सचिन बनसोडे, अहमदनगर, ता. २३ मे २०२४
अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रवरा नदित बुडालेल्या २ तरुणांचा शोध घेण्यासाठी आलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) पथकाची बोट उलटल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाला असून दोघांचा शोध सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल प्रवरा नदीत दोन तरुण बुडाल्याची घटना घडली होती. यांपैकी एका तरुणाचा मृतदेह सापडला होता तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू होता. याच शोधकार्यासाठी आज एसडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. अकोले तालुक्यातील सुगाव गावजवळ ही शोधमोहिम सुरू होती.
शोध घेण्यासाठी बोटीत पथकातील चार जणांसह एक स्थानिक तरुण बसला होता. याचदरम्यान, पाण्याच्या प्रवाहामुळे पथकाची बोट उलटली. या दुर्घटनेत एसडीआरएफ पथकातील तिघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर इतर दोघांचा शोध सुरू आहे. प्रांताधिकारी शैलेश कुमार हिंगे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह काँग्रेस नेते, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सध्या बोटीमधील इतर दोघांचा शोध सुरू आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.