उत्सव' म्हणजे बैलांच्या निष्ठा अन समर्पणाला शेतकऱ्यांनी केलेला सलामच म्हणावा लागणार आहे. हा सोहळा म्हणजे सध्या समाजात वाढत चाललेल्या कृतघ्नतेच्या वाळवंटात फुललेली कृतज्ञतेची हिरवळच आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.